Manasi

अनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा (anant chaturdashi katha)

--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
--------------------------------------------------------------------------------------------

अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

--------------------------------------------
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास:

मानाचे गणपती

पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती:

   1. कसबा गणपती
   2. तांबडी जोगेश्वरी गणपती
   3. गुरुजी तालीम गणपती
   4. तुळशीबाग गणपती
   5. केसरीवाडा गणपती


---------------------------------------
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या  गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.
तसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. यामागे ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात.
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला.
‘कौंदण्य’ नावाच्या एका ऋषीने अनंतदेवाचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अखेरीस कौंदण्य ऋषींना कळले की अनंत सर्वत्र भरलेला आहे, तेव्हापासून सर्वत्र भरलेल्या या अनंताची भाद्रपद चतुर्दशीला आराधना केली जाते.
या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल किंवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेष(नाग) तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. या दो-यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत (दोरा) घरातील पुरुष तर अनंती ही त्याच्या पत्नीने  उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात व आरती करतात.
अनंताचे व्रत आणि १४ या आकडय़ाचे नाते खूप आगळेवेगळे आहे. पूजेमध्ये जसा १४ गाठींचा दोरा बांधला जातो, त्याप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी १४ प्रकारची फुले, नैवेद्यामध्ये १४ प्रकारच्या भाज्या गुरुजींना १४ वडे-घारग्याचे वाण अशी या व्रताच्या पद्धती आहेत. अनंताच्या पूजेच्या दिवशी मेहूण(नवरा- बायको जोडीने) जेवायला बोलवून संकल्प सोडला जातो. सौभाग्यवतींची ओटी भरली जाते.
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे, अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे.
 आपण दहा दिवस मोठया थाटाने आपल्या बाप्पाची पूजा-अर्चना करतो. या आनंददायी उत्सवाची सांगता यादिवशी केली जाते.
आपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन, आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात ठेऊन बाप्पा आपला निरोप घेतो.


--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
--------------------------------------------------------------------------------------------