गोकुळाष्टमी / गोपाळकाला / दहीहंडी / दहीकाला Gokulashtami / Gopalkala / Dahihandi / Dahikala
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
--------------------------------------------------------------------------------------------
तिथी व इतिहास
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.
उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
दहीकाला
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला' होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
मासिक पाळी, अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
गोपाळकाळयाचे आध्यात्मिक महत्त्व
गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. `काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. `गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
काल्यातील प्रमुख घटक
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
-----------------------------------------------------------------
गोकुळाष्टमीच्या प्रथेची सुरुवात कशी झाली ?
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात व तेव्हा प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
सध्या उत्सवाला प्राप्त झालेले व्यापारी स्वरूप
गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतांना शास्त्र विसरून निवळ करमणुकीच्या दृष्टीने पहाणे सुरू झाले व या उत्सवाच्या अधोगतीला सुरुवात झाली. उत्सवामुळे संघटित होण्याचा उद्देश विसरून अधिकाधिक स्पर्धा करण्याच्या उद्देशाने मंडळांची व गोविंदा पथकांची संख्या भरमसाट वाढू लागली. दहा वर्षांपूर्वी मुंबईतील गोविंदा पथकांची संख्या पाचशेच्या आसपास होती, तर गेल्या दोन वर्षांत हाच आकडा दोन हजारांच्या घरात पोहचला आहे. मुंबई व ठाणे येथील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने होणारी उलाढाल तीस कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती. आज राजकीय लाभासाठीही दहीहंड्यांचा वापर केला जाऊ लागला आहे. मंडळांकडून आयतेच मिळणार्या कार्यकर्त्यांमुळे मंडळांकडे राजकीय पक्षांचा वाढता प्रभाव, प्रसिद्धीसाठी दहीहंड्यांवर केली जाणारी लाखो रुपयांची उधळण व बक्षिसे यांमुळे या उत्सवाचे व्यापारीकरण होऊ लागले आहे.
---------------------------------------------------------------
गोकुळाष्टमी साजरी करण्याची पारंपरिक पद्धत व महत्त्व
श्रावण वैद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा पडली आहे. हे व्रत पुढीलप्रमाणे केले जाते. सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढर्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून पूजास्थान लतापल्लवाने सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सुती कारागृह तयार करतात. मंचावर देवकी-कृष्णाच्या मूर्तांीची स्थापना करतात, तर दुसर्या बाजूस यशोदा व तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्ती बसवतात. मध्यरात्री शूचिर्भूत होऊन, `श्रीकृष्ण पूजां करिष्ये' असा संकल्प करतात व श्रीकृष्णाची सहपरिवार षोडशोपचार पूजा करतात. रात्री कथापुराण, नृत्य-गीत इत्यादि कार्यक्रम करून जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाचा नैवेद्य दाखवतात. नवमीच्या दिवशी पंचोपचारांनी उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलात विसर्जन करतात. श्रीकृष्णाची धातूची मूर्ति असल्यास ती देव्हार्यात ठेवतात किंवा ब्राह्मणाला दान देतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने दहिकाला होतो. तेव्हा `गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ।' अशी गाणी म्हणत पुरुष रस्त्याच्या दुतर्फा तेथील परिसरातू्न नाचत गात जातात. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात. त्यांच्यावर रस्त्यात माणसे घराघरातून पाण्याच्या घागरी ओततात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत देखावे दाखवण्यात येतात. अजूनही काही भागांत पूर्वीच्या रूढी, परंपरा चालू आहेत.
उत्सवाचे धार्मिक महत्त्व कमी होऊन गैरप्रकारांचा शिरकाव
गोपाळकाला पूर्वीच्या काळी भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करत असत. पण काळ बदलत जाऊन आता संस्कृति, धर्म यांचे महत्त्व कमी झाले आहे. आता तर केवळ मनोरंजनवादी आणि भोगवादी संस्कृति निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्सव व सण यांचे धार्मिक महत्त्व कमी होऊन उलट त्यात गैरप्रकारांची भर पडली आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्तानेही खंडण्या उकळणे, उंच हंड्या लावून प्रसिद्धि मिळवणे, मुलींची छेड काढणे यांसारख्या गैरप्रकारांना उत येत आहे.
उत्सवाचे बाजारी आणि विकृत स्वरूप
यापूर्वी छोट्या उंचीवर हंड्या बांधल्या जात होत्या. त्यामुळे पडून दुखापत होण्याचा धोका कमी होता. सध्या मात्र या उत्सवास विकृत स्वरूप आलेले आहे. उंचावर दहीहंड्या बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवलेली असतात. या हंड्या फोडण्यासाठी पैशाच्या लोभापायी सार्वजनिक मंडळांतील मोठ्या वयातील मुले व पुरुष हंडीखाली गोल फेर धरून ६० ते १०० फूट उंचीचे आठ, नऊ मानवी मनोरे रचतात. हंडी फोडण्यासाठी मात्र कोवळया वयाच्या लहान मुलांना वर चढवले जाते. यात काही जण मद्यपान केलेलेही असतात. त्यामुळे बर्याचदा मनोरे कोसळून मुलांना व मोठ्यांना दुखापत होते; परंतु बक्षीस मिळावे या आशेने बरीच मंडळे आपला जीव मुठीत धरून या दहीहंड्या फोडण्यासाठी पुढे सरसावतात. प्रसंगी हात-पाय जायबंदी होतात, कधी कधी मृत्युही ओढवतो.
-----------------------------------------------------------------
गोविंदा
रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...
आपले सगळेच सण आनंद, उत्साह, प्रेमाचा संदेश देणारे... प्रत्येकाची मजा वेगळी, साज वेगळा... मग गोपाळकाल्याचा सणही त्याला कसा अपवाद असणार. एकजूटीचा संदेश देणारा हा खेळ बघायला खूप मजा येते...
पहाटे लवकरच सगळे गोविंदा ग्राममंदिरात (मुंबईतील) एकजूट होतात... दुधादह्याची हंडी
ग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो. मग गोविंदा पथकाचे मास्तर सर्व गोविंदाना मार्गदर्शन करतात. मास्तरांच्या नेतृत्वाखाली गोविंदा पथकाचे मार्गक्रमण सुरू होते. जवळच्या विभागातल्या मानाच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रम पार पडला की सगळे पथक ट्रक, टेम्पो, बस मधे बसून उपनगरातील लोणी लुटायला पसार होतात...
पुर्वी म्हणजे १९८०-८५ पर्यंत गोविंदा पथके जवळच्या भागातील हंड्या फोडत. त्यावेळी ट्रक, टेम्पोचे लाड पुरविण्या इतपत पथकाकडे आर्थिक पाठबळ नसे. तेव्हा बैलगाडीतून कृष्ण, बलराम, राधा, पेंद्या यांची मिरवणूक निघे... गल्लीबोळातून येणारे पाण्याचे फुगे मिरवणूकीचा खरपूस समाचार घेत. बैलगाडी समोरील बँड पथक गोविंदाची नेहमीची धून वाजवताना दिसत. सगळे गोविंदा फेर धरून रस्त्यावरून नाचत, खेळत हंड्या फोडत... पण गोविंदा आता राजकिय झालाय, त्याला लाखोंच लोणी लागलयं. पुर्वीचा ५ ते ६ थरांचा गोविंदा काल चक्क ९ थरांचा झाला.
ठाणे वर्तक नगर मधे काल ९ थरांचा विश्वविक्रम करण्यात आला... तळाच्या थराला ६+२, दुसर्या थरला ५+१, तिसर्याला ४+१, चौथ्याला ३, पाचव्याला २ आणि त्यावर एकेरीत ४ जण असा मानवि मनोरा माझगांवच्या 'ताडवाडी गोविंदा पथकाने' रचला. तसाच पर्यंत्न जोगेश्वरीच्या 'जय जवान' गोविंदा पथकानेही केला. पण शेवटच्या थरावरील मुलीला वार्यापुढे नमते घ्यावे लागले, तेव्हा उपस्थीत हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ही जिवघेणी स्पर्धा लाखो प्रेक्षक दुरदर्शन वरून मध्यरात्री पर्यंत पहात होते.
गोविंदा पथकांना या स्पर्धेतील जोखमीची काळजी असते आणि म्हणूनच १ - २ महिना आधीपासूनच त्यांची पुर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदासाठी खास ट्रेनिंग आयोजीत केले जाते. योग्य संतुलन राखून (Balancing) उंचीची भिती घालवण्यासाठी तरण तलावात २० फुटावरून उड्या मारणे, दोरी वरून चालणे इ. प्रकारांचा सराव करून घेतला जातो. मनोधैर्य स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मदत घेतली जाते. बहुतांश गोविंदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरिरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात.
थर कोसळून होणार्या दुखापतीची चिंता न करता हे गोविंदा अथक प्ररिश्रम करत असतात. त्यांची ही अखंड मेहनत, जिद्द, शिस्त या लोकप्रिय खेळाला व्यावसायिक (corporate) दर्जा प्रात्प करून देते.
--------------------------------------------------------------------------------------------------------
गोकुळाष्टमी / गोपाळकाला / दहीहंडी / दहीकाला Gokulashtami / Gopalkala / Dahi handi / Dahi kala
--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
--------------------------------------------------------------------------------------------