kiran#sonukkc

कथा एका शेतकऱ्याची...

" तो देव कोपला माझ्यावर..."

नशिबाला दोष देता देता
शंका आली स्वतःवर
वाटत मनास राहून राहून
तो देव कोपला माझ्यावर

शेतकरी मी , कास्तकरी मी
ना मी कोण्या एका जातीचा
कष्ट करतो रात्र जागवुनी
सेवक मी काळ्या मातीचा
पन किती केले कष्ट तरी
आक्काबाईच माझ्या नशीबावर
वाटत मनास राहून राहून.....

बँकेचे झाले दरवाजे बंद
म्हणून सावकाराचे पाय धरले
दुबार पेरणी करून सुध्दा
नशीब माझे तोट्यातच फिरले
दागिने संपले कारभारनीचे
अन मंगळसुत्र गेले व्याजावर
वाटत मनास राहून राहून.....

लग्न लेकीचे करताना
मारली छातीवर थाप
घर लिहून देताना सावकाराला
मला आठवला माझा बाप
तिला नोकरदार मुलगा शोधायला
नांगर घेतला खांद्यावर
वाटत मनास राहून राहून.....

मेघराजाने करुन कृपा
मात्र क्षणिक आनंद दिला
त्याच्या अवकाळी आगमनाने
तो सुखद क्षणही हिरावून नेला
कर्जाचा डोंगर सारता बाजूला
उपासमारी आली या अन्नदात्यावर
वाटत मनास राहून राहून.....

कागदोपत्री धोरणे सरकारची
फक्त शाब्दीक गोळीबार
आनुदानासाठी मी दरवर्षी
झिजवला शासकीय दरबार
क्षुल्लक भीक देवून बँकेत
राजकारण फक्त माझ्यावर
वाटत मनास राहून राहून.....

कर्जमाफी अन तत्सम धोरणे
आश्वासनांचा छळ सारा
वाट पाहता पुर्ततेची
गेला माझा सात-बारा
जुगार शेतीचा अटील खेळ
डाव बेतला जीवावर
वाटत मनास राहून राहून.....

गेले पारतंत्र्य आले स्वातंत्र्य
देशाने घेतला समृद्धीचा ध्यास
राष्ट्राचा मी अन्नदाता
कवटाळतो मृत्यूचा फास
मी आत्मा बोलतोय शेतकऱ्याचा
शरीर त्याचे चीतेवर
वाटत मनास राहून राहून
तो देव कोपला माझ्यावर
                   
            -सोनू
           ७९७२८३४६५६
Sonu kkc