Smitul

एक सुंदर प्रेम कथा...
« on: December 01, 2016, 10:09:01 AM »
                 महाविद्यालयीन पदवीचे पहिलेच वर्ष होते ते. कॉलेज सुरु होऊन २ महिने झाले होते. वर्गात सर्व मुलींमध्ये तीचं फार खोडकर होती. मधल्या सुट्टीत मुलांच्या बेंच वर चढुन उड्या मारणे हा जणु छंद होता तिचा आणि तिच्या ह्याचं अल्लडपणावर तो जाम फिदा होता. पण काय करता राव??? तिचा भाऊ सुध्दा त्याच वर्गात होता. त्यामुळे पालथ्या घड्यावर पाणी... त्यात ती मुलांचा नेहमी राग-राग करणारी मुलगी... म्हणजे आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना अशी गत त्याची.  त्याने तिला मनातलं सांगावं तर सांगावं तरी कसं??? त्यामुळे नेहमीच तिला लपून-छपून पाहावं लागायचं!
           पण एक दिवस त्याने हिम्मत केली ना यार.. आणि थेट तिच्या समोर गेला... पण, आपल्या मित्राचं प्रपोजल तिच्या मैत्रिणीसाठी घेऊन, नाही तर त्याची काय बिशाद! तिथंही तिला ते खटकलं! कि, मित्राचं प्रपोजल ह्याने का द्यावं? हा काय त्याचा PA वगैरे आहे काय? पण यांवर त्याच उत्तर तयार होत "माझा फार जीवलग मित्र आहे तो खुप प्रेमं करतो वहिनी तुमच्यावर प्लिज फक्त एकदा भेटा त्याला" हे ऐकून तिच्या मैत्रिणीच्या मनात थोडासा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला त्याच्या मित्रासाठी आणि हिला त्याच्या याचं निःस्वार्थ मैत्रीचं कौतुक वाटलं. त्या दिवसानंतर त्याच्या विषयी सर्व काही जाणुन घेण्याची तिला ओढ लागली.
त्याच्याबद्दल इतर मुलांना विचारलं असता तो खुप चांगला आणि हुशार मुलगा आहे हे समजलं. म्हणुन दुसऱ्याच दिवशी ही वेडी गेली त्याच्याकडे प्रॅक्टिकल तयार आहे का ते विचारायला, असेल तर त्याने द्यावं एवढाच हेतू! पण बहाणा जरी प्रॅक्टिकल चा असला तरी हिला मात्र त्याच्याशी ओळख करुन घेण्यात जास्त इंटरेस्ट होता. तो सुध्दा जणु तिचीच वाट पाहत असल्यासारखा तिला पाहून "हो देतो ना माझं प्रॅक्टिकल उद्या आणुन" असं सांगून तिच्याशी बोलू लागला. तिने लागलीचं त्याच्याशी हँडशेक करुन "हाय माझं नाव स्मिता" असं ठसक्यात सांगितलं. तिने पुढे केलेला हात अलगद हातात घेउन तो म्हणाला "आणि माझं नाव राहुल" त्यावर त्याने लगेचच हा सुध्दा खुलासा केला कि, मी पहिल्यांदाच एखादया मुलीचा हात हातात घेत आहे. ते ऐकून तर ती आणखीनचं आश्चर्यचकित झाली  कारण, आजवर 'एकाही मुलीचा हात हातात घेतला नाही' हे एका मुलाकडून ऐकणं तिच्यासाठी जरा नवीनचं होत.
                  दुसऱ्या दिवशी ते दोघेही कॉलेज मध्ये जाण्यासाठी फार उत्साही होते कारण आज पुन्हा त्यांची भेट होणार होती. तो फार खुश होता, त्याच्या मनात असणारी ती नकळतच त्याच्या आयुष्यात येत होती... सकाळचे लेक्चर्स झाले मधल्या सुट्टी मध्ये तिने त्याला पायऱ्यांवरचं गाठून 'प्रॅक्टिकल आणलेस का?'  असे विचारले त्याने तिच्या बोलता क्षणीच प्रॅक्टिकल ची फाईल तिच्या हातात ठेवली आणि त्यांच्या गप्पांना सुरवात झाली. तिच्या बोलक्या स्वभावानुसार तिने त्याच्यावर आपल्या प्रश्नांचा भडीमार सुरु केला. तु कोठे राहतोस? घरी कोण-कोण असतं? १२ वी ला कोणत्या कॉलेज मध्ये होतास? वगैरे-वगैरे... तो तिला मध्येच थांबवत सर्व प्रश्नांची उत्तरे देउ लागतो. मी इथेच राहतो कॉलेज जवळ. घरी मी, आई, वडील आणि एक मोठा भाऊ एवढेच असतो बहिणीचं लग्न झालं आहे ती तिच्या घरी असते एक गोडं भाचा देखील आहे.
