Manasi

अक्षय तृतीयेचे महत्त्व

--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
--------------------------------------------------------------------------------------------


          अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.

मूर्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
           (पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्‍ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्‍ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.



--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
--------------------------------------------------------------------------------------------


simran254

मराठी सण, मराठी फेस्टिवल ,Marathi San, Marathi Festival,