m4marathi Forum

महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism => कोकण : Konkan (Beauty of Maharashtra) => Topic started by: Chota Kavi on June 20, 2012, 08:57:27 PM

Title: नयनरम्य दिघी (जि.रायगड)
Post by: Chota Kavi on June 20, 2012, 08:57:27 PM
नयनरम्य दिघी (जि.रायगड)

कोकणचं आल्हाददायी पर्यटन अनुभवताना बरीचशी लहानमोठी ठिकाणं पाहायची राहून जातात. असंच पर्यटकांच्या ओघापासून अलिप्त राहिलेलं एक ठिकाण म्हणजे दिघी... तर चला मग आज सफर करूया दिघी गावची.

वडवलीकडून डाव्या बाजूला दिवेआगरला आणि उजव्या बाजूने दिघीला असे दोन रस्ते जातात. दिघीकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला वेळास गावाकडे गेल्यास पुढे अत्यंत विलोभनीय समुद्रकिनारा आहे. मात्र हा किनारा अत्यंत खडकाळ आणि धोकादायक आहे. त्यामुळे पाण्यात उतरण्याचं धाडस करू नये. अजून फारसे पर्यटक या बाजूला येत नसल्याने निर्मनुष्य समुद्रतट या ठिकाणी पहायला मिळतील.
वेळासच्या पुढे आंदगांव. इथल्या समुद्रकिनार्‍यावरचं श्रीराम मंदिर आणि त्याचा परिसर पहाण्यासारखा आहे. पुढे गेल्यावर सर्वे नावाचं गाव आहे. इथे एक लहानसा घाट रस्ता आहे. या घाटातून दिसणारा समुद्राचा देखावा पहाताना आपण एखाद्या बेटावर घाट रस्त्याने चाललो आहोत असा भास होतो. चौफेर समुद्र आणि मधेच उंच डोंगरावर असलेले बेट असे सुंदर दृश्य आपल्याला इथे पहायला मिळेल. वाटेत अनेक ठिकाणी माकडांच्या टोळ्या दिसतात.
घाट संपल्यावर काही अंतरावर मणेरी नावाचे सुंदर छोटेसं गाव आहे. इथे काळभैरवाचं रेखीव मंदिर आहे. गाव डोंगर उतारावर असल्याने घरांच्या छपरांवरून डोकावणारा समुद्र अतिशय विलोभनीय दिसतो. याच भागातून पुढे दिघीकडे उतार चालू होतो. इथून जंजिरा किल्ल्याचं दृश्य प्रत्येक वळणातून वेगवेगळे दिसू लागते.

फोटोग्राफीची आवड असणार्‍या पर्यटकांना संपूर्ण दिवस फोटो काढत राहिले तरी कमीच वाटेल इतकी वेगवेगळी दृश्यं इथून पहायला मिळतात. अशा या सुंदर परिसरातून आपण दिघी बंदरात पोहोचतो.
वडवली फाट्यापासून वेळास, आंदगांव, दिघी अशी अत्यंत निसर्गरम्य सहल करता येते. दिघीतून पुन्हा वडवली फाट्यावर यायला अगदी चांगला रस्ता आहे. वडवली फाट्यावर येऊन पुढे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर अशी इतर आणखी निसर्गरम्य स्थळांकडे आपण जाऊ शकतो.
(http://a8.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/319755_366279606765687_504792746_n.jpg)