" मग… काय विचार केला आहेस निल्या… ? ", निलेशची तंद्री लागली होती कूठेतरी. यशवंतने त्याला पुढे काही विचारलं नाही. तोही इतरत्र नजर फिरवू लागला.सगळी जमीन तापली होती, गरम तव्यासारखी. सगळीकडून नुसत्या गरम वाफा निघत होत्या,गरम वाफा.… एवढ्या लांब बसलेला असून सुद्धा डोळ्यांना त्या जाणवत होत्या. निलेश मात्र कधीचा त्याच्या शेताकडे पाहत होता. मोकाट जमीन अगदी. निल्याचं शेत होतं म्हणून माहित सगळ्यांना, नाहीतर कोनालाही पटलं नसतं कि ते शेत आहे म्हणून. इतकं निर्जीव वाटत होती जमीन. गेलाबाजार, एक रानटी रोप पण नव्हतं शेतात.…. पाखरं सुद्धा फिरकत नसायची. काय होतं त्यात खाण्यासाठी. तेवढं ते एक बुजगावणं , येणाऱ्या वाऱ्याशी डोलत असायचं. त्याच्यावर फाटका हिरवा शर्ट होता, तेव्हढंच काय तो हिरवा टिपका शेतात. शेतातली विहीर…. त्यात फक्त दगड-धोंडे दिसायची. नाहीतर कोपऱ्यात कोळ्याने सुंदर असं नक्षीकाम करून विणलेलं जाळं होतं, जणू काही मोत्याचा दागिना…. एक-दोनदा निल्यासुद्धा बाचकला होता ते बघून. सकाळचं ऊन त्यावर पडलं कि कसं लखाकून जायचे ते… शेवटी जाळचं ते… निल्याने नाही तोडलं कधी ते. बाकी विहिरीत, पाण्याचा वास सुद्धा आला नाही कधी. एक वर्षापूर्वी कर्ज काढून, स्वतः मेहनत करून त्याने विहीर खणली होती. पाणी तर लागलं नाही कधी, त्यावर कर्ज अजून वाढवून ठेवलं.
यशवंतने पुन्हा विचारलं निल्याला," निल्या… अरे काय ठरवलं आहेस… ? ", तेव्हा निलेश भानावर आला.
" हं… हो… जातो आहे शहरात… म्हातारा मागे लागला आहे ना. म्हातारी बी सारखी टोचून बोलत असते… ती तरी काय करणार म्हना… जीव आहे ना तिचा… बाळावर … " निल्या बोलता बोलता थांबला.
" काय झालं रे… ", येश्याने विचारलं.
" नाही रे… आठवण झाली बाळाची…. कसा लहानपणी दंगा करायचा…. आठवतंय ना तुला पण ",
"हो रे… पण आता मोठा झाला ना तो… ",
"हो… माझ्यासाठी अजून लहानच आहे तो. चल मग… जाऊ आपण बाळाकडे… येशील ना तू… ",
" अरे मी कशाला… ? ",
"बघ येश्या… मला शहरात जास्त कळत नाही… १०-१२ वर्ष झाली शहरात जाऊन. बाळ… तेव्हा १० वीला असेल. तेव्हा गेलेलो. त्याच्या लग्नाला पण जाता आलं नाही. तुला माहित आहे ना शहरातलं म्हणून चल बरोबर जरां. ",
" तसं मला पण जास्त माहित नाही रे, पण तुझ्यासाठी येईन…. नाहीतरी इथे आता काय काम आहे आपलं… " त्यावर दोघेही हसले.
यशवंत आणि निलेश, दोघेही लंगोटी यार…. गावातल्या एकाच वाडीत राहायचे. गावापासून ४ मैल अंतरावर असलेल्या शाळेत दोघे पायी-पायी जायचे. तालुक्याची शाळा लांबच होती तशी. १०वी पर्यंतच शिक्षण होतं तिथे. तिथून आणखी पुढे ४ मैल एक कॉलेज होतं १२ वी पर्यंत. एवढया लांब कोण पायपीट करणार. म्हणून गावातली ४-५ डोकीच तेवढी शिकलेली. यशवंत आणि निलेश दोघेही शिकलेले. अभ्यासात दोघांची डोकी चांगली. दोघांचं कुटुंब शेतीत गुंतलेलं. येश्याचे वडील लहानपणीच वारलेले. त्याचा काका आणि आई राबायचे शेतात. त्याने १२ वी शिकून शिक्षण सोडून दिलं. निल्याला पुढे शिकायचं होतं. ऐनवेळेला त्याच्या वडिलांना अपघात झाला आणि ते जागेवर बसले. सगळं घर शेतावर चालायचं. घरात लहान भाऊ सुद्धा होता. त्याचं शिक्षण होतं. १२ वी शिकून त्याने शिक्षणाचा निरोप घेतला. आणि स्वतःला शेतात जुपलं. दोघे शिकलेले होते. म्हणून दोघांची भाषा गावरान वाटायची नाही कधी… गावात काही कागदपत्राचं काम असेल तर गावकरी या दोघांकडे जायचे.
" अवं… झोपताय न आता… " निल्याच्या बायकोने त्याला हाक मारली. निल्या झोपडी बाहेर बसला होता. बायकोचा आवाज ऐकला त्याने. दुर्लक्ष करत त्याने गोधडी घेतली खांदयावर. " आये… जरा येश्याकडं जाऊन येतु गं… " निल्याने बाहेरून आवाज दिला. " आता कूटं चाललास मरायला… इतक्या रातीचा… " म्हातारी आतून ओरडली. त्याकडे सुद्धा लक्ष न देता निल्या निघाला. १० पावलांवर येश्याचं घर… घर कसलं, झोपडीच ती.… गावात पक्क घर फक्त गावच्या सरपंचाचं. श्रीमंत माणूस, तेवढाच मनाने बी श्रीमंत. कोनालाबी पैशाची मदत करायचा,व्याज न घेता. कितीतरी गावकऱ्याच्या जमिनी त्याकडे गहाण ठेवलेल्या. सरपंच चांगला माणूस होता, पण त्याची बायको कपटी होती. सगळ्या गावकऱ्यावर तिचा काय राग होता काय माहित. तशी ती लहानच होती, १५ वर्ष लहान सरपंचापेक्षा. म्हणून तिचं काही चालायचं नाही त्यापुढे. मुग गिळून गप राहायची. येवढा चांगला होता सरपंच. पण देवाला ते बघवलं नाही बहुदा. तापाचं कारण झालं आणि चालता-बोलता माणूस अचानक गेला. खूप लोकं रडले तेव्हा. देवापुढे काय चालणार कोणाचं. थोडे दिवस दुःख केलं त्या बाईने. बारावं झालं तसं तिने रंग दाखवायला सुरु केलं. सरडयाची जात ती. जेवढे पैसे सरपंचाने दिले होते, त्यावर व्याज लावून दामदुपटीने ती परत घेऊ लागली. गाववाले काय करणार… जमिनी परत पाहिजे तर पैसे तर दयावेच लागणार. त्यात पाऊस कमी झालेला. काही जणांनी शेती-जमिनी गमावल्या. त्यात येश्याचं शेत पण होतं. लग्नासाठी शेतं उसनं ठेवलं होतं. शेतावर २ वर्ष काही पिकलंच नाही. पैसे कसे देणार. गेलं शेतं. पोट भरण्यासाठी येश्या असंच कूठेतरी काम करायचा गावात.
निल्या, येश्याच्या झोपडीजवळ आला. एक दिवा तेवढा जळत होता. जना ( येश्याची बायको ) बाहेर चुलीजवळ भाकऱ्या थापत बसली होती. " जना… ये जना, येश्या हाय का घरात… " निल्याने लांबूनच विचारलं. " ते व्हय… दगडाच्या झाडावर गेलं असतील… " भाकरी तव्यावर टाकत जना बोलली. भाकरीचा खमंग वास निल्याच्या नाकात शिरला. येश्याची जना, जेवण चांगलं बनवायची. निल्या मुद्दाम यायचा कधी येश्याकडे जेवायला. आपली बायको काय जेवण करते.… नुसतं जेवायचं म्हणून जेवण ते. ना त्याला चव ना ढव.… ढकलायचं नुसतं पोटात. भाकरीचा वास अजून त्याच्या नाकात तसाच होता. निल्या जरा घुटमळला तिथे. जनाला कळलं ते. " या भावजी… एक तुकडा टाका तोंडात भाकरीचा." ,"नको… राहू दे." म्हणत निल्या पुढे आला. तिथूनच थोडं वर असलेल्या पठाराकडे त्याने नजर टाकली. येश्या झाडाजवळ बसला होता. दगडाचं झाड. दोन मोठया खडकामधून ते झाड वर आलं होतं. बऱ्यापैकी मोठं झाडं होतं. कधीपासून होतं ते माहित नाही. पण निल्यापेक्षातरी मोठं होतं ते. किमान त्याच्या आजोबाच्या वयाचं तरी असेल. आजोबा आता नव्हता,तरी झाडं होतं. निल्या आणि येश्याचं आवडीचं ठिकाण. कितीही आग होतं असली तरी या झाडाखाली शांत सावली असायची. झाडाखाली बसलं कि सगळ गाव दिसायचा. दूरवर पसरलेली शेतं दिसायची, कोणाकोणाची. त्या दगडावर झोपलं कि फक्त निळे आकाश दिसायचे, अन रात्री लाखो चांदण्या. दोन झाडं आणि त्यातून आलेलं झाड, म्हणून त्याला दगडाचं झाडं म्हणायचे सगळे. ३ वर्ष पाऊस नसूनही त्या झाडाला कुठून पाणी मिळायचं काय माहित. निल्या आणि येश्या लहानपणापासून यायचे तिथे. कधी झोपायला, कधी नुसत्या गप्पा मारायला.
(पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2015/11/blog-post.html )