मुंबई पोलीस हेडक्वार्टरच्या गेटजवळ पोहोचल्यावर माझ्या लक्षात आले की आपल्या पाकिटात दिशाचा फोटो आहे... अचानक माझी पावले थबकली. कदाचित पोलिसांनी आपली झडती घेतली तर? आपल्या पाकिटात तिचा फोटो असणे आपल्याला परवडणार नाही. मी गेटपासून बाजूला झालो. जरा दूर गेलो. खिशातून पाकीट बाहेर काढले. त्यातून दिशाचा फोटो बाहेर काढला. आता याचे करायचे काय? कोठे लपवायचा? प्यांटच्या चोरखिशात? तिथे लपवला तरी पकडले जाण्याची शक्यता आहे. मग फाडून फेकून द्यायचा? बारीक बारीक तुकडे करून?
फोटो फाडायचा विचार मनात आल्याबद्दल माझा मलाच राग आला. मग अचानक डोक्यात एक कल्पना आली... हा फोटो आपण खाऊन टाकूया.... म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो फाडण्याचा प्रकार आपल्याकडून होणार नाही, आणि तो फोटो आपल्याच शरीरातच जिरून जाईल. मी लगेच एकदा फोटोतील दिशाकडे प्रेमाने बघितले आणि तो फोटो तोंडात टाकला. चावून चावून खाऊन टाकला.....
मग मी गेटमधून आता शिरलो. एक पोलीस दिसला, त्याला विचारले सायबर सेल कुठे आहे? त्याने इमारतीच्या एका भागाकडे बोट दाखवले.
मुंबई सायबरसेलबद्दल माझ्या भव्य-दिव्य कल्पना होत्या. त्याकाळात टी.व्ही. वरील सी.आय.डी. ही सिरीअल मी बघत असे. सायबर सेलही तसाच भव्य-दिव्य असेल अशी माझी कल्पना होती.
सायबर सेल अशी पाटी बघून तेथे आत शिरलो तर ती साधारण 12 बाय 12 आकाराची एक खोली होती. 3-4 कॉम्प्यूटर होते आणि सात-आठ ऑफिसर्सकाम करत बसले होती. मला बघून एकाने म्हंटले, ‘बोला काय काम आहे?’
मी म्हटलं ‘शेख साहेबांना भेटायचं आहे’
‘ते अजून यायचे आहेत,’ असे सांगून तो म्हणाला, ‘काय काम आहे त्यांच्याकडे?’
‘मला तुमचे समन्स आलंय. मी पुण्याहून आलोय. ...महावीर सांगलीकर’
मी असे म्हणताच सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मग कांहींनी एकमेकांकडे बघितले.
एवढ्यात तो ऑफिसर म्हणाला, ‘तुमच जेवण झाले आहे का?’
मी ‘नाही’ अशी मान हलवली.
‘मग तुम्ही जेवून या. तुम्ही जेवून येईपर्यंत शेख साहेब येतील’ तो म्हणाला.
मी पुन्हा गेटच्या बाहेर जावून एक हॉटेल शोधले आणि जेवून घेतले. मग पुन्हा सायबर सेलमध्ये गेलो. त्यावेळी तिथे मला आणखी एक नवीन व्यक्ती दिसली. मघाच्या ओफीसरने मला बघताच त्या नवीन व्यक्तीला हळू आवाजात सांगितले, ‘ती त्या लेडीची केस आहे ना.... हेच ते महावीर सांगलीकर....’ आणि माझ्याकडे इशारा केलं. त्या सिनिअर व्यक्तीने माझ्याकडे बघितले आणि ‘काय रे, कशाला असले उद्योग करतोस? उगीच आमच्या डोक्याला ताप करून ठेवलाय’ असे उदगार काढले. मग ते त्या ऑफिसरला म्हणाले, ‘राणेंना सांगा यांची चौकशी करायला’.
पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_15.html