Bhushan

* नेटके, शिस्तशीर; पण औपचारिक *

मुहूर्ताची वेळ जवळ आल्याने लग्नसमारंभाचा हॉल अगदी 'हाऊसफुल्ल' झाला होता. माझ्या मुलाचं पुण्यात लग्न लागत होतं. हॉलमध्ये सर्वत्र नटलेलं, थटलेलं उत्साहाचं वातावरण होतं. काही लोक स्टेजवर होते, काही हॉलभर इकडून तिकडे करत होते. बरीचशी मंडळी खुर्च्या पकडून बसली होती. तशातच एकीकडे स्टेजवर लग्नविधी चालू होते. मुलांची गडबड, बायकांची बडबड असं बरंच काही चालू होतं.

लग्नासाठी अमेरिकेहून काही पाहुणे आले होते. त्यातले बरेचसे आमचे नातेवाईक व मित्रमंडळी होते, ज्यांना आता "भारतीय अमेरिकन' असं म्हटलं जातं, तर काही खास अमेरिकन होते. या खास अमेरिकनांपैकी एक प्रोफेसर होते. लग्न लागायच्या वेळी प्रोफेसर हॉलमध्ये आले आणि एकदम चिंताग्रस्त झालेले दिसले. मी त्यांना कारण विचारलं तर कळलं, की हॉलवर येताना रस्त्यावरची गर्दी पाहून ते आधीच घाबरून गेले होते आणि आता हॉलच्या आतली गर्दी, वर्दळ आणि आवाज ऐकून नक्की काय चाललंय ते त्यांना कळेना. मग आमच्या एका मित्रानं त्यांना सांगितलं, ""प्रोफेसर, घाबरू नका. रस्त्यावरचा गोंधळ अनियोजित (अनप्लॅन्ड केऑस) होता; पण हॉलमधला गोंधळ नियोजित (प्लॅन्ड केऑस) आहे. भीतीचं काही कारण नाही.''

अमेरिकन प्रोफेसरची काळजी मी समजू शकले. कारण अमेरिकेच्या माझ्या मुक्कामात मला सात लग्नांना जाण्याचा योग आला होता. जरी ती लग्नं आमच्या मराठी मित्रमंडळी व नातेवाइकांकडची होती तरी ती अमेरिकन पद्धतीप्रमाणे अगदी शिस्तबद्ध होती! या लग्नांना मोजके लोक, मोजक्‍या गप्पा, मोजकं हसणं, शिस्तीत बसणं, चालणं, जेवणं. या टापटिपीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या भारतातील लग्नाची प्रोफेसरला काळजी वाटणं साहजिकच होतं आणि आपल्या लग्नांमधला मोकळेपणाचा आनंद कळायला प्रोफेसर कुठं भारतात जन्मलेले, वाढलेले होते?

अमेरिकेतील सात लग्नं पाहिल्यावर ही लग्नं भारतातल्या लग्नांपेक्षा कशी वेगळी वाटली, ते तपशीलवार लिहावंसं वाटलं, त्यावर काही मतं मांडावीशी वाटली. हे लिहिताना काही वेळा उगीचच दोन्हीकडच्या लग्नांची तुलना करण्याचा मोह झालाय. पण असंही वाटलं, की अशी तुलना करणं बरोबर नाही. कारण दोन्ही ठिकाणची सामाजिक परिस्थिती अगदी भिन्न आहे.

भारतीय अमेरिकनांची पुढची पिढी तर वेगळ्या मातीत रुजलेली, वाढलेली आहे. अमेरिकनांशी ती मिसळत चालली आहे. भारतीय अमेरिकन पालकांच्या बऱ्याच मुलांची लग्नं आता अमेरिकन जोडीदाराशी होत आहेत. या मुलांना अमेरिकन पद्धतीने लग्न करायला आवडणं साहजिकच आहे. त्यात मग त्यांच्या पालकांच्या इच्छेप्रमाणे काही लग्नं भारतीय व ख्रिश्‍चन, अशा दोन्ही पद्धतींनी लावली जातात. अशा सर्व गोष्टींमुळे ही लग्नं भारतातल्या लग्नांपेक्षा वेगळी जाणवणारच. इथली आखीवरेखीव, नेटकी लग्नं, रीतिरिवाज आणि मानापानाच्या पलीकडे जाऊन एखाद्या सुंदर पार्टीसारखा अनुभव आपल्याला देऊन जातात.

