teju4u

नारायण श्रीपाद राजहंस Narayan Shripad Rajhans (Bal Gandharva / Balgandharva बालगंधर्व) (१८८८  - १९६७ )



नारायण श्रीपाद राजहंस (१८८८-१९६७) : बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते

जन्म
नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला.

जीवनपटबालगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत.कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये झाली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.

बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.

भाऊराव कोल्हटकरांच्या १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्वाचे कार्य केले. १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. १९४० मध्ये नारायणरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला. गोहरबाईंनी त्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळण्यातही सहभाग दिला. १९५१ मध्ये नारायणरावांनी गोहरबाईंशी कायदेशीर रीतीने विवाह केला.

त्यांनी संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

 निधन१९६७ मध्ये बालगंधर्वांचे निधन झाले.

बालगंधर्व रंगमंदिर१९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतीमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्याहस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते.[३]

पुरस्कारबालगंधर्वांचा संगीत १९५५ साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
भारत सरकारनी बालगंधर्वाना १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.

 चरित्र
Bal Gandharva: The nonpareil thespian - लेखक- मोहन नाडकर्णी १९८८

चित्रपट
नितीन देसाई यांनी निर्मित बालगंधर्व या चित्रपटाचे चित्रबालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास २००२ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
बालगंधर्वांच्या जीवनप्रवासावर नितीन देसाई यांनी ' बालगंधर्व ' या चित्रपटाची निर्मिती २०११ साली केली. या बालगंधर्वांची भुमिका अभिनेते सुबोध भावे यांनी साकारली आहे.

बालगंधर्व हे नाव उच्चारताच मराठी मन अभिमानाने, आदराने भरून जाते. त्यांना न पाहिलेल्या, न एएकलेल्या माणसांनाही बालगंधर्व म्हणजे एक स्वर्गीय कल्पना, विस्मयानंद देणारी दैवी आकृती वाटावी, यातच त्यांचे सारे कर्तृत्व सामावले आहे. अर्वाचीन महाराष्टृच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांच्या कर्तृत्वाचा सिंहाचा वाटा आहे, अशा बालगंधर्वांच्या कार्याचा परिचय, बालगंधर्व - व्यक्ती आणि कार्य या पुस्तकाद्वारे मोहिनी वर्दे यांनी करून दिला आहे.

मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिताना ज्यांच्या नावाने काही सोनेरी पाने खर्ची पडावीत, नाटयसंगीतावर ज्यांच्या नावाची मुद्रा उमटावी, रंगभूमीवरील एक कालांश ज्याच्या नावाने, गंधर्वयुग म्हणून ओळखला जावा, असे बालगंधर्व! पुस्तकाच्या सात प्रकरणांमध्ये बालगंधर्वांच्या व्यावसायिक जीवनाची घडण, मराठी रंगभूमीची, नाटयसंगीताची परंपरा, गंधर्वांची गायकी व अभिनय, त्यांचे व्यक्तिमत्त्व या सार्‍यांचा विचार लेखिकेने केला आहे. शिवाय मराठी समाजाचं रंगभूमीशी नातं सांगणारं परिशिष्ट, गंधर्वांचा जीवनपट, त्यांच्या भूमिकांची सूची, ध्वनिमुद्रिकांची सूची, अशा पूरक माहितीने आपले विवेचन अधिक यथार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे.
उचित गौरव

महाराष्टृचं आणि नाटकाचं सख्य फार जुनं. मराठी समाजाच्या नाटयवेडाची ख्याती सर्वत्र पसरलेली. मराठी संस्थानिकांप्रमाणे सामान्य रयतेनंदेखील रंगभूमीला कुवतीप्रमाणे आश्रय दिलेला. अशा या रंगभूमीवरील कलारत्नांपैकी एक अनमोल रत्न म्हणून बालगंधर्वांचा उचित गौरव येथे केलेला दिसतो.
बालगंधर्वांच्या काळापर्यंत मराठी रंगभूमीची जी परंपरा चालत आलेली होती, ती गद्य-पद्यमय अशीच होती. सातवाहनांच्या काळातील गाथा सप्तशतीपासून ते थेट सोंगी भजनांद्वारा लोककलांच्या माध्यमांतून संगीत नाटकांपर्यंतची, म्हणजे १९व्या शतकापर्यंतची, परंपरा सांगून १९४३मध्ये झालेल्या विष्णुदास भाव्यांच्या सीतास्वयंवर या आख्यानाच्या नाटयरूप प्रयोगापर्यंत लेखिकेने संगीत रंगभूमीचा आढावा घेतला आहे.
सन १८५७ नंतरचा काळ देशात अस्थिरतेचा असला, तरी विष्णुदास भाव्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्टृत नाटकमंडळया सुरू झाल्या होत्या. १८८०मध्ये किर्लोस्करांनी परिपूर्ण स्वरूपाचे लिखित संगीत नाटक मराठी रंगभूमीवर दिमाखात उभे केले. तेव्हापासून सुरू झालेली संगीत नाटकांची परंपरा बालगंधर्वांच्या काळापर्यंत चांगली बहरली आणि बालगंधर्वांनी ती कळसास पोचवली.

बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत नट म्हणून, १९०५मध्ये, रीतसर प्रवेश केला. आरंभी देवलमास्तरांनी त्यांना अभिनयाचे धडे कसे दिले, याचे वर्णन मनोरंजक आहे. भाऊसाहेब कोल्हटकरांनी वा इतरांनी केलेल्या भूमिका करणारे बालगंधर्व हळूहळू स्वत:च्या भूमिकांचा विचार करू लागले. नारायणरावांच्या वयाच्या १०व्या वर्षी टिळकांनी त्यांचं गाणे एएकून बालगंधर्व ही पदवी त्यांना दिलेली होतीच. आता जाणीवपूर्वक आपलं गाणं वाढवणं आणि अभिनयाच्या कक्षा विस्तारणं यावर नारायणरावांनी भर दिला.

इतिहास घडविणारे नाटक

खाडिलकरांच्या मानापमानाचा पहिला प्रयोग १९११मध्ये झाला आणि या नाटकाने नवा इतिहास घडवला. खाडिलकरांनी प्रथमच नाटकासाठी पदे लिहिली. संगीत दिग्दर्शक हे नवीन पद, काम तयार झाले. पहिले रोमॅंटिक संगीत नाटक रंगभूमीवर आले. त्यातील भामिनीची भूमिका बालगंधर्वांनी स्वत:च्या पद्धतीने परिणामकारक केली आणि रंगभूमीवर आपले स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. तेथपासून त्यांचं व्यावसायिक जीवन वेगवेगळी वळणं घेत गेलं, त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात चढउतार येत राहिले आणि स्वाभाविकपणे ते एकमेकांवर परिणाम करीत राहिले.
प्रेक्षकांना मायबाप मानणार्‍या बालगंधर्वांनी गंधर्व नाटकमंडळींद्वारे प्रेक्षकांसमोर अधिकाधिक उत्तम प्रकारचा अभिनय व गाणं यांचं दर्शन घडवलं. राजस रूपसंपदा, गाण्यातील नवनवोन्मेषशाली सौंदर्य आणि कलात्मक अभिनयशैली या गुणत्रयीच्या जोरावर त्यांनी सर्व स्तरांतील प्रेक्षकवर्ग जिंकला.

बालगंधर्वांच्या पूर्वी भाऊराव कोल्हटकर, गोरे यांच्यासारखे गायकनट होते. स्त्रीपात्रे रंगवणारे नट होते. त्यांना त्यांचं त्यांचं महत्त्व होतं. पण त्यापेक्षा बालगंधर्वांचं वेगळेपण कशात होतं, त्यांच्या गायकीचं वैशिष्टय कशात होतं याचं नेमकं वर्णन लेखिकेनं केलं आहे. बालपणापासून गाण्याचा कान असलेल्या नारायणाने आपलं गाणं अधिक चांगलं कसं होईल याचा विचार करीत कसकशी मेहनत घेतली, प्रत्येक प्रयोगाच्या वेळचं गाणं कसं चढत जाईल याचा कसा अभ्यास केला, त्याचं वर्णन फार मनोरंजक आहे. लेखिकेची गाण्याची समज आणि विषयाचा अभ्यासही यातून स्पष्ट जाणवतो. अचूक स्वरज्ञान, जरूर तेव्हा रागांचं मिश्रण, रसाविष्कार होईल अशा पद्धतीने शब्दोच्चारण अशा अनेक गुणांनी गंधर्वांचं गाणं खुले. याची अनेक उदाहरणं, वेगवेगळया गाण्यांच्या निमित्तानं, लेखिकेने दिलेली दिसतात. ‘बालगंधर्वांच्या गायनाच्या लोकप्रियतेने, त्यातील माधुर्याने तिलककामोद, यमन यांसारख्या काही रागांना गंधर्वचलनच मिळून गेले,’’असे जे विधान लेखिका करते ते या सार्‍या विवेचनानंतर समर्पक वाटते.

पराकायाप्रवेशच!

बालगंधर्वांच्या गायकीबद्दल फारसे दुमत नसले, तरी त्यांच्या स्त्रीभूमिका, त्यामधील अभिनय याबद्दल मात्र काही आक्षेप घेतले गेले. परंतु त्यांच्या अभिनयाचा, वेशभूषेचा, त्यांनी अभिनीत केलेल्या स्त्रीत्वाच्या आदर्शाचा विचार हा त्या काळातील रंगभूमीच्या संदर्भात केला पाहिजे, असे सांगून लेखिका म्हणते की, बालगंधर्वांचं सात्विक व्यक्तिमत्त्व, या भूमिकांना शोभेसं होतं. त्यांच्या स्त्रीभूमिका म्हणजे त्यांचा परकायाप्रवेशच होता.
बालगंधर्वांचा व्यक्ती म्हणून विचार करताना त्यांचे सारे जीवन हे रंगभूमीमय झाले होते, आपले जीवितकार्य रंगभूमीची सर्वस्वाने सेवा हेच मानले असे लेखिका म्हणते. उतरत्या वयात बदलत्या परिस्थितीशी, नवीन कलामाध्यमांशी त्यांना जुळवून घेता येईना. त्यामुळेच गोहरबाईंच्या रूपाने त्यांना जणून स्वत:चेच अस्तित्व पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटले. आपल्या कलाजीवनाची व खाजगी जीवनाची सूत्रे त्यांनी या झपाटलेल्या अवस्थेत गोहरबाईंच्या हाती दिली, असा अन्वयार्थ लेखिकेने लावला आहे. तो गंधर्वांच्या कलावंत व्यक्तित्वाचं उचित आकलन करून देणारा वाटतो.
जिवंतपणी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एका मिथ चे स्वरूप प्राप्त झाले, त्या बालगंधर्वांचा हा आटोपशीर, नेमक्या शब्दांतील परिचय, त्यांच्या कार्याचं योग्य मूल्यमापन करणाराच वाटतो.

------------------------------------------------------------------------------------------
नारायण श्रीपाद राजहंस Narayan Shripad Rajhans (Bal Gandharva / Balgandharva बालगंधर्व)
-----------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी लेखक ,मराठी कवी ,मराठी लेखिका , मराठी कवयत्री , मराठी नाटककार , मराठी अभिनेता , मराठी अभिनेत्री , मराठी गीतकार , मराठी संगीतकार ,मराठी साहित्यिक , मराठी साहित्यकार , गायक , मराठी गायिका ,निर्माता, मराठी निर्देशक ( Marathi lekhak , Marathi lekhika , Marathi kavi , Marathi kavayatri, Marathi gayak, Marathi gayika, Marathi geetkar , Marathi gitkar , Marathi sangeetkar, Marathi sangitkar, Marathi abhineta , Marathi abhinetri , Marathi natakkar, Marathi nirmata, Marathi nirdeshak, Marathi sahitik , Marathi sahittik , Marathi sahityakar)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Manasi

सांस्कृतिक पुण्याचे केंदबिंदू मानले जाणारे बालगंधर्व रंगमंदिर येत्या २६ जून रोजी चाळीशी पूर्ण करत असून बालगंधर्व उर्फ नारायणराव राजहंसांचा तो १२० वा जन्मदिन आहे. याचे औचित्य साधून नाटक, लावणी, संगीत अशा विविध क्षेत्रातील कलावंतांनी मिळून बालगंधर्व रंगमंदिर परिवाराची स्थापना केली आहे. २५ आणि २६ जून रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बालगंधर्व यांच्या दुमिर्ळ छायाचित्र तसेच वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित करण्यात

येत आहे.

खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्याहस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते. ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. पुणे महापालिकेने यानिमित्त घालून दिलेला 'बालगंधर्व रंगमंदिर पॅटर्न' महाराष्ट्रातील इतर महापालिकांनी राबवला, असे या परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि ज्येष्ठ व्यवस्थापक प्रदीपकुमार कांबळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात २५ जून रोजी २५ गायक आपली कला सादर करणार आहेत; तर एकपात्री तसेच विनोदी एकांकिका, लावणी कार्यक्रम, जुन्या मराठी हिंदी गाण्यांचे सादरीकरण, कलावंत रजनी या कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिर, कलावंतांची आरोग्य तपासणी आणि नेत्रचिकित्सा करण्यात येणार आहे. तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

बालगंधर्व ते महापालिका अशी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रमेश देव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. श्रीराम लागू, चित्तरंजन कोल्हटकर, जयमाला शिलेदार इत्यादींना सहभागी करण्यात येणार आहे. बालगंधर्व पुरस्कार वितरणाबरोबर 'बालगंधर्व'च्या सेवकवर्गाचाही सत्कार करण्यात येणार आहे.

' गंधर्व नगरी' ही स्मरणिका काढण्यात येत असून त्याचे प्रकाशन बालगंधर्वचे बांधकाम करणारे ज्येष्ठ उद्योजक बी. जी. शिकेर् यांच्याहस्ते करण्याची योजना आहे, असे संपादक आणि 'संवाद' या संस्थेचे सुनील महाजन यांनी सांगितले. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या पायाभरणीपासून अनेक दुमिर्ळ फोटो, तसेच बालगंधर्वांच्या नातसून अनुराधा राजहंस, ज्येष्ठ निर्माते मोहन वाघ तसेच प्रा. प्रकाश भोंडे इत्यादींचे त्यात लेख आहेत.

...

' जीवनात निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम दर्जाचं काम करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळते. पण विभूतिमत्व मिळतंच असं नाही. कुणी कुणाला उचलून द्यायची ती पदवी नव्हे. विभूतिमत्वाच्या देवाण-घेवाणीची तिथे सांगता नसते. बालगंधर्वांना असं विभूतिमत्व लाभलं, तेदेखील अशा काळात, जेव्हा ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेने पाहिलं जायचं. याचं रहस्य शोधून काढण्याचा अनेक कलावंतांनी, समीक्षकांनी प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या अभिनयाचं, गायनाचं विश्लेषण करणारे, त्यांच्या उणिवा अधोरेखित करणारे लेख लिहिले.. भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावली. एवढं करूनही या कलावंताच्या विभूतिमत्वाचं रहस्य त्यांच्या हाती लागल्याचं पूर्ण समाधान कुणाला मिळालं असेल असं वाटत नाही.' हा तुकडा आहे पु. ल. देशपांडे यांच्या बालगंधर्वांवरच्या लेखातला.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पुलंसाठी दोन माणसं पूजनीय होती. पहिला चालीर् चॅप्लिन आणि दुसरे : नारायणराव राजहंस तथा बालगंधर्व. चॅप्लिनविषयी असंख्य दस्तावेज उपलब्ध असल्यामुळे त्याचं काम पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित झालं. दुदैर्वाने, बालगंधर्वांचं काम गंधर्वकाळापुरतं उरलं. त्यांच्याबाबत लिखाण उपलब्ध असलं, तरी त्यांचं योगदान 'याचि देही याचि डोळा' न पाहता आल्याने, मराठी मनात गंधर्वकाळ हा केवळ परीकथा बनला. नितीन देसाईनिमिर्त रवी जाधवदिग्दशिर्त 'बालगंधर्व'मुळे नारायणराव राजहंस ही श्रेष्ठ विभूती आणि त्यांचं योगदान पुन्हा उजळून निघेल. हे या कलाकृतीचं मोठं सामाजिक योगदान आहे.

बालगंधर्वांचा जीवनप्रवास ही या सिनेमाची वन लाइन म्हणता येईल. लहानग्या नारायणाचं गाणं ऐकून प्रभावित झालेले लोकमान्य टिळक त्याला बालगंधर्व ही पदवी देतात आणि सिनेमा वेग पकडू लागतो. कलाकार म्हणून राजमान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या सुख-दु:खाचा आणि संघर्षाचा वेध घेत सिनेमा शेवटाकडे येतो. गंधर्वांचा जीवनप्रवास दाखवल्यामुळे त्यांचा शेवट दिग्दर्शकाने नेमका कसा दाखवलाय, याची उत्सुकता 'जाणकारा'ला लागतेच. पण, कोणत्याही वादात न पडता दिग्दर्शकाने शेवट साधला आहे.

सिनेमाचं मुख्य आकर्षण अर्थातच सुबोध भावे हेच आहे. त्याने साकारलेली बालगंधर्वांची भूमिका ही त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल. अत्यंत कष्टाने आणि प्रामाणिकपणे त्याने ती निभावलीय. भामिनी, सिंधू, रुक्मिणी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तो विलक्षण सुंदर दिसतो. याचं श्रेय रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना द्यावं लागेल. पहिली मुलगी गेल्यानंतरही प्रयोग करण्याचा बालगंधर्वांचा निश्चय आणि ऐन प्रयोगात 'नाही मी बोलत..' वेळी नवरा-एक बाप म्हणून त्याने दाखवलेली व्याकुळता प्रेक्षकाच्या थेट मनात घुसते. अशा अनेक प्रसंगांमध्ये सुबोध खूप सूक्ष्म व्यक्त झालाय. रसिकांच्या मनोरंजनात कसूर न ठेवण्याबाबत कठोर असलेला ऐश्वर्यसंपन्न नारायण आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचं आयुष्य जगणारे, सिनेमाच्या आगमनाने काळाआड लुप्त होत जाणारं संगीत नाटक हताशपणे पाहणारे बालगंधर्व हा व्यक्तीआलेख सुबोधने प्रामाणिकपणे साकारलाय. त्यासाठी त्याला सहकाऱ्यांचीही उत्तम साथ लाभलीय. विभावरी देशपांडेने (बालगंधर्वांची पत्नी लक्ष्मी) आपली व्यक्तिरेखा खूप समंजसपणे साकारलीय. कलासक्त बालगंधर्वांना व्यवहारात रुची नसल्याने पत्नी म्हणून होणारे क्लेश तिने समर्पक मांडलेत. याशिवाय किशोर कदम (गणपतराव बोडस), अविनाश नारकर (बाळासाहेब पंडित), अभिजीत केळकर (सदुभाऊ रानडे), सिद्धार्थ चांदेकर (महादेव अभ्यंकर), सुहास जोशी (बालगंधर्वांची आई) यांनीही आपल्या भूमिका उत्तम साकारल्यात. प्रचिती म्हात्रेने साकारलेली गोहरबाईची छोटी भूमिकाही ठाम लक्षात राहते. याशिवाय केशवराव भोसले, राजषीर् शाहू महाराज, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्ही. शांताराम या सर्वांच्या व्यक्तिरेखा मनात ठसतात.

ही कलाकृती चांगली होण्याला कथा, पटकथा, संवाद लिहिणारे अभिराम भडकमकर, दिग्दर्शक रवी जाधव आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांचा मोठा वाटा आहे. बालगंधर्वांचं जीवनदर्शन त्यांच्या संगीत रचनांसह सिनेमाच्या दोन तासांत बसवण्याचं मोठं काम भडकमकर यांनी केलं. १६ नाट्यगीतं असूनही सिनेमा रेंगाळत नाही, हे दिग्दर्शकाचं कसब. पण वेळेची मर्यादा पाळण्यासाठी दिग्दर्शकाला अनेक गोष्टी टाळाव्या लागल्याचं जाणवतं. उदाहरणार्थ, सिनेमाची सुरुवात नारायणाच्या मैफलीपासून होत असली, तरी पुढच्या काही मिनिटांतच तो मोठा होऊन स्त्री रुपात लोकांसमोर येतो. त्याच्या ट्रीटमेण्टवेळी 'नटरंग'ची आठवण होते. दरम्यान, दोन सीनमध्ये एकदम ढगाआड जाणाऱ्या सूर्याचा कट आहे, तो कशासाठी, हेही अनाकलनीय. नाट्यगीतांचं आणि सिनेमातल्या प्रवेशांचं असलेलं कनेक्शन दिग्दर्शकीय कौशल्याचा प्रत्यय देतं. सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यावरची कव्वाली आहे अफलातून. पण, त्या गाण्याची नेमकी गरज लक्षात येत नाही. अशा काही बाबी सोडल्या तर दिग्दर्शकाने हे धनुष्य नीट पेललंय. त्यावर महेश लिमयेने कळस चढवलाय. त्याची प्रत्येक फ्रेम हे पेण्टिंग वाटतं. मध्यंतरापूवीर् बालगंधर्वांचा आत्मविश्वास दाखवण्यासाठी पाऊस आणि प्रकाशाच्या मदतीने सुबोधच्या सावलीबरोबर त्याने केलेल्या खेळाला तोड नाही. कथानकाच्या वेगाशी त्याने आपला कॅमेरा सुसंगत ठेवलाय. सातत्य बिघडू न देता, जीवनप्रवास दाखवण्यासाठी सर्वाधिक कष्ट संकलनाला पडले हे उघड आहे. काही वेळेला संकलकाला टाळाव्या लागलेल्या गोष्टी उघड होतात, पण हरकत नाही. त्यांनी आपलं काम चोख केलंय. बालगंधर्वांच्या रचनांवर कौशल इनामदारने चढवलेला साज अविस्मरणीय आणि नेमका. या संगीताने आनंद भाटेसारखा घोटीव लयकारी लाभलेला गायक दिलाय. कौशलने दिलेलं पार्श्वसंगीतही उत्तम. या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे सिनेमा चांगला झालाय. सिनेमा संपल्यानंतर टायटल्स पडताना दिग्दर्शकाने फोटोंमधून घडवलेल्या बालगंधर्व दर्शनानेही अंगावर रोमांच उभे राहतात.

कॉमेडीच्या आजच्या जमान्यात गंधर्वकाळ साकारणं हे आवाक्याबाहेरचं काम आहे. या सिनेमामुळे आजच्या पिढीला बालगंधर्व समजतील तरी. त्यांचं योगदान, एका विभूतीची कलेसाठी असलेली बांधिलकी समजेल, बऱ्याच वर्षांनी लोकांच्या ओठी गंधर्वसंगीत रेंगाळेल. बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकप्रेमाची किमान ओळख घडेल. त्यामुळे कलाकृती म्हणून सिनेमामध्ये काही त्रुटी असतीलही, पण या सिनेमाचं आज असलेलं सामाजिक महत्त्व त्यापेक्षा अधिक पटींनी मोठं आणि गहिरं आहे. कुवतीपलीकडे टाकलेलं एक छोटं पाऊल मोठा इतिहास घडवतं, असं विजय तेंडुलकर म्हणायचे. 'बालगंधर्व' हे कुवती पलीकडचं पाऊल आहे. पुढचा हा एक स्टार या धाडसासाठी!

marathiadmin


Chota Kavi

 मराठी अभिनेता , Marathi abhineta , Marathi actor ,बालगंधर्व ,Bal Gandharv,नारायण श्रीपाद राजहंस,नारायण श्रीपाद राजहंस