             ती शांतपणे त्याच हे सर्व बोलणं ऐकत होती अचानक तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं त्याने जिथे हात ठेवला होता त्या ठिकाणी खूप साऱ्या लाल मुंग्या होत्या. त्या त्याच्या हातावर चढल्या होत्या पण त्याला ते जाणवलंच नाही  कदाचित तिच्या चेहेऱ्यावरील हावभाव पाहणं त्याच्यासाठी स्वतः पेक्षाही जास्त महत्वाचं होत. मग मात्र तिनेच त्याचा हात बाजूला सारला आणि त्याच्याकडे पाहुन हसू लागली त्याला तिच्या या हसण्यामागचं कारण कळेचं ना ! तेव्हा तिनेच त्याला तिथे असलेल्या मुंग्या कडे बोट दाखवून इशाऱ्यानेच काय घडले ते सांगितले... ती खुलली, कारण भान हरपून तिच्याकडे पाहणारा कोणीतरी ती प्रथमच पाहात होती.
              त्या दिवशी काय झाले तिला कोणास ठाऊक? पण तिला जिथे-तिथे तोच दिसत होता! तोच भासत होता! त्याचेच नाव सतत तिच्या नजरे समोर येत होते या सर्व गोष्टींमुळे ती सुखावत होती. त्याचेही यापेक्षा काही वेगळे नव्हते, कारण आधी फक्त तिच्या बद्दल विचार करणारा तो तिला डोळ्यांसमोर पाहून भारावून गेला होता. तिच्या हसण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा त्याला मोह झाला होता, पण तो मोह फक्त तिच्याबद्दलचे आकर्षण नसून तिच्या अस्तित्वाचा मोह होता तो. तिचे हसणे त्याचे आजवरचे दुःख विसरायला भाग पाडत होते, तिचे बोलणे त्याला नवीन उमेद देणारे होते, तिचे वागणे त्याच्यामध्ये जीवन जगण्याची ऊर्जा भरुन जात होते. आज त्याला आभाळ सुध्दा ठेंगणे वाटतं होते!
              उदया पुन्हा ती त्याला भेटली यावेळी त्यांनी मैत्रीचं नवीन नातं निर्माण केलं जे कधीही न संपणार होतं. त्यांनी या मैत्रीची सुरुवात एकमेकांची सुख-दुःख जाणुन घेउन करायची असं ठरवलं. तेव्हा प्रथमच ते दोघेही कॉलेज मधून बाहेर गेले, अनोळखी असूनही तिला त्याच्या सोबत सुरक्षित वाटतं होत हे विशेष!
              त्या पहिल्याच भेटीत त्यांनी आपलं मन एकमेकांसमोर मोकळं केलं... त्यानंतर त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तो जसा शांत आणि सालस होता, तसाच कणखर आणि भक्कम सुध्दा होता. त्याच त्याच्या आई-वडिलांवर निरागस आणि निःस्वार्थ प्रेम होत. त्याला कोणाकडूनही काही मिळावं अशी अपेक्षा नव्हती, याउलट याला सर्वांसाठी काही-बाही करायची मुलखाची हौस होती! तो फार कष्टाळू आहे, समंजस आहे हे सर्व जवळून पाहिल्यावर ती त्याच्या प्रेमात पडणं साहजिकचं होत. पण, तिने हे त्याच्या समोर लगेच व्यक्त नाही केलं कारण तिला त्याच्या मनात काय आहे हे माहित करुन घ्यायचं होत ना अजून!
            तो देखील तिच्याच विचारात गुंग होता. तिचा मनमोकळा स्वभाव, तिचं खिळवून ठेवणारं हास्य, तिची सर्वांना खुश ठेवण्याची धडपड, तिचा स्पष्टवक्तेपणा, तिचा राग आणि त्यामागील कारण, तिचे विचार हे सर्व-सर्व त्याला हवंहवंसं वाटत होत. मात्र तरीदेखील त्याची सुध्दा हिम्मत होत नव्हती तिच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची! आता मात्र दोघांसमोरही हेच संकट होते कि, कोण पहिले पुढाकार घेणार??? कारण, तिच्या मनात काय आहे? हे याला माहित नाही. आणि त्याच्या मनात काय आहे? हे तिला माहित नाही. शेवटी त्याने एक शक्कल लढवली! तो तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाला कि, "माझं एका मुलीवर प्रेम आहे पण मला ते तिच्या समोर व्यक्त नाही करता येत" हे ऐकून ती हिरमुसली. दुसऱ्या दिवशी ती, हा विचार करुन त्याच्याकडे गेली कि निदान माझे प्रेम मी व्यक्त नाही केले पण एक मित्र म्हणुन त्याचे प्रेम त्याला त्या मुली जवळ नक्की व्यक्त करायला सांगेन.
            आता मात्र त्याला जे हवे होते तेच झाले ती स्वतःहून त्याच्याकडे जाऊन त्या मुलीबद्दल विचारु लागली. त्याने तिला त्या मुलीचे खोटे नाव सांगितले. पण तिच्या स्वभावाचे वर्णन मात्र अगदी हुबेहूब स्मिताच्या स्वभावाला गृहीत धरुनच केले. तिला थोडा संशय आला खरा कि, कदाचित याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मीच आहे म्हणुन. पण हा संशय खरा करण्यासाठी तिने त्याच्याकडे हट्ट केला कि, आज काही झाले तरी चालेल मात्र तु त्या मुली समोर तुझं प्रेम व्यक्त करायचंच. आता जरा अवघड होऊन बसलं सारं! कारण तिच्या समोर प्रेम न व्यक्त करण्यामागचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे, तो त्याच्या घरच्यांना दुःखवू इच्छित नव्हता आणि फक्त टाईमपास म्हणुन प्रेम न करता त्याला तिच्या सोबत पुर्ण आयुष्य व्यतीत करायचं होत. पण तिचा हट्ट पाहता त्याने तिला अशी अट घातली कि, जेव्हा तिची मैत्रीण स्वखुशीने त्याच्या मित्राला होकार देईल. तेंव्हा तो त्याच्या मनातील मुलीला तिच्या विषयी वाटणाऱ्या प्रेमाची कबुली देईल. तिने हि अट मान्य केली. कारण, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची धमक तिच्यात होती. ती हे आव्हान पुर्ण करेल हे त्याला माहित होते. शिवाय कित्येक दिवसांपासून तिची मैत्रिण देखील त्याच्या मित्रावर प्रेम करत होती मात्र, समाजाला घाबरुन ती आपलं प्रेम व्यक्त करत नव्हती.
              ठरलं तर... तो दिवस होता ८ ऑक्टोबर शनिवारचा तिने तिच्या मैत्रिणीला खुप समजावले. जर खरंच तिच्या मनात त्या मुलाबद्दल प्रेमाची भावना असेल तर तिने त्याला तसं सांगावं उगाच लोकांच्या भीतीने आपलं मन मारु नये एवढंच तिचं म्हणणं होत तरी तिच्या मैत्रिणीने उद्या पर्यंत विचार करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने तिने तो मान्य केला.
               सोमवारी १० ऑक्टोबर २०११ चा तो दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून, लगबगीने सर्व आवरुन ती कॉलेज मध्ये गेली. तिच्या मैत्रिणीने त्याच्या मित्राला होकार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कॉलेज सुटल्यावर नदीकाठावर भेटायचे ठरवले. स्मिता व तिची मैत्रिण आणि राहुल व त्याचा मित्र चौघेही नदीकाठाजवळ पोहोचले. अखेर तिच्या मैत्रिणीने त्या मित्राला होकार दिला आणि त्याची अट पुर्ण झाली. स्मिता खुप खुश होती कारण, राहुल आता आपल्या मनातलं सर्वकाही तिला सांगेल असं तिला वाटतं होत. त्यामुळे कावरी-बावरी तिची नजर फक्त त्यालाच शोधत होती. मात्र तो तिला दिसलाच नाही. तो तेथुन निघुन गेला होता... हे समजता क्षणीच ती सुध्दा तेथुन निघुन जाऊ लागली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला मध्येच अडवून हे सांगितले कि, "स्मिता तो तुझ्यावर खुप प्रेम करतो पण तुला सांगू शकत नाही". हे ऐकल्यावर तर ती आणखीनच चिडली कारण, जी गोष्ट तिला सर्वात आधी कळायला हवी होती ती गोष्ट तिला सोडून वर्गात सर्वांनाच माहित होती. तिचा राग अनावर होऊन अश्रूंच्या रुपाने तिच्या गालांवर ओघळत होता. तश्या अवस्थेत ती बसस्टॉपवर येऊन पोहोचली. घरी जाण्यासाठी बसमध्ये चढणार तेवढ्यात, तो गाडी घेऊन तिच्या समोर आला तिचे ओलावलेले डोळे त्याला अपराधीपणाची जाणीव करुन देत होते. तरी सुध्दा त्याने धीर करुन तिला गाडीवर बस म्हणुन सांगितले तिने नकार देऊन तेथून जाण्याचा प्रयत्न केला.  तसा तो खाली उतरुन तिच्याजवळ गेला आणि विनंती करुन म्हणाला, "स्मिता फक्त ५ मिनटे दे तुझी मला, तुझ्यासोबत खुप महत्वाचं बोलायचं आहे" तेव्हा तिने फार आढे-वेढे न घेता त्याच्या सोबत जाण्यास होकार दिला.
              तो तिला कॉलेज पासुन थोड्याच अंतरावर असलेल्या एका शांत ठिकाणी घेऊन गेला आणि म्हणाला, "स्मिता मला तु खुप आवडतेस. अगदी कॉलेज सुरु झालेल्या पहिल्या दिवसापासून आवडतेस पण, कधीच तुला हे सांगण्याची हिम्मत झाली नाही. कारण कदाचित तुझा नकार मला सहन झाला नसता आणि होकार मला माझ्या आई-वडिलांच्या विचारानंमुळे नकोसा होता. आता तुच सांग मी काय करु? मला तुझं प्रेम नाकारताही येत नाही आणि ते स्वीकारुन मी घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न सुध्दा नाही करु शकत अश्या दुहेरी भुमिकेत मला तुझ्या आयुष्याचा खेळ करायचा नाहीये. पण खरंच तु मला माझ्या आयुष्यात हवी आहेस." त्याचं हे बोलणं ऐकून तिला गहिवरुन आलं. ती त्याला म्हणाली, "राहुल तुला जे काही आत्ता वाटतंय ते सर्व कळतंय मला कारण मी सुध्दा त्याच मनःस्थितीत आहे सध्या! मला देखील तु खुप आवडतोस.  जीवनात जोडीदार म्हणुन मलाही तुझीच साथ हवी आहे पण, मी देखील माझ्या घरच्यांना दुखावून तुझ्या सोबत नवीन जग नाही निर्माण करु शकत.  मात्र, या सर्व कारणांमुळे आपण आपली आवडचं नाकारावी का? जर पुढे जाऊन आपण आपल्या पायावर उभे राहिलो आणि यशस्वी झालो तर आपण आपल्या घरच्यांना एकमेकांबद्दल समजावुन सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नक्की करु शकतो असं मला वाटतं.
            तिचे बोलणे योग्य आहे असे समजल्यावर त्याने आपला हात पुढे करुन तिला आयुष्यभराची सोबत मागितली. तिने देखील स्वतःचा हात त्याच्या हातात देऊन ती सोबत देण्याचे वचन त्याला दिले. हि तर फक्त सुरुवात होती त्यांच्या अथांग प्रेमाची... त्या दिवसानंतर चांगल्या-वाईट अश्या सर्वच प्रकारच्या किती-तरी गोष्टी घडल्या मात्र त्यानंतरही त्यांच  प्रेम वादळात सुध्दा भक्कम असणाऱ्या एखादया वृक्षासारख आहे . जे दिवसें-दिवस बहरत आहे, ज्याला कशाचीही तमा नाही ते सर्व काही सहन करुन खंबीरपणे उभं आहे. ना त्याला भूतकाळाची खंत आहे! ना भविष्यकाळाची चिंता! ते फक्त वर्तमानाचा आनंद घेत आहे...

9145345627

Re: एक सुंदर प्रेम कथा...
« Reply #1 on: January 26, 2017, 01:49:49 PM »
i like very much;because i also experience about this

Smitul

Re: एक सुंदर प्रेम कथा...
« Reply #2 on: May 16, 2017, 04:46:31 PM »
Thanks !!!