*विवाहाची तयारी *
आज विवाह हा सोहळा नाही, तर 'इव्हेंट' झाला आहे. पूर्वी लग्नाची तयारी म्हटलं, की घरदार कामाला जुंपलं जात असे. आता लग्नाआधी ज्याला आपण पूर्वापार केळवण म्हणायचो, तो प्रकार आता परंपरा जपून असणाऱ्या मध्यमवर्गीयांकडेच पाहायला मिळतो.
सध्या लग्नानंतरच्या पार्ट्यांचंच प्रमाण इतकं वाढलं आहे, की त्यातून लग्नाच्या तयारीसाठी फारच थोडा वेळ उरतो. मग लग्नाच्या सगळ्या तयारीची जबाबदारी सांभाळण्यासाठी "इव्हेंट मॅनेजमेंट' कंपन्या असतात. अशाच एखाद्या कंपनीशी संपर्क साधून त्यांना आपलं "बजेट' सांगायचं, बस्स! जरा श्रीमंत विवाह असतील, तर त्यासाठी काही थीमही असतात. एका लग्नसराईत जयपूरमध्ये होणाऱ्या एका विवाहासाठी "मोर' ही थीम वापरली गेली आहे.
त्या दृष्टीनं लग्नमंडप सजविण्यासाठी कंपनीनं राजस्थान सरकारकडून मोरपिसं भाड्यानं घेतली आहेत. वधू-वर आणि त्यांच्या जवळच्या नातलगांसाठी मोरपिशी रंगाचे कपडे वगैरे वगैरे..., तर दुबईत होणाऱ्या एका विवाहासाठी "वॉटर' थीम वापरली गेली आहे! त्यासाठी लग्नमंडप पाण्यात फुललेल्या कमळाच्या आकाराचा बनविला जाईल!
वधू-वर त्यांच्या जवळच्या नातलगांना ऍक्वा रंगांचे पेहराव, जागोजागी छोटी छोटी तळी किंवा कारंजी... इतकंच काय; पण वर-वधूच्या खाशा पंगतीसाठी चक्क नावसदृश व्यवस्था होती. हे सगळं खूप खर्चिक असतं, हे वेगळं सांगायला नकोच! आता विवाहाकडे अगदी "इव्हेंट' म्हणून बघायचं नसेल आणि पारंपरिक विवाह सोहळाही नसावा असं वाटत असेल, त्यांच्यासाठी सुवर्णमध्य म्हणजे आपल्या बजेटमध्ये अशी विवाहासाठी तयारी करताना थोडासा काहीतरी वेगळा विचार!