msanglikar

आठवणी:
माझं आजोळ अंकलखोप

........ अंकलखोपमध्ये एक सार्वजनिक वाचनालय होतं. माझे आजोबा शाळा सुटल्यावर रोज दुपारी मला घेऊन वाचनालयात जायचे. तिथं पुण्या-मुंबईचे पेपरही यायचे. मला आठवतं, तिथं लोकसत्ता यायचा. नवशक्ति हा पेपरही यायचा. तिथं हे दोन्ही पेपर एक दिवस उशीरा यायचे. पेपर  वाचायची सवय मला लहानपणापासूनच लागली, ती आजोबांच्या मुळंच.. (पण मी लेखक झाल्यावर वाचनाची आवड कमी झाली).

अंकलखोपच्या शेजारी साधारण 3 किलोमीटर अंतरावर भिलवडी हे गाव आहे. तिथं आठवडा बाजार भरत असे. आजोबा मला दरवेळी तिथं घेऊन जात. आम्ही दोघं चालत जात असू. आजोबा बाजारात खूप चौकशी करून, घासाघीस करून खरेदी करायचे. धान्यं, फळं, भाजीपाला वगैरे. मग आम्ही चालत परत येत असू. चालायची ती लहानपणी लागलेली सवय मला आजही आहे. माझं रोज साधारण चार-पाच किलोमीटर चालणं सहज होत असतं.

आजोबांच्या बाबतीत मी ऐकलेली एक गोष्ट म्हणजे ते एकेकाळी आमच्या समडोळी या गावात शिक्षक होते. हे गाव अंकलखोप पासून सरळ रेषेत साधारण 20 किलो मीटर आहे. आजोबा रोज अंकलखोप वरून समडोळीला चालत जात आणि शाळा सुटल्यावर परत अंकलखोपला चालत जात. म्हणजे रोज चाळीस किलोमीटर चालणं!

अंकलखोपवरून भिलवडीला जाताना वाटेत एक चिंचेच मोठं बन आहे. या बनात म्हसोबाचं छोटं देऊळ आहे. एक आख्यायिका अशी आहे की एकदा अफजलखानाच्या सैन्याचा तळ या बनात पडला होता. खानानं ते देऊळ पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याच्या सैन्यातल्या लोकांना हगवण लागली. खानाचे वंशज आजही इथल्या यात्रेच्या वेळी म्हसोबाला येऊन जातात म्हणे.

सुट्टी असताना कधी कधी आजोबा मला सांगलीला किंवा वसगड्याला घेऊन जायचे. वसगडे हे आजीचं माहेर. आमचा हा प्रवास भारीच असायाचा. अंकलखोपहून भिलवडीला चालत जायचं, भिलवडीहून भिलवडी रेल्वे स्टेशनला टांग्यातनं जायचं, तिथं तिकीट काढून आगगाडीच्या एखाद्या डब्यात बसायचं, तिथनं नांद्रे स्टेशनला उतरायचं, मग तिथनं वसगड्याला चालत जायचं. सांगलीला जायचं असेल तर भिलवडी स्टेशनपर्यंत असाच प्रवास, मग तिथनं रेल्वेनं डायरेक्ट सांगलीला जायचं. त्यावेळी सांगली रेल्वे स्टेशन सांगली शहराच्या मध्यभागीच होतं, आता ते गाव सोडून बाहेर गेलंय. असो. आजही माझ्या स्वप्नात हा प्रवास कधेमधे दिसतो. स्टेशनात शिरणारं आगगाडीचं ते काळेकुट्ट इंजिन, त्यातून निघणारा धूर, धडकी बसवणारा प्रचंड आवाज आणि ती ऐकावीशी वाटणारी शिट्टी.

पूर्ण आठवणी पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/11/blog-post.html