Chota Kavi

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट
कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट
कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले, कोकण म्हणजे जीभेचे चोचले
कोकण म्हणजे अबोलीचं फुल, कोकण म्हणजे जीवाला भूल
कोकण म्हणजे देव रवळनाथ, कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात
कोकण म्हणजे सारवलेलं अंगण, कोकण म्हणजे तुळशी वृंदावन
कोकण म्हणजे मालवणचा खाजा, कोकण म्हणजे फळांचा राजा
कोकण म्हणजे चहा आंबोळ्या, कोकण म्हणजे दारावरच्या रांगोळ्या
कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
कोकण म्हणजे दशावतारी खेळ, कोकण म्हणजे भावभक्तीचा मेळ
कोकण म्हणजे वाळुची पुळण, कोकण म्हणजे घाटाचे वळण
कोकण म्हणजे फणस काजू आंबा, कोकण म्हणजे आंबटगोड रातांबा
कोकण म्हणजे मामाचं कौलारू घर, कोकण म्हणजे आजीच्या मायेचा पदर
कोकणातली माणसं वाटतात आपली, मैत्रीची हि नाती कायम मनात जपली
कोकण म्हणजे लोकसंगीतातली लय, झालो मी पुरता "कोकणमय"
कोकण म्हणजे तांदळाची पेज आणि चुलीत भाजलेला मासा
म्हणुनच तर म्हणतंय "येवा कोकण आपलोच आसा"