msanglikar

माझे वेल्हे येथील मित्र मधुकर जाधव यांचा एकदा अचानक फोन आला. फोनवर ते उत्तेजित स्वरात सांगत होते, ’अहो सांगलीकर, वेल्ह्यापासून जवळच जैन अवशेष सापडले आहेत, तुम्ही ते बघायला या’. त्याच दिवशी माझे दुसरे मित्र जैन पुरातत्वाचे जाणकार दिलीप खोबरे हे पुण्यात कांही कामासाठी आले होते. मी त्यांना फोन करून वेल्ह्याला येणार का हे विचारले. त्यांनी तयारी दाखवल्यावर मी मधुकर जाधव यांना वेल्ह्याला आम्ही दोघे उद्या येत आहोत असे सांगितले. त्यानुसार दुस-या दिवशी आम्ही वेल्हे गाठले. वेल्हे येथील मुख्य चौकात मधुकर जाधव आणि त्यांचे खास मित्र गणेश देवगिरीकर हे दोघे आमची वाट पहातच उभे होते. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. तेथून जवळच असलेल्या वाघदरा येथे गणेश देवगिरीकर यांचे घर होते. त्या रात्री आम्ही तेथे मुक्काम केला.

सकाळी सहा वाजता उठून आंघोळ करून आम्ही प्रवासाला सुरवात केली. आमच्याबरोबर वेल्हे येथील एक कार्यकर्ते सारनाथ गायकवाड हेही आले. दोन मोटरसायकलवर पाच जणांची ट्रिप सुरू झाली. मी आणि गणेश पुढे निघालो. वळणावळणाच्या आणि चढउतारांच्या रस्त्यावरून जात असताना वाटेत भट्टी येथे रामाचे एक मंदीर लागले. गणेशने मोटरसायकल मंदिराच्या गेटमधून आत घेतली. हे राम-लक्ष्मण-सीतेचे आधुनिक मंदीर होते, पण या मंदिराची चौकट शिलाहारकालीन होती. चौकटीच्या वरच्या बाजूस जैन तीर्थंकरांची पद्मासनात बसलेली छोटी मूर्ती दिसत होती. चौकटीच्या खालच्या बाजूस दोन्हीकडे विद्याधर आणि देवांगनांची शिल्पे होती. नक्कीच ही चौकट शिलाहारकालीन जैन मंदिराची होती. पुणे जिल्ह्यात दोन हजार वर्षांपूर्वीचे जैन अवशेष सापडत असले तरी ते वेल्हे तालुक्यातही सापडावे याचे मला जरा आश्चर्यच वाटले. ही चौकट वेल्हे तालुक्यातीलच सिद्धनाथाच्या एका उध्वस्त मंदिराची होती असे कळले.

त्या चौकटीचे आणि मंदीराचे कांही फोटो काढून आम्ही पुढे निघालो. हा भाग डोंगर आणि द-यांनी नटलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असूनही पहातच रहावे असे निसर्गसौन्दर्य दिसत होते. मग पावसाळ्यात जेंव्हा सगळीकडे हिरवळ असते त्यावेळी हा भाग खूपच सुंदर दिसत असेल. या रस्त्याने जाताना तोरणा किल्ल्याची मागची बाजू, राजगड किल्ला आणि रायगड किल्लाही स्पष्टपणे दिसतात. वाटेत लागणारी महाकाय दरी पहाण्यासारखी आहे. वाटेत बरेच फोटो काढले. एवढ्यात सारनाथ गायकवाड आणि जाधव, खोबरे यांनी आम्हाला गाठले. आमचा प्रवास भोरडी या गावाच्या दिशेने सुरू झाला. थोड्याच वेळात आम्ही भोरडी गावत पोहोचलो. हे गाव सारनाथ गायकवाड यांचे आजोळ. लहानपणी ते जेंव्हा या गावी येत तेंव्हा गावाबाहेरील जंगलासारख्या भागात असणा-या केळेश्वर मंदिरात येत असत. त्यावेळीच त्यांनी जंगलात सगळीकडे पडलेल्या मूर्त्या पाहिल्या होत्या. पण त्या नेमक्या कसल्या आहेत हे त्यांना त्यावेळी माहीत नव्हते.

पुढे वाचा: http://shodh-bodh.blogspot.in/2012/05/blog-post.html