sachinikam

मनमित्र
« on: February 01, 2016, 02:53:13 PM »
मनमित्र

आयुष्याच्या वाटेला वळणे अन चढऊतार
कोण येईल सोबतीला बनेल सुखदु:खाचा जोडीदार?
ठेवील हिशोब क्षणाक्षणांचा, देईल जीवनाला आकार
उसळेल चैतन्य रोमरोमांत, छेडील विलक्षण झंकार.

समजणे बिकट ह्याला ध्यावा सोडून अट्टाहास
नको वैर कदापि बनावे मित्र खास
गट्टी करून ह्याच्याशी व्हावे जितेंद्रिय ना दास
सुटता नियंत्रण ह्याचे होती भलते सलते आभास .

जमेल राहणे पाण्यात झाल्यावर दोस्त मीन
येईल आनंद जगण्यात झाल्यावर दोस्त मन.

सोसाटला वारा अंगवस्त्र उडाले
झुडुपावर बोरीच्या अडकले
घाई केली तर रुततील काटे
ओढले कसेही तर सगळेच फाटे
हळुवार चहुबाजूंनी अलगद उचलुनी
घ्यावे जवळ गोडीने सारे कंटक काढुनी
ल्यावे परत झटकुनी अस्से घट्ट बांधुनी
राखेल लज्जा तेच घेईल भाबडे सावरुनी.

रमतो मिलिंद फुलांफुलांवर
भ्रमते मन चंचल क्षणाक्षणांवर.

मन म्हणजे खुशाल चेंडू
कधी सुगंधी गुलाब,
कधी केशरी झेंडू.

कधी खुलते जसा मयूरपिसारा
कधी झुलते लाटा सागरकिनारा.

कधी वाट चुकलेले वासरू,
कधी उंच उडणारे पाखरू,
कधी हट्टी रुसलेले लेकरू,
कधी ताली नाचणारे घुंगरू.

सांजसकाळ संगे ह्याच्या साधतो मी सुसंवाद
आंबट गोड तिखट क्षणांचा अनुभवतो आस्वाद
कृष्णधवल आयुष्याचे रंगले पूर्ण चित्र
मन जेव्हा झाले, माझे "परममित्र".

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुग्धमन
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

https://www.facebook.com/109963899088997/photos/pb.109963899088997.-2207520000.1454322787./109964882422232/?type=3&theater