Bhushan

* लोंगेवालाची लढाई *

लोंगेवालाची लढाई
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध यातील एक भाग

लोंगेवालाच्या लढाईत भारतीय सेनेने पकडलेला रणगाडा
दिनांक   डिसेंबर ५ - डिसेंबर ६, १९७१
ठिकाण   लोंगेवाला, राजस्थान, भारत
परिणती   भारताचा विजय
युद्धमान पक्ष
 भारत    पाकिस्तान
सेनापती
मेजर कुलदीपसिंग चांदपुरी
विंग कमांडर एम.एस. बावा   ब्रिगेडियर तारीक मीर
सैन्यबळ
१२० सैनिक
४ हॉकर हंटर विमाने   २००० + सैनिक ६५ रणगाडे
३ विमानवेधी बंदुका
१३८ चिलखती गाड्या
बळी आणि नुकसान
२ ठार
जीपवरील तोफ   २०० + ठार
५० रणगाडे
इतिहासातील एकाच लढाईत सर्वाधिक पकडलेले रणगाडे
लोंगेवालाची लढाई १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेना व पाकिस्तानी सेनेमध्ये राजस्थान सीमेवर झालेली लढाई होती. या लढाईत भारताच्या केवळ १२० सैनिकांनी पाकिस्तानच्या २००० पेक्षा जास्त मोठ्या ब्रिगेडचा सामना करुन कडवी झुंज दिली व सकाळपर्यंत पाकिस्तानी सेनेला झुंजवत ठेवले. सकाळी भारतीय हवाईदलाने आकाशातून हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केले व लढाई जिंकली.

१९७१ च्या भारत पाक युद्धात भारतीय लष्कराने आपली सर्व ताकद बांगलादेश आघाडीवर लावली तर पश्चिमेकडून पाकिस्तानच्या आघाडीवर पाकिस्तानला रोखायचे अशी व्युहरचना होती. भारतीय लष्कराने नोव्हेंबर १९७१ च्या शेवटी बांगलादेशच्या सीमेवर आक्रमक हल्ले चढवले व बांगलादेशच्या मुक्तीबाहिनीने देखील त्यांच्या देशांतर्गत उठाव केला. पाकिस्तानला संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नाही अशी जाणीव झाली व १९७१ च्या युद्धाल तोंड फुटले. बांगलादेशमधून केला जाणारा बचाव कुचका ठरणार होता याची पाकिस्तानला कल्पना होती म्हणून भारताला पश्विम सीमेवरून परास्त करून भारताला नंतर टेबलावर पाकिस्तानची एकता अखंड ठेवण्यासाठी भाग पाडायचे अशी पाकिस्तानी आक्रमणाची ढोबळ आखणी होती. सरसेनापती याह्याखान यांच्या व्यक्तव्याप्रमाणे डिफेन्स ऑफ इस्ट पाकिस्तान लाईज इन द वेस्ट (पूर्व पाकिस्तानचा बचाव पश्विम पाकिस्तानात आहे).

लोंगेवालाची चौकी ही राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रामगढ येथून ३० किमी पश्विमेला आहे. रामगढ हे जैसलमेरहून साधारणपणे ६५ किमी वर पश्विमेला स्थित आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान या चौकीची जवाबदारी २३ व्या पंजाब रेजमेंट कडे होती. ज्याचे नेतृत्व मेजर कुलदीपसिंग चांदपुरीकडे होते. या चौकिवर १२० सैनिक एक जीपवरील तोफ तैनात होती तसेच मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची ऊंटावरील तुकडी देखील होती ज्याचे नेतृत्व कॅ. भैरवसिंगकडे होते. बाकिची रेजमेंट १७ किमी उत्तरेकडे साढेवाला या चौकिवर होती. १९६५ च्या युद्धात या चौकिकडून मोठा हल्ला झाला होता म्हणून तेथे जास्तीची सेना तैनात केली गेली होती. लोंगेवालाची चौकी वाळूच्या एका टेकाडावर स्थित होती.त्यामुळे येथिल सैनिकांना साहजिकच उंचावर असण्याचा फायदा मिळणार होता. पाकिस्तानने युद्ध सुरु व्हायच्या आधिच अनेक हेर पेरले होते व त्यांनी चौकिवरील बरीच माहिती काढली होती. चौकिवर केवळ १२० च सैनिक असल्याने पाकिस्तानने ही चौकि ताब्यात घेउन मग पुढे रामगढ- जैसलमेर पादाक्रांत करायचे असे प्लान केले. पटापट चौक्या पादाक्रांत करता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणगाडे व पायदळ सैनिक मोहिमेत वापरले.

४ डिसेंबरला युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तानने भारतीय ठाण्यांवर हवाईहल्ले आरंभले. युद्ध सुरु झाल्याची सुचना मिळताच मे. चांदपुरी यांनी. ले. वीरधरम यांना आंतराष्ट्रीय सीमेनजीक टेहाळणीसाठी पाठवले. ५ तारखेच्या पहाटे पाक तोफखान्याने लोंगेवाला व परिसर दणाणून सोडला व तोफखान्याच्या सुरक्षिततेत पाकने आपले मोठे सैन्य व रणगाड्याची तैनात भारतीय सीमेत केली व लोंगेवालाच्या दिशेने कूच केले. धरमवीर यांनी लगेचच रणगाडे व पायदळ सैनिकांचा मोठा जथ्था लोंगेवालाच्या दिशेने येत आहे असे चांदपुरी यांना कळवले. चांदपुरी यांनी आपल्या वरीष्ठांशी संपर्क साधून चौकिवर अजून कुमक पाठवावी यासाठी विनंती केली. परंतु लगेचच इतकी कुमक पाठवणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी चांदपुरीला यशस्वी माघार घेणे अथवा चौकिवर टिच्चून राहून आक्रमण थोपवण्यासाठी सांगितले व निर्णय चांदपुरीवर सोडला. चांदपुरीने चौकिवर राहून आक्रमण थोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने चौकिवरील सैनिकांना परिस्थिती सांगितली व आपला निर्णय सांगितला व जर कुणाला चौकि सोडून जायचे असेल तर आत्ताच जावे. नंतर लढाईदरम्यान कोणी पळून जात असेल तर त्याला जागीच गोळी घालण्यात येईल. यानंतर एकमुखाने सर्वांनी येणारे आक्रमण थोपवण्याचा विडा उचलला व सर्वांनीच शेवटच्या जिवंत माणसाच्या उपलब्धिपर्यंत लढण्याचा निर्धार केला. शत्रूला थोपवण्याबरोबरच शत्रूला उधवस्त करणे हा युद्धानीतीचा भाग आहे यासाठी चांदपुरी यांनी हवाईतळावरून हवाईसंरक्षणाची मागणी केली. रणगाड्याविरुद्ध हवाईहल्ले परिणामकारक ठरले असते परंतु हवाईतळावर केवळ हंटर विमाने होती व त्यात रात्रीच्या अंधारात उड्डाण भरणे तसेच आक्रमण करणे शक्य नव्हते म्हणून विंगकमांडर बावा यांनी सुर्योदय झाल्या झाल्या हवाईहल्ला चढवण्यात येईल असे सांगितले. लोंगेवाला येथे पोहोचल्यावर रणगाडा विरोधी सुरुंगांनी रणगाड्याना पुढे येण्यास मज्जाव केला लांबूनच रणगाड्यांना हल्ला करण्यास भाग पाडले तसेच पायदळ सैनिकांना टेकाड चढून देखील चौकिवर ताबा मिळवणे अवघड गेले. रणगाड्यांना टेकाडावरील खंदकांमध्ये बसलेल्या भारतीय सैनिकांचा वेध घेणेपण अशक्य ठरले. डागलेले गोळे खंदकांवरून जात. अश्या प्रकारे लढाईला आरंभ झाला. भाजून काढणार्‍या तोफगोळ्यांचा व गोळ्यांच्या वर्षावात भारतीयांनी जबरदस्त निर्धार दाखवला व चौकीवर ताबा मिळवू पाहणार्‍या सैनिकांचा वेध घेत ताबा कायम ठेवला. रणगाड्याने खंदकांमागे उभी असलेली जीप व त्यावरील तोफ निकामी केली परंतु त्यापलीकडे पाकिस्तानी रणगाडे फारसे नुकसान करू शकले नाहीत. इथे डाळ शिजत नाही हे पाहून पाकिस्तानी रणगाड्यांनी आपला मार्ग वळवला. काहींनी लोंगेवालाला वळसा घालून रामगडच्या दिशेने कूच केले तर काही किशनगड कडे निघाले. परंतु एकत्रित रणगाड्यांच्या आक्रमणाचा पाकिस्तानी बेत पुर्णपणे लोंगेवालाने धुळीस मिळवला. काहिवेळातच सुर्योदय झाला व काहि वेळातच विंगकमांडर बावा आपले ४ विमानांचे पथक घेउन लोंगेवाला येथी पोहोचले व अत्यंत अचूक वेध घेत त्यांनी एकामागोमाग एक रणगाडा टिपायला सुरुवात केली.

पाकिस्तानी सेनेला अत्यंत अचूक हवाई हल्याचा सामाना करणे अवघड गेले. इतका वेळ आक्रमणावरील पाकिस्तानी सेना आता बचावाचे साधन पाहू लागले. परंतु उघड्या वाळवंटात कुठेच काही संरक्षण मिळाले नाही. अजून काही वेळातच भारतीय गोटातील चिलखती दलही लोंगेवालाला येउन मिळाले व किशनगड कडे गेलेल्या रणगाड्यांचा समाचार घेतला. हवाई हल्ले चुकवण्यासाठी पाकिस्तानी रणगाडे स्वता: भोवती गिरक्या घेउन हल्ले चुकवू लागले. काहींना त्यात यश आले परंतु काही अधिक नुकसान टाळण्या शहाणपणा आहे हे लक्षात घेउन पाकिस्तानी सैन्याने लोंगेवाला भागातून माघार घेण्यास सुरुवात केली. परंतु तोवर बराच उशीर झाला होता. १० रणगाडे पुर्णपणे निकामी झाले होते तर पन्नासहून अधिक भारतीय सेनेच्या ताब्यात मिळाले होते. दुसर्‍या महायुद्धानंतर कोणत्याही युद्धात इतकी मोठी रणगाड्यांची हानी कदाचित कुठेच झाली नाही.

भारतीय बाजूने लोंगेवालाला एवढे मोठे पाकिस्तानी आक्रमण होत आहे हे कळण्यास बराच वेळ लागला. भारतीय हेरखात्याचे अपयश यात अधोरेखित झाले. भारताकडे केवळ हॉकर हंटर विमाने होती. त्यांनी या युद्धात मोठी कामगीरी बजावली परंतु रात्रीच्या युद्धात ते एकदमच कुचकामी होते. म्हणूनच भारतीय सैनिकांनी सकाळपर्यंत दाखवलेली जिद्द स्पृहणीय आहे.

पाकिस्तानने लोंगेवालाचे युद्ध अतिशय खराब पद्धतीने हाताळले. मोठ्या प्रमाणावर सैन्य व रणगाडे नेउन पण पराभव पत्करावा लागला. एवढ्या मोठ्या रणगाड्यांच्या हालचालिला युद्धतंत्राप्रमाणे हवाई संरक्षण देण्याचे गरजेचे असते ते दिले गेले नाही. भारतीय हवाई हल्ला झाल्यावरही प्रतिआक्रमणात पाकिस्तानी हवाई दलाने तत्परता दाखवली नाही व परिणामी पराभव अटळ होता.

रूपांतर: चित्रपटांतील

या लढाईवर जे. पी. दत्ता यांनी बॉर्डर या युद्धपटाची निर्मिती केली. यात सनी देओल याने प्रमुख भूमिका केली आहे.

वर्ग: १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध