Vinit Dhanawade

 आणि त्या सर्वांचा प्रवास सुरु झाला एकदाचा. आलेले वादळ थांबलेलं होतं तरी ढगांची पुन्हा तयारी सुरु झालेली होती. आकाशचे लक्ष होतं बरॊबर त्या सगळ्यावर, शिवाय पाठीमागून येणारे हे "२० जण "...... सगळ्यांवर लक्ष तर ठेवावंचं लागणार होतं. अर्धा तास झाला असेल चालून त्यांना. अचानक मागून एक मुलगी किंचाळली. " ई !!!......... " सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं तिने. "काय झालं ...... काय झालं ...... ? " संजना धावतच तिच्या जवळ गेली. एव्हाना सगळेच जमा झालेले तिच्या भोवती. "साप.... " तिने डोळे गच्च मिटून घेतले होते. आणि तशीच बोलत होती ती. " कुठे आहे साप ? " आकाश पुढे आला. ती तरी तशीच डोळे मिटून, " कुठे आहे साप ? " आकाशने पुन्हा विचारलं. " माझ्या पायावर..... " हळू आवाजात ती म्हणाली.

                   आकाशने निरखून पाहिलं. तसे सगळेच हसायला लागले. सुप्री पुढे आली आणि तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली,
" खुळे... या प्राण्याला गांडूळ म्हणतात... साप नाही." तिने गांडूळ बोटांनी उचलून घेतला. " आणि याला खाऊ पण शकतो आपण..... ते नाही का, discovery channel वर दाखवतात... तो माणूस बोलतो ना... " हा... हम इसे खा भी सकते है, इससे मुझे प्रोटीन मिलेगा... " आणि सुप्री ने गांडूळ खाण्याची acting केली. तसं संजनाने तिच्या हातावर चापटी मारली.
"ये खुळे..... कधी सुधारणार तू कळत नाही मला." संजना म्हणाली.
" तू सुधारलीस कि माझाच नंबर आहे तुझ्यामागे.... " सुप्री तिला चिडवत म्हणाली.
आकाश हे सगळं पाहत होता. मज्जा- मस्करी... छान वाटत होतं त्याला. सगळ्यांकडे नजर टाकली त्याने. फक्त अर्धा तास चालून सगळेच दमलेले होते. शहरात कुठे सवय आहे चालायची लोकांना..... बस, ट्रेन,रिक्शा, टॅक्सी.... नाहीतर स्वतःच वाहन... सगळं कसं आरामदायी एकदम.... आकाश मनातल्या मनात बोलला. घड्याळात पाहिलं तर दुपारचे २.३० वाजले होते.

" ok, छान..... सगळे रिलॅक्स झालात जरा... तुम्ही सगळेच दमलेले दिसता, तर आता इकडेच थांबू कुठेतरी.... उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघूया." सगळ्यांना पटलं ते, सुप्री सोडून.
"ओ, मिस्टर A.... म्हणे मी भटकंती करत असतो इकडेच... ह्याव आणि त्याव.... अर्ध्या तासातच दमलात चालून ..... असं चालत राहिलात तर आम्ही कधीच पोहोचणार नाही शहरात... " सुप्री आकाशच्या समोर येऊन उभी राहिली.... आकाशच्या चेहऱ्यावर '' आता हिला काय बोलू मी" असे भाव...
"बोलो मिस्टर A, कुछ तो बोलो... " शेवटी आकाशने पाठीवरची सॅक खाली ठेवली आणि बोलू लागला.
" पहिली गोष्ट, तुमचे हे सर्व सहकारी आहेत ना,ते सगळे दमलेले आहेत.... दुसरी गोष्ट, आता थोड्यावेळाने संध्याकाळ होऊन रात्र होईल... त्यात तुमच्या कोणाकडे साधे टॉर्च सुद्धा नाहीत... त्या मॅडम... गांडूळाला साप समजल्या.., एवढ्या उजेडात.. मग काळोखात काय दिसेल त्यांना.... आणि तिसरी गोष्ट, पावसाची पुन्हा तयारी सुरु झाली आहेत वर आभाळात, तुम्हाला एवढीच हौस असेल ना भिजायची पावसात वगैरे, तर बाकीच्यांना तयार करा... आपण प्रवास सुरु ठेवू. " केवढा बोलत होता आकाश. पहिल्यांदा एवढा पटपट बोलला असेल तो. सुप्री बघतच राहिली त्याच्याकडे. अर्थात तिला कळलं कि सगळेच थकले आहेत. त्यामुळे प्रवास आतातरी शक्य नाही. त्यात पाऊस येतंच होता सोबतीला. चुपचाप ती संजनाच्या बाजूला जाऊन बसली. " मी पुढे जाऊन, आपल्याला tent साठी जागा बघून येतो. सर्वानी इथेच थांबा." म्हणत आकाश निघून गेला.


५-१० मिनिटांनी आकाश परत आला. त्यानी त्याची सॅक पाठीवर लावली आणि म्हणाला,
" पुढे एक चांगली जागा भेटली आहे. तिथे आपण tent बांधू शकतो." तसे सगळे सामान घेऊन निघाले. मघापासून मोकळ्या जागेतून प्रवास करणारे, आता एका झाडं-झुडुपं असलेल्या ठिकाणी आले.
" ओ... इथे कुठे आणलंतं... काय झाडावर लावणार का तंबू... ?" सुप्रीने आकाशला विचारलं. आकाशने काहीच reply दिला नाही. " सगळ्यांनी सावकाश या आतमध्ये...पाय जपून ठेवा... बघून चाला." आकाश सगळ्यांना सांगत होता. अरे !! हा माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही, सुप्रीला राग आला. झपझप चालत ती आकाशच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. " मी काहीतरी विचारलं तुम्हाला... " आकाश फक्त बाकी सर्व बरोबर आहेत कि नाही ते बघत होता. संजना पटकन पुढे आली आणि सुप्रीला तिने ओढतच पुढे नेले. आकाशला गंमत वाटली.

                          आकाशने सांगितल्याप्रमाणे, सगळा ग्रुप एका ठिकाणी येऊन पोहोचला. आजूबाजूला झाडं-झुडुपं होती. फक्त मधेच तेव्हढी जागा रिकामी राहिली होती. तेव्हा सुप्रीला कळलं, आकाशचं बोलणं. आकाशने घड्याळात पाहिलं, दुपारचे ३.३० वाजत होते.
" चला, पटपट tent लावून घेऊया, नंतर जेवणाची सोय करावी लागेल." सगळ्यांनी tent बाहेर काढले. आकाशला तर सवय होती tent मध्ये राहायची. १० मिनिटात त्याने एकट्यानेच त्याचा तंबू उभा केला. बाकीचे मात्र अजूनही 'तंबू कसा बांधायचा' ते पुस्तकात बघून बघून फक्त प्रयन्त करत होते. आकाशला हसायला आलं.
" एकालाही येत नाही का ... " आकाशने विचारलं...
"आम्ही काय रोज येत नाही इथे... तंबू बांधायला यायला. " सुप्री वेडावून दाखवत म्हणाली. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.
" मी दाखवतो कसा तंबू उभा करायचा ते... सगळ्यांनी बघून घ्या... पुन्हा पुन्हा दाखवणार नाही... पुढचे काही दिवस तरी तुम्हाला हे tent वापरायचे आहेत... ",
"Yes sir " सगळ्यांनी एकसुरात म्हटलं आणि हसू लागले.

पुढच्या अर्ध्या-एक तासात सगळ्यांचे तंबू बांधून झाले, अर्थातच सगळयांना शिकवून. त्यानंतर आकाशने त्यातल्या चार-पाच मुलांना सोबत घेतलं.
" रात्रीच्या जेवणची सोय करून येतो आम्ही... " ते निघणार इतक्यात त्यातली एक मुलगी बोलली.
" मला ना , जास्त spicy वगैरे आणू नका.. आणि oily पण नको, डीएटिंग करते आहे ना मी... " आकाश ते ऐकून बोलला...
"बरं... अजून कोणाला काही सांगायचे आहे का " तर अजून एक मुलगी म्हणाली,
" मला पण साधंच काहीतरी आणा... मसाला डोसा,इडली वगैरे.... रात्री पचायला चांगल असते ते... ",
"ठीक आहे.. ",
"मला दोन वडापाव पण चालतील, हा पण ... लाल चटणी नको हा त्यात... " एक मुलगा म्हणाला.
" मला तर काहीपण चालेल.... कांदेपोहे भेटले तर दोन प्लेट आणा..... मला खूप आवडतात कांदेपोहे... " सुप्रीने सुद्धा ऑर्डर दिली.
" आणि त्यावर कोथिंबीर , खोबरं वगैरे पाहिजे का... " आकाशने विचारलं.
" हो मग.... मस्तच लागते ते ... प्लिज हा... " सुप्री हात जोडत म्हणाली. संजनाने तिला चिमटा काढला. तशी सुप्री कळवळली.
" ई !! तुला नको तर तू नको खाऊस ना, मला कशाला चिमटा काढतोस.... " सुप्री हात चोळत म्हणाली.
" पागल... आपण कुठे आहोत ते तरी कळते का तुला.. सगळे आपले ऑर्डर देत आहेत... जंगलात आहोत आपण.... आणि म्हणे कांदेपोहे वर खोबरं पाहिजे... येडी कुठली... " संजनाने सुप्रीच्या डोक्यावर टपली मारली.


आकाशने बघून हसला आणि त्या मुलांना घेऊन काही फळं वगैरे मिळतात का ते शोधायला गेला. खूप वेळाने ते परत आले. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतेच. त्यांना बघून एका मुलीने लगेचच एक चादर आणली. त्यावर सगळ्यांनी जमवून आणलेली फळ ठेवली. जास्त नव्हती तरी सगळ्यांना पुरतील अशी होती. सगळेच त्या फळांकडे बघत बसले होते. एकही जण पुढे येत नव्हता. आकाश सर्व बघत होता.
" काय झालं ? " आकाशने विचारलं,
" नाही... असंच, कधी असं जेवण घेतलं नाही ना म्हणून... " एकजण बोलला.
" का... काय वाईट आहे यात... " आकाशने पुढे येत एक फळ उचललं. तसे सगळे पुढे आले, आणि सगळ्यांनी काहींना काही हातात उचलून घेतलं.
" धुतलेली तरी आहेत का ... " एका मुलीने प्रश्न केला.
" हो मग, आम्ही स्वतः धुवून आणली आहेत. शिवाय पाणीही आणलं आहे पिण्यासाठी... " आकाश सोबत गेलेल्या मुलांपैकी एक जण लगेच बोलला. तसे सगळे फळं खाऊ लागले.

" असं वाटते आहे कि आज उपवासच आहे. " सुप्री फळ खाताना बोलली.
" येडपट... कधी सुधारणार गं तू..."संजना म्हणाली.
" तुझ्या नंतर.. " सुप्री वेडावत म्हणाली. सगळेच शांत बसले होते. आकाशने काही लाकडं जमवून आणली होती. संध्याकाळ होत आली तशी त्याने ती गोलाकार रचून "शेकोटी" केली. सकाळपासून पाऊस होता त्यामुळे हवेत गारठा होता. सगळेच 'थंड' झालेले. शेकोटी बघताच त्याच्या आजूबाजूला येऊन बसले. आकाश गप्पच होता. संजना आकाशकडे बघत होती. कधीपासून तिला "सॉरी" बोलायचे होते आकाशला... चिखल उडवला होता ना तिने म्हणून. बाकी सुप्रीची नेहमी प्रमाणे बडबड चालू होती. त्यात बाकीचे हि मिसळले होते. थोड्यावेळाने तिचं लक्ष आकाशकडे गेलं.
" तुम्ही गप्प का ? बोला तुम्हीसुद्धा " एकजण आकाशला बोलला.
" मी नाही बोलत जास्त... शांतता आवडते मला... ",
"हो का... मग हिमालयात गेला का नाहीत.. " सुप्रीने joke केला आणि एकटीच हसू लागली. नंतर सगळेच हसले. आकाश त्यावर काही बोलला नाही.
"सॉरी हा... राग आला असेल तर... " सुप्री लगेच बोलली.
" मला राग येत नाही कुणाचा... ",
" wow !!! बरं आहे मग... तुम्हाला काही बोललं तरी राग येत नाही ... कोणी चिखल उडवला तरी राग येत नाही. " सुप्री संजनाकडे बघत म्हणाली.
" ये संजू... तू उगाचच घाबरलीस.... ओ, मिस्टर A.... तुम्हाला सांगते ना.... किती घाबरली होती संजू त्यादिवशी.... चिखल उडवला तेव्हा.... सॉलिड टरकली होती तुम्हाला .... उगाचच... " सुप्री म्हणाली. संजनाने तिच्या पाठीत धपाटा मारला.
" पागल... देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे होतीस... " संजना म्हणाली.
" तुझ्याबरोबर फिरत होती." एकच हशा पिकला. आकाशही हसू लागला. त्याला हसताना बघून सुप्रीला आश्चर्य वाटलं.
"तुम्ही हसता पण का... " सुप्रीचा प्रश्न.
" हो मग.... कधीतरी ..... शेवटी माणूसच आहे ना मी... " आकाशचं उत्तर..
" तुम्हाला राग येत नाही ना, तर मला वाटलं तुम्ही हसत सुद्धा नाहीत. ",
"तस नाही , पण मला या निसर्गात रमायला आवडते. इकडॆ कुठे कोण असते, झाडं, डोंगर, पशु, पक्षी.... बराचसा वेळ माझा फिरण्यात जातो... मग कुठे कोणावर रागवणार, म्हणून.... राग वगैरे नाहीच येत कधी. " सगळे मन लावून ऐकत होते.   

"मग इकडे येता कशाला तुम्ही... i mean, फोटोग्राफी वगैरे ठीक आहे... पण शहरात का राहत नाहीत... " एका मुलीने विचारलं.
" छान असते निसर्गात... म्हणून राहतो इथे.. ",
"पण अजून ते 'छान' असं काही दिसलं नाही अजून... " सुप्री खूप वेळाने बोलली.
" सकाळी बघूया... चालेल का. " आकाश बोलला.
" ह्या... उगाचच बोलायचं मग... फुसका बार... " सुप्री वेडावत म्हणाली. आकाशला कळलं ते.
" शहरात कधी रात्रीच कोणी फिरलं आहे का... " आकाशचा प्रश्न. सगळेच हो म्हणाले. " आता सगळ्यांनी वर आभाळात बघून सांगा... असं द्रुश्य कुठे दिसतं का ते.. " सगळे वर पाहू लागले. सकाळपासून पडून पडून पाऊस थकला असावा. म्हणून रात्रीच आभाळ मोकळं होतं. चंद्र सुद्धा एका बाजूलाच होता. आभाळाच्या त्या "काळ्या" कॅनव्हासवर लाखो तारे चमकत होते. बहुदा त्यामुळेच चंद्र सुद्धा एका बाजूला जाऊन बसला होता. काय द्रुश्य होतं ते. व्वा !!.... सुप्री तर "आ" वासून ते बघत होती. actually, सगळ्यांनी पहिल्यादांच एवढे तारे बघितले होते.
( पुढे वाचा. 

http://vinitdhanawade.blogspot.in/2016/12/blog-post.html

आवडली तर नक्की share करा.  )
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.

simran254

 मराठी कथा, मराठी गोष्टी ,Marathi Goshti, Marathi katha , Marathi stories ,