Chota Kavi

आहुपे घाट, खोपिवली,कोकण

चला तर मग आहुपे घाटात, एकदम सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर रग जिरवायला. आहुपे घाट म्हणजे कोकणातले खोपिवली आणि घाटावरचे आहुपे यांना जोडणारी दमछाक करणारी जरा अवघड पायवाट आहे. साधारण पावणेचार हजार फूट उंचीची ही खडी चढण चढायला छाताडातही तेवढाच दमसास हवा. तो असेल तर यासारखी दुसरी जागा नाही. आहुपे घाट म्हणजे घाटावरून कोकणात उतरणारा सरळसोट कडाच आहे. पायवाट या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका; कारण सरळसोट कड्यातून पायवाट नसते, तर ती असते उतरण असणारी घळ. त्याच घळीतून चढायचे.

आहुपे घाट हा काही गड किंवा किल्ला नाहीय त्यामुळे वर असे कोणतेही अवशेष नाहीत. आहुपे गाव मात्र बघण्यासारखे आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात पोहोचल्यावर थकवा क्षणात नाहीसा होतो. आहुपे घाट हा भीमाशंकरच्या जवळ असल्याने दाट जंगल आहे. हे जंगल म्हणजे असंख्य अभूतपूर्व गोष्टींचे माहेरघर. विविध वृक्षसंपदा, आगळे प्राणिजीवन जवळून अनुभवण्यासाठी आदर्शवत.

अगदी स्वप्नातला गाव असावा असे ते आहुपे सह्याद्रीच्या अक्षरशः कुशीत अंग चोरून वसलेले आहे. समोर कोकणात उतरणारा सरळसोट साडेतीन चार हजार फुटांचा कडा आणि मागे तशीच उंच ढगांमध्ये घुसलेली दुर्ग-ढाकोबाची रांग. विस्तीर्ण पठारावर घुमत असलेला रानवारा आणि गालाला स्पर्शून जाणारे कापशी ढग. पठारावर एक देवराई, मंदिर, पाण्याचा तलाव अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या. पुढ्यात असलेले गोरख-मच्छिंद्रचे सुळकेही निम्म्याहून खुजे वाटावेत एवढ्या उंचीवर आपण पोचलेलो असतो. हे विराट सह्याद्रीचे रुपडे, अनेक ज्ञात-अज्ञात सुळके, डोंगरमाथे, धीरोदात्त तपस्वी जलाशय, अवखळ निर्झर पाहायला दोन्ही डोळे कमी पडतात आणि एकवेळ वाटून जाते या निसर्गापुढे खरे खुजे तर आपण आहोत. क्षुद्रातिक्षूद्र मानव.

कसे जाल:-

पुणे-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-माळशेज घाट-वैशाखरे-खोपिवली-देहरी.
पुणे-लोणावळा-खंडाळा-खोपोली-कर्जत-मुरबाड-म्हसे-देहरी.
मुंबई-कल्याण-मुरबाड-म्हसे-देहरी.
नाशिक-संगमनेर-आळेफाटा-माळशेज घाट-वैशाखरे-खोपिवली-देहरी.