msanglikar

सिंगल मदर (भाग 3)
« on: December 09, 2015, 09:59:44 PM »
-महावीर सांगलीकर

इकडं पुण्यात सुनिल आपल्या व्यवसायात आणि खोट्या-खोट्या संसारात मग्न तर तिकडं कोल्हापुरात सुनिलची आई त्याच्यासाठी स्थळं शोधतेय! तिनं कांही मुली बघूनही ठेवल्या होत्या.

एके दिवशी सुनिलला आईचा फोन आला. ती म्हणाली, ‘सुनिल, तुझा तुझ्या उद्योगात जम बसला असेल, आता लग्न करून टाक. मी तुझ्यासाठी चार-पाच मुली बघून ठेवल्या आहेत. चार दिवस सवडीनं इकडं येऊन मुली बघून जा’
‘आई, मला आताच लग्न करायचं नाही. अजून एखादं वर्ष जाउदे’ सुनिलचं उत्तर.

आई मुली बघण्यासाठी सारखा फोन करायची आणि सुनिल कांहीतरी उत्तर देऊन वेळ निभावून न्यायचा.
पण एके दिवशी जे व्हायचं तेच झालं. सुनिलच्या आईला एक फोन आला.
‘तुमच्या मुलासाठी तुम्ही आमच्या मुलीची चौकशी केली होती. आमच्या मुलीला तुम्ही बघून पण गेलात. पण आम्हाला असं कळलंय की सुनिलचं आधीच लग्न झालंय. तो पुण्यात त्याच्या बायको बरोबर राहतो आणि त्याला एक मुलगीपण आहे. ही काय भानगड आहे?’
‘हे खोटं आहे. कुणी सांगितलं तुम्हाला?’ आई ठामपणे म्हणाली.
‘आम्ही चौकशी केली पुण्यातल्या एका ओळखीच्या माणसाकडं. त्यानं सांगितलं’
‘तो माणूस खोटं बोलतोय. नाहीतर त्याचा कांहीतरी गैरसमज झाला असणार’ असं म्हणत सुनिलच्या आईनं फोन कट केला.
सुनिल असं कांही करणं शक्यच नाही असा त्याच्या आईचा पक्का विश्वास होता, त्यामुळं तिनं यावर अजिबात  विचार केला नाही.

दुसऱ्या दिवशी सुनिलच्या आईला तिची एक जुनी मैत्रीण भेटली. म्हणाली, ‘हे काय ऐकतेय मी? सुनिलनं लग्न केलंय आणि तू मला सांगितलं पण नाहीस...’
‘कुणी सांगितलं तुला? खोटं आहे ते’
‘मी तर दोन लोकांच्याकडून ऐकलय’ असं म्हणून ती मैत्रीण निघून गेली.
आता मात्र आईच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. तिनं प्रदीपला फोन करून महत्वाचं काम आहे असं सांगत लगेच घरी बोलावून घेतलं. हा प्रदीप सुनिलचा मित्र होता आणि तो त्याच्या कामासाठी नेहमी पुण्याला जात असे. अधनं-मधनं सुनिलकडंही जायचा. सुनिलच्या आईला हे माहीत होतं.
थोड्याच वेळात प्रदीप घरी आला.
‘काय काकू, काय काम होतं का?’ आल्याआल्याच त्यानं विचारलं.
‘अरे प्रदीप, तू पुण्याला कधी गेला होतास अलीकडं?’
‘गेल्या आठवड्यात’
‘सुनिलकडं गेला होतास?’
‘होय’
‘कसं काय चाललंय त्याचं? म्हणजे तो फोन करतो मला अधनं-मधनं... पण तू प्रत्यक्ष भेटलास त्याला म्हणून विचारते’
‘चांगलं चाललंय की’
‘घरी आणखी कोण असतंय?’ आई त्याच्याकडं रोखून बघत म्हणाली.
‘कुणी नाही. तो एकटाच राहतो तिथं’
पण हे म्हणत असताना त्याची नजर झुकली होती. आईला लगेच शंका आली, पण तसं न दाखवता ती म्हणाली, ‘ठीक आहे,  परत पुण्याला जायच्या आधी सांग, त्याच्यासाठी फराळाचं देते तुझ्याकडं’.
तो हो म्हणून निघून गेला.
कांहीतरी लपवा-छपवी चालली आहे... सुनिलच्या आईच्या लक्षात आलं. सुनिलला फोन करावा का? नको, त्यापेक्षा सरळ जावं पुण्याला त्याच्याकडं. त्याचा पत्ता होताच तिच्याकडं. दुसऱ्याच दिवशी सुनिलकडं जाऊन येते असं सुनिलच्या वडिलांना सांगून तिनं तडक पुणं गाठलं.

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/12/3_67.html