Chota Kavi

भीमाशंकर अभयारण्य (ता.आंबेगाव,जि.पुणे)

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सव्वाशे चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात भीमाशंकर अभयारण्य पसरले आहे. जैवविविधतेने समृद्ध पश्चिमघाटात भीमाशंकरचे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त वनक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कड्यांवर वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथून भीमा नदी उगम पावून नैसर्गिक सौंदर्यात भर घालते.

भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध येथेच केला होता. यावेळी शंकरास आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड असून घनदाट जंगल आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या येथील जंगलातून फिरताना 'शेकरू' हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी आपले लक्ष वेधून घेईल. येथील जंगल सदाहरित आहे.

पाठीवर सॅक टाकून येथील जंगलातून भटकंतीचा आनंद अवर्णनीय असतो. पहाटेस दाट झाडीतून सूर्याची किरणे डोकावण्याच्या क्षणी पक्षांच्या कर्णमधुर किलबिलाटात येथील दर्‍याखोर्‍यातून सैर करण्याची अनुभूती विसरणे अशक्यच. पक्षीनिरीक्षक व जिज्ञासू वृत्तीच्या पर्यटकांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना येथे स्वर्ग भूतलावर अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.
सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यात पावसाच्या वर्षावास सुरूवात झाल्यानंतर येथील सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. येथून भीमा नदी उगम पावून कर्नाटकात कृष्णा नदीत विलीन पावते. येथील जंगल हिरवाईने नटलेले असून येथे आंबे, जांभूळ, हिरडा, बेहडा, बांबू व औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. अभयारण्याचे वनक्षेत्र मिश्रित वनश्रीने समृद्ध असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

पर्यटकांना येथे सृष्टीसौंदर्याचा अभूतपूर्व साक्षात्कार घडतो. साहसी पर्यटक व ट्रेकर्ससाठीही हे नंदनवन आहे. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पहाडाच्या रांगांमधून वाहणार्‍या नद्यांचा परिसर पर्यटकांना साद घालतो. याशिवाय हनुमान टँक, नागफणी पॉंईंट येथेही भेट देता येईल. येथून चाळीस किलोमीटरवरील डिंभे डॅम विशेष प्रसिद्ध असून येथे आठवड्याच्या शेवटी येथे पर्ययकांच्या गर्दी करतात.
वर्षातील काही महिने सोडले तर तिन्ही ऋतूत येथे आनंद घेता येते. पर्यटन महामंडळाने येथे निवासाची व्यवस्था केली आहे. टेहळणी मनोर्‍यांहून येथील वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद घेता येईल.

कसे जाल ?
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरहून (62 किमी) येथे पोहचता येते.


simran254

 महाराष्ट्र पर्यटन , Maharashtra Tourism,