anagha

अंधश्रध्दा-कर्मकांड
« on: October 15, 2013, 03:13:59 PM »
अंधश्रद्धा - कर्मकांड
 नको लागूस माणसा तू, अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या मागे
 नाही त्यातून चांगले ते निष्पन्न निघे।
 अडकता माणूस त्या भोवऱ्यात  नाही सुटका होत त्यातून,
 माणसा तुझे कर्तव्य तू करत जा
 नको मागे लागू अंधश्रद्धेच्या आणि कर्मकांडाच्या
 आता तरी शहाणा हो व त्या गर्तेतून घे मोकळा श्वास।
 शिकून-सवरून तू मोठा  झालासी,
 विज्ञानाचा वापर तू करू लागलासी,
 काय सत्य ते तुला ठाऊक तरी तू
 आहारी जातसे कर्मकांड व अंधश्रद्धेच्या!
 जे व्हायचे ते होणार असते
 नको अडकू तू या कर्मकांड व अंधश्रद्धे च्या फेऱ्यात
 माणसा माणसा, आता तरी तू डोळस  हो. बघ जग कुठे चालले आहे? 
 
 श्रद्धा ती आपल्या मनात, मनोभावे, अंतःकरणापासून, सात्विकतेने केलेली
असावी. त्यात स्वार्थापणा व बडेजाव नसावा. पूर्वाच्या संतांनी केलेली ईश्वराची सेवा
पाहावी, अभंग रचून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य पाहावे. संत तुकाराम,
ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, नामदेव, रामदासस्वामी यांचे मनाचे श्लोक, मारूतीची उपासना
त्यांनी उभारलेली मारूतीची मंदिरे, त्यांची शिकवण, बलदंड, आत्मिक शक्ती,
मारूतिरायासारखे शक्तिमान, हुशार, हिमतीने संकटांना तोंड देणे, राम-सीता
भक्ती इत्यादींतून आपणही खूप शिकू शकतो.
 श्रीसंत तुकारामांची विठ्तल  भक्ती, त्यांनी रचलेले अभंग, ही सर्व
सेवाभक्ती अगदी मनापासून, अंतःकरणापासूनची होती. त्यात कोठेही स्वार्थ,
दांभिकता, पैशाचा हव्यास नव्हता, की भ्रष्टाचार नव्हता. ती मनापासूनची सेवा होती.
त्यांचे अभंग इतके छान, मधुर होते, की ते लोकांच्या तोंडी सहजतेने पाठ होत व
तल्लीन होऊन ते स्वतःला त्या भक्तीच्या पुरात लोटून देत.
 संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला आई म्हणून आळविले . आपल्या सर्वांचे
आईवडील म्हणजे विठल -रूक्मिणी हे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात
 
अडकून न बसता `देवास आई म्हणून हाक मारा', अशी त्यांची शिकवण आहे.
मातेच्या हळूवार  चित्ताने त्यांनी हा उपदेश समाजाला केला, त्या जनतेने त्यांना
स्वयंप्रेरणेने `माउली' ही संज्ञा दिली. त्यांनीभगवतगीते वरील ग्रंथ `प्राकृत' भाषेत
लिहिला (त्या वेळची  प्रचलित मराठी) व योग्य शिक्षण समाजाला दिले. ती शिकवण
आजही आपल्याला योग्य मार्गदर्शन करते. मराठीचे महत्त्व त्यांनी जाणले.
 मराठी भाषेची गोडी, तिची थोरवी, तिच्या भाषेची महती एवढी आहे, की
ती अमृतालाही मागे टाकेल. `मराठी आमुची अमृताशी पैजा जिंके.....' गीतेत
सांगितल्याप्रमाणे मनुष्यानेफळाची  अपेक्षा न करता आपले कर्तव्य करत जावे.
 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
 अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या मागे लागणे, कोणत्याही आलतूफालतू माणसाला
महत्त्व देणे, कोणी गेले की अगदी कर्ज काढून पत्रावळ  उठवणे. त्यापेक्षा गरिबांना,
अनाथ आश्रमांना, अनाथ बालकांना, अंध अपंग संस्थेला भरपूर देणगी व वस्तू
देऊन त्यांना मदत करून समाजाची सेवा करण्याते व्रत घेऊ. तेव्हा खरा मानसिक
आनंदमिळेल . माणूस जिवंत आहे तोपर्यंत, जसे आजारी, वयस्कर अपंग यांची
सेवा करा, त्यांना प्रेम, आपुलकी, दया दाखवा व आपल्या जीवनाचे सार्थक करा.
 अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या नावाने तुमचाच पैसा, आयुष्य, बुद्धीचा नाश
होतो. कामांवर परिणाम होतो. त्यापेक्षा कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्या
बुद्धीचा कस लावा. काय चांगले, काय वाईट हे ती नक्कीच सांगेल. सकारात्मक
दृष्टिकोन ठेवा, वाईट कर्म करू नका, सात्विकता ठेवा. शुद्ध आचरण, मनापासून
केलेली सेवा हेच तुमचे आयुष्य नीट करील. हव्यात कशाला इतर गोष्टी? काही
लोक मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करत नाहीत, तो मेल्यावर मात्र त्यांच्या
नावे श्राद्ध मोठया मोठया प्रमाणात करतात! खरेच का तो आत्मा तृप्त होत असेल?
तोही वरून शापच देत असणार, नाही का? मला एवढेच सांगायचे आहे की,
कर्मकांड व अंधश्रद्धेच्या आहारी न जाता बुद्धीचा व विज्ञानाचा आधार घ्या. तुमचे
जीवन नक्कीच सुकर होईल.