*एका लग्नाची गोष्ट *
कविता सांगत होती तिच्या लग्नाची गोष्ट- ""झालं असं, की "चार दिवस सासूचे' या मालिकेत काम करत असताना माझी मैत्रीण आणि सहकलाकार प्राजक्ता कुलकर्णीने सहज मला माझं लग्न कुठं ठरलं आहे का विचारलं. ऍरेन्ज्ड मॅरेज करायचं की लव्ह मॅरेज, तेही मी ठरवलेलं नव्हतं.
मुख्य म्हणजे नाटकांचे प्रयोग, दौरे, शूटिंग्ज यात मला एवढ्या गांभीर्यानं विचार करायला वेळच मिळाला नव्हता. तशी मी एक-दोनजणांना भेटलेही होते; पण पुढे काही झालं नाही. मग प्राजक्ता माझ्या मागेच लागली... "माझा एक दीर आहे. खूप छान आहे. तू एकदा तरी बघ. मला वाटतं की तुला तो शोभून दिसेल."' मग तिने एक दिवस मला आशिषचा फोटो दाखवला. फोटो तरी छान वाटला. त्या वेळेला आशिष रेडिफ्यूजन कंपनीत चेन्नईमध्ये काम करत होता. तो कधीतरीच मुंबईत यायचा. मग तो मुंबईला आल्यावर प्राजक्ताच्या घरी भेटायचं ठरलं; पण शेवटी आम्हाला दोघांनाही जमलंच नाही.
त्यानंतर दसऱ्याला तो येणार होता तेव्हा भेटायचा विचार केला. मला एकटीने जायला कसं तरीच वाटत होतं. म्हणून मी माझा मित्र आणि कलाकार राजन भिसेला ही गोष्ट सांगितली आणि त्याला माझ्याबरोबर यायला सांगितलं. योगायोगाने राजन मुरूडच्या डॉ. मेढेकरांना ओळखत होता. त्यांच्यापैकीच असेल, या विचाराने तोही बरोबर आला. मग प्राजक्ता, तिचा नवरा, आशिष, मी आणि राजन भिसे अशी आमची भेट झाली. गप्पा झाल्या. गंमत म्हणजे त्याने माझं एकही नाटक किंवा मालिका पाहिलेली नव्हती.
त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी भरपूर गप्पा मारल्या. मग त्याने माझं "एका लग्नाची गोष्ट' नाटक पाहिलं. मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही दोघंच भेटलो आणि वाटलं, की आपण एकमेकांना आवडतोय. मग आई-वडिलांना तसं सांगितलं. त्याच्या आई-वडिलांना मात्र मी चांगलीच माहिती होते. त्यांनी माझी बहुतेक सर्व नाटकं-सीरियल्स पाहिलेल्या होत्या. नंतर आम्ही सतत फोनवर बोलायचो आणि एसएमएस पाठवायचो. मग तो परत जानेवारीत आला तेव्हा आमचा साखरपुडा झाला आणि मे महिन्यात लग्न. मधल्या काळात तो महिन्यातून एकदा किंवा दोनदा यायचा. पण आमचं कोर्टिंग जास्त करून फोनवरच व्हायचं.
आम्ही इतकं बोलायचो की मला दहा हजारच्या वर बिल यायला लागलं. मग घरचे म्हणायला लागले की त्यापेक्षा लवकर लग्नच करा! पण तो चेन्नईला राहत होता आणि माझे प्रयोग आणि शूटिंगमुळे मला तिथं जाता येणार नव्हतं. त्यावर उपाय म्हणून मी 15 दिवस मुंबईत शूटिंग आणि प्रयोग करायचे आणि उरलेले 15 दिवस चेन्नईला राहायचं असं ठरवलं. पण योगायोग असा, की आमच्या लग्नाच्या आधीच त्याची मुंबईला बदली झाली आणि तो मुंबईतच आला. आता आशिष एव्हरेस्ट ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये व्हाइस प्रेसिडेंट आहे.
मला असाच नवरा पाहिजे होता जो त्याच्या क्षेत्रात यशस्वी असेल. माझ्याबरोबर वावरताना त्याला कुठेही प्रॉब्लेम येता कामा नये. आशिषनेही माझं ग्लॅमर, करियर योग्य रीतीने समजून घेतलं आहे. कुठेही गेल्यावर "हा कविता लाडचा नवरा' असं म्हटलं तरी तो ते हसून स्वीकारतो. माणसाला आणखी काय हवं असतं? म्हणूनच लग्न कोणत्याही पद्धतीनं झालं तरी शेवटी तो एक जुगार आहे, असं मला वाटतं. यात मला जॅकपॉट लागला आहे. मी तर म्हणते, की We are arranged to meet, but it was love marriage.
- कविता लाड-मेढेकर
( सौजन्य - तनिष्का )