sachinikam

ऋतुचक्र
« on: January 02, 2017, 07:02:06 AM »
ऋतुचक्र

ऋतुमागूनि ऋतु येती घेऊनि नवलाई संगे
बहुरंगी बहुढंगी लेऊनि जादूई सोंगे.

अस्मानी मंडपात फुलले लावण्याचे सोहळे
अवनीच्या मंचावर खुलले श्रुंगारखेळ निराळे.

चैत्रपालवी मनांत फुटली, पडले कुणी कुणास पसंत
हिरव्या शालूत नवरी नटली, दिमाखात सजला वसंत.

ज्येष्ठ झळया अधिक तापल्या, श्वासही झाला अजून उष्म
बरसली अचानक वळवाची सर, गारा झेलीत आला ग्रीष्म.

श्रावणधारांत भिजला वारा, शिवारात फुलली हर्षा
माहेरवाशीण झुले झुलली, नाचत रिमझिम आली वर्षा.

अश्विनाची घाई सुगीची, सणासुदीला लक्ष्मीचा वरद
निरभ्र निळ्या नभांतून, शीतल चांदण्यांत अवतरला शरद.

मार्गशीर्षाची हवा गुलाबी, अल्हाद तरंगला आसमंत
सोनेरी चंदेरी स्वप्नांच्या दुनियेत, जरा विसावला हेमंत.

माघगारठा अंगी शिरशिर, नको शेकोटी पेटवाया उशीर
पिकली पाने कोकीळ गाणे, रमतगमत चालला शिशिर.

ऋतुमागूनि ऋतु येती घेऊनि नवलाई संगे
बहुरंगी बहुढंगी घेऊनि जादूई सोंगे.
-----------------------------------------
कवी: सचिन निकम, पुणे
कवितासंग्रह: मुखदर्पण
sachinikam@gmail.com
-----------------------------------------