निमंत्रितांची संख्या :
माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीनं मला विचारलं होतं, ""भारतात तुझ्या मुलाच्या लग्नाला किती जणांना बोलावलं आहेस?'' मी म्हटलं, ""जवळजवळ एक हजार असतील.'' त्यावर डोळे विस्फारून ती म्हणाली, ""एवढे? इतक्‍या लोकांना तर मी ओळखतही नाही. आम्ही साधारण शंभर-सव्वाशे लोकांना बोलावतो.''

जास्त निमंत्रित म्हणजे जास्त काम व जास्त खर्च. या दोन्ही गोष्टी मध्यमवर्गीय अमेरिकनांना परवडत नाहीत; पण इथले भारतीय अमेरिकन लोक बऱ्यापैकी सधन आहेत, हौशी आहेत आणि वर्षानुवर्षं अमेरिकेत घालवल्यामुळे इथल्या अमेरिकनांसारखे सगळ्या प्रकारच्या कामांची सवय झालेले आहेत. त्यांच्याकडे लग्नांमधून तीनशे-साडेतीनशे क्वचित ठिकाणी सहाशेपर्यंत लोकही बोलावत असल्याचं ऐकलं. हौसेच्या किश्‍शात तर असंही ऐकलं, की शहा नावाच्या कुटुंबीयांच्या वॉशिंग्टन येथील लग्नासाठी विमानातून हत्ती आणला होता! इथल्या लग्नांचे हॉल बरेच मोठे दिसतात; पण हॉलच्या सुरक्षिततेच्या सरकारी नियमांमुळे निमंत्रितांच्या संख्येवर मर्यादा येते. तसंच निमंत्रितांची संख्या हवी तशी किंवा हवी तेव्हा वाढवताही येत नाही.

इथं वर्ष वर्ष आधी हॉल बुक करावा लागत असल्यामुळे निमंत्रितांची संख्या तेवढ्या आधी अंदाजे ठरवावी लागते. या निमंत्रितांना पाच-सहा महिने आधी "सेव्ह-अ-डेट'ची कार्डं जातात. त्यांच्याकडून आर.एस.व्ही.पी. मागवली जाते. (आर.एस.व्ही.पी. हा शब्द या फ्रेंच म्हणीवरून घेतला गेला आहे ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो, "रिप्लाय, इफ इट प्लीजेस यू.') ज्यांना लग्नाला येणं जमणार नसेल, त्यांच्याऐवजी यादीतील पुढच्या काही लोकांना बोलावण्यात येतं आणि मगच निमंत्रितांची संख्या नक्की केली जाते.

येथील काही लग्नांमध्ये लहान मुलांना आणू नये, अशी सूचना केलेली असते. काही यजमान लहान मुलांसाठी लग्नाच्या हॉलच्या जवळपास "बेबी सीटिंग'ची व्यवस्था करतात. त्यामुळेही निमंत्रितांची संख्या किंचित कमी होते.

भारतातल्या लग्नात निमंत्रितांची संख्या ऐसपैस असते; पण तिथलं आदरातिथ्य, पाहुण्यांची विचारपूस हीसुद्धा मनापासून ऐसपैस असते. मोजकी असलीच तर ती असते शिस्त; पण त्यावर भारतातले लोक म्हणतील, ""एवढे कमी लोक बोलावल्यावर आमचीही कार्यं शिस्तीत होतील.'' होतीलही कदाचित, निदान आपण तशी आपली समजूत करून घ्यायला काही हरकत नाही.
अर्थात शिस्तीपेक्षा आमची "अतिथी देवो भव' सांगणारी संस्कृती आम्हाला महत्त्वाची वाटते. इथल्या संस्कृतीत ""हॅलो, हाय, हाऊ आर यू?'' आणि स्मितहास्य आवर्जून असतं; पण निमंत्रितांची संख्या त्यामानाने कमी असूनही औपचारिकतेच्या पलीकडे जाणारी यजमानांची आपुलकी इथल्या मराठी लग्नातून अभावानेच आढळली.

मॅरेज का वेडिंग?
मराठीत आपण म्हणतो, ""मला लग्नाला जायचंय,'' पण इंग्रजीमध्ये म्हणताना "मला मॅरेजला जायचंय' असं म्हणत नाहीत, तर "वेडिंगला जायचंय' म्हणतात. काय फरक आहे सारख्याच वाटणाऱ्या या दोन इंग्रजी शब्दांत? अर्थ पाहायला गेलं तर मॅरेज म्हणजे लग्न आणि वेडिंग म्हणजे लग्नसमारंभ. पण खोलवर विचार केला तर मॅरेज हे आयुष्यभराचं असतं, तर वेडिंग हा एका दिवसापुरता समारंभ असतो.

या शब्दांचा विचार करण्याचं माझ्या मनात आलं, ते माझ्या अमेरिकेतल्या भाचीशी गप्पा झाल्यावर. या भाचीच्या लग्नाआधी दोन दिवस तिची झोपच उडाली होती. भारतातल्या मुलींची अशी स्थिती झाली तर मी समजू शकते. कारण लग्न झाल्या दिवसापासून मुलीच्या आयुष्यात मोठाच बदल होणार असतो. घर, माणसं, नाती, माणसांचे स्वभाव वगैरे कितीतरी गोष्टी बदलून जाणार असतात. या सगळ्याची काळजी कुठंतरी मनात दडून बसलेली असते.

पण भाचीच्या लग्नात असं काही असण्याची शक्‍यता वाटत नव्हती. गेली दोन-तीन वर्षं तिच्या मित्राबरोबर ती राहत होती. अशा राहण्याला इथं सामाजिक मान्यता असते. भाचीला मी विचारलं, ""तुला कशाची काळजी वाटतेय? आधी राहत होतीस, तशीच यापुढे राहणार आहेस. काय फरक पडणार आहे?'' त्यावर ती म्हणाली, ""मला सगळ्या समारंभाची, वेडिंगची काळजी वाटतेय. एवढे कष्ट घेतलेत तर सगळा समारंभ छान होईल ना?''

तिचं हे उत्तर मला अनपेक्षित होतं. या क्षणाला तिला मॅरेजची नाही तर वेडिंगची काळजी होती. दोन शब्दांतला फरक कळला आणि हेही कळलं, की मॅरेजच्या प्रश्‍नांसाठी इथे "मॅरेज काऊन्सेलर' असतात, तर वेडिंगच्या प्लॅनिंगसाठी "वेडिंग ऑर्गनायझर' असतात.

भाचीच्या उत्तराने मनात आणखी एक प्रश्‍न मात्र उपस्थित झाला. इथं मुलांना का एवढी समारंभाची काळजी? भारतात तर बहुसंख्य पालकच ही काळजी वाहत असतात. लग्नाला कुणाला बोलवायचं, खर्च किती करायचा, जेवणाचा बेत काय करायचा, इत्यादी ठरवण्याचे बरेचसे अधिकार पालकांना असतात. बहुतांशी खर्चही पालकच करत असतात.

इथं चित्र वेगळं आहे. समारंभाचे जवळजवळ सर्व हक्क मुलांच्या स्वाधीन असतात. तशी इथली मुलं खूप लहानपणापासूनच स्वावलंबी बनण्याकडे वाटचाल करत असतात. बरीचशी मुलं बारावीनंतर घराबाहेर राहून आपलं शिक्षण करत असतात. स्वतःच्या शिक्षणात जसा ते स्कॉलरशिप मिळवून किंवा नोकऱ्या करत आर्थिक वाटा उचलण्याचा प्रयत्न करतात, तसाच स्वतःच्या लग्नसमारंभासाठी स्वतःचा पैसा खर्च करतात. इथल्या भारतीय अमेरिकन पालकांच्या मुलांना जेवढं पैशाचं पाठबळ पालकांकडून मिळतं, तेवढं सर्वसामान्य अमेरिकन मुलांना मिळतंच, असं नाही. तरीही जमेल तेवढा लग्नसमारंभ चांगला करण्याचं सर्वांचं स्वप्न असतं. त्यामुळे लग्नसमारंभासाठी ती भरपूर मेहनत घेतात. असं सर्व असलं तरी इथल्या मुलांचा समारंभासाठीचा आटापिटा मला जरा अतीच वाटला. इथल्या टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात मॅरेज काऊन्सलरचं असं एक मत मी ऐकलं- "आमची मुलं वेडिंगऐवजी मॅरेजचा जास्त विचार करतील, तर त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं ते जास्त चांगलं होईल.'

अर्थात मॅरेजचा खोलवर विचार तरुणपणात किती जण करत असतील? मॅरेज टिकवण्यासाठी दोन्हीकडून सततची तडजोड लागते, पण व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेत तर अशा तडजोडीचा विचार करणं जरा कठीणच जात असेल. दुसरं म्हणजे, मॅरेज खूप वर्षं टिकलं म्हणजे ते सुखी मॅरेज असतं, असं काही सरसकट आढळत नाही.

थोडक्‍यात काय, वेडिंग या विषयापेक्षा मॅरेज हा विषय अत्यंत गहन व गुंतागुंतीचा आहे. त्यावर थोऱ्यामोठ्यांची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. वेडिंगवर असं काय मोठंसं लिखाण असणार आहे? नाही म्हणायला आता इथं "वेडिंग प्लॅनर' नावाखाली बऱ्याच रंगीबिरंगी चित्रांच्या पुस्तकांनी मोठा "बिझनेस' सुरू केला आहे.

कदाचित काही जण म्हणत असतील, ""मॅरेजचं बघू हो नंतर, आधी वेडिंग तर उत्तम करू या.''
इथले मॅरेज नियोजन :
आपल्याकडे हल्ली बरीच मुलं स्वतःची लग्नं स्वतःच ठरवतात. लग्नाआधी दोघांची बरीच ओळख झालेली असते. वागण्यामध्ये बराच मोकळेपणा आलेला असतो.

इथं अमेरिकेत एखाद्या मुलाची व मुलीची अशी जास्त (स्टेडी) मैत्री झाली, की त्यांच्या मैत्रीत एक दृढ नातं (रिलेशनशिप) निर्माण होऊ लागतं. बरीच जणं आईवडिलांपासून दूरच्या गावात शिक्षण किंवा नोकऱ्या करण्यासाठी जातच असतात. आईवडिलांच्या गावात मुलं असली तरी ती स्वतंत्र अपार्टमेंट घेऊन राहणं पसंत करतात, असं बहुतांशी आढळतं. "रिलेशनशिप'मध्ये असणारा मुलगा व मुलगी एखादं अपार्टमेंट "शेअर' करून राहतानाही आढळतात. अशा त्यांच्या एकत्र राहण्यानं कुणाच्याच भुवया उंचावल्या जात नाहीत. कारण ही गोष्ट इथं प्रथेबाहेरची समजली जात नाही.

असं एकत्र राहताना राहण्याचा सर्व खर्च मुलगा व मुलगी विभागून करत असतात. त्यांचं असं राहणं एखाद्या "स्टार्टर मॅरेज' सारखं असावं बहुतेक. या काळात त्यांना असं अजमावयाचं असतं, की नवरा-बायको म्हणून आपण एकमेकांना मान्य करू शकू का नाही? या प्रकारे "गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड' या नात्याने दोन-चार वर्षं एकत्र राहिल्यानंतर दोघांना मान्य असल्यास मुलगा मुलीला "प्रपोज' करतो. अशी मागणी घालण्याच्या वेळी मुलगा मुलीला एंगेजमेंट रिंग देतो. माझ्या एका भाचीच्या बॉयफ्रेंडला ताजमहालासमोर रिंग देण्याची इच्छा होती; पण ते न जमल्याने त्याने राजस्थानच्या एका महालात तिला रिंग घातली. एंगेजमेंटनंतर मुलगा-मुलगी एकमेकांचे "फियान्सी' म्हणून ओळखले जाऊ लागतात.

त्यांचे भारतीय अमेरिकन पालक या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात आणि मग सर्वानुमते वेडिंगची तारीख ठरवण्याचे बेत होऊ लागतात.

वेडिंगचे नियोजन :
वेडिंगच्या नियोजनात सर्वांत आधी हॉल बुक करणं व निमंत्रितांची संख्या ठरवणं, ही कामं करावी लागतात. निमंत्रितांची यादी करताना, इथली मुलं आपल्या पालकांची थोडीफार मदत घेत असतील. कारण भारतातले नातेवाईक, अमेरिकेतले नातेवाईक व मित्रमंडळी यांनाही निमंत्रणं जायची असतात, पण बाकी लग्न कसं करायचं, हॉल कुठला घ्यायचा, कसा सजवायचा, जेवणाचा मेन्यू काय ठरवायचा, याचे सर्व निर्णय बहुतांशी मुलंच घेत असतात. सर्व निमंत्रितांना लग्नाची तारीख कळवण्याच्या निमित्ताने मुलांचा खूप आधीपासून निमंत्रितांशी संपर्क सुरू होतो.
यापाठोपाठ मुलांची व पालकांची भरपूर कामं सुरू होतात. निमंत्रणपत्रिका कशी असावी, यावर मुलांचा बराच "रिसर्च' होतो. निमंत्रणपत्रिकेबरोबर अनेक गोष्टी पाठवायच्या असतात. उदाहरणार्थ आर.एस.व्ही.पी.चं कार्ड, हॉटेल्सचे पत्ते, लग्नाच्या ठिकाणचा नकाशा, आहेराची रजिस्ट्री, लग्न व रिसेप्शनची स्वतंत्र कार्डं वगैरे निमंत्रणातून पाठवलं जातं.

हल्ली इंटरनेटमुळे यातली बरीचशी कार्डं लग्नाची "वेबसाईट' बनवून, त्याद्वारे पाठवली जातात. या वेबसाइटवर निमंत्रण तर असतंच, शिवाय मुलाकडच्या व मुलीकडच्या कुटुंबांची माहिती, मुलानं मुलीला कसं प्रपोज केलं त्याची गोष्ट, मुलीच्या करवल्या (ब्राइड्‌समेड), मुलाचा करवला (बेस्ट मॅन) यांची माहिती गंमतशीर पद्धतीने दिली जाते. या वेबसाइटवर आर.एस.व्ही.पी. करण्याची सोय असते, तशीच आहेर पाठवण्याचीही सोय असते. आहेर वेबसाइटवरील रजिस्ट्रीमार्फत आपण पाठवू शकतो.

रजिस्ट्री हा प्रकार आपल्याला नवीनच असतो. रजिस्ट्री म्हणजे वधू-वरांना आहेरामधून, त्यांच्या भावी संसाराला उपयुक्त अशा कोणत्या वस्तू आवडतील, त्या वस्तूंची यादी. त्या वस्तू कोणत्या दुकानात मिळतील, त्या दुकानांच्या वेबसाइट दिल्या जातात. त्या वेबसाइटवर वस्तूंच्या किमती दिलेल्या असतात. आपल्या बजेटप्रमाणे वस्तू वेबवरच खरेदी करून, वेडिंग पॅकेज करून वधू-वरांना पोचवण्याची सोय दुकाने करतात. मात्र, वेबवरून वस्तू पाठवताना वस्तूची किंमत, तिच्यावरचा टॅक्‍स व बऱ्यापैकