Manasi

बहिणाबाई चौधरी
« on: January 28, 2012, 05:18:51 PM »
बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'अहिराणी' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.

बहिणाबाईंची प्रसिध्द कविता ..... =>

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

-----------------------------------------------------------------------------------------------

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।

अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।

अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।

अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।

एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।

देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।

अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।

असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।

--बहिणाबाई चौधरी
बहिणाबाईची कविता

आणखी काही कवितांच्या ओळी :

१.

सोन्यारूपान मढला, मारवाड्याचा बालाजी ।

शेतकऱ्याचा इठोबा, पानाफूलामधी राजी । अरे बालाजी-इठोबा, दोन्ही एकज रे देव ।

गरीबीनं सम्रीतीनं, केला केला दुजाभाव ।

२.

बापा नको मारू थापा,

असो खर्‍या, असो खोट्या ।

नाही नशीब नशीब,

तय हाताच्या रेघोट्या ।

नको नको रे जोतिष्या,

नको हात माझा पाहू ।

माझं दैव मला कये,

माझ्या दारी नको येऊ ।

३.

येरे येरे माझ्या जिवा,

काम पडलं अमाप ।

काम करता करता,

देख देवाजीचं रूप ।

अरे खोप्या मध्ये खोपा अरे खोप्या मध्ये खोपा , सुगारानिचा चांगला , देखा पिलासाठी तीन , झोका झाडाला टांगला , पिल निजली खोप्यात , जसा झुलता बंगला , तिचा पिलान्माधी जीव , जीव झाडाले टांगला , खोपा आणला आणला , जसा गिलक्याचा कोसा, पाखरांची कारागिरी, जरा देखरे माणसा, तिची एवूलीशी चोच, तेच दात तेच ओठ, तुले देलेरे देवान, दोन हात दहा बोट

Manasi

Re: बहिणाबाई चौधरी
« Reply #1 on: January 28, 2012, 05:30:41 PM »
बहिणाबाई नथूजी चौधरी ( full name : bahinabai chaudhari - bahinabai Nathuji chaudhari)


आपला जीवनानुभव परिपूर्णतेने अभिव्यक्त करत, वैश्र्विक सत्यही अगदी सहजतेने उलगडणार्‍या महाराष्ट्रातील श्रेष्ठतम कवयित्री!
महाराष्ट्रातील खानदेश (उत्तर महाराष्ट्र) या भागातून अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे एक काव्य-रत्न आपल्याला लाभले. आजपर्यंत भल्या भल्या कवींना, पंडितांनाही साधलेली नाही अशी अभिव्यक्ती साधणारी, अशी काव्यरचना सहज उत्स्फूर्तपणे करणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी होत. ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.

खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्‍यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

उदा.    ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी)
देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.’

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदु:खांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.

‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’   

किंवा

‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’

अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द लिहायला दैवी प्रतिभाच लागते. ती त्यांच्यात होती हे त्यांचे काव्य वाचताना क्षणोक्षणी जाणवते.

बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे खरं तर कारणीभूत ठरले. एखाद्या जातिवंत हिर्‍याला जाणकार जोहरी भेटावा तसा हा साहित्यक्षेत्रात रत्नकांचन योग घडून आला.  बहिणाबाईंचे सुपूत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. सहज म्हणून, अत्रे यांच्याशी जवळून परिचय असल्याने भीत भीतच हे हस्तलिखित त्यांनी अत्रे यांना दाखवले. ते वाचून, चाळून झाल्यावर अत्रे त्यांच्या स्वभावानुसार त्यांना मोठ्याने म्हणाले - ‘अहो, हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’ आणि खरंच बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर वाटतं, जर या कविता जगासमोर आल्या नसत्या, तर एका फार मोठ्या प्रतिभासंपन्न कवयित्रीला, तिच्या कवितेला आपण मुकलो असतो.

संत कबीरांच्या दोह्याप्रमाणेच बहिणाबाईंचे काव्यही सर्व स्तरांवर जीवन जगणार्‍या रसिकांना भारावून टाकते. साधूसंतांना तपस्येनंतर जे जीवनाचे शहाणपण, तत्त्वज्ञान सापडते तेच त्यांच्या काव्यातही सापडते.

‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’       

किंवा

‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’

एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (अन् कमी) शब्दांत सहजपणे सांगून जातात. त्यांच्या काव्यप्रतिभेला खरंच सलाम करावासा वाटतो. अशी कवयित्री महाराष्ट्रात जन्माला आली, आणि अशी अद्भूत प्रतिभा महाराष्ट्राच्या मातीत बहरली हे आपले महत्भाग्यच!                                         

simran254

Re: बहिणाबाई चौधरी
« Reply #2 on: June 24, 2022, 11:49:35 AM »
 मराठी लेखक , कवी,marathi kavi,marathi writer, Marathi Kavita ,मराठी कविता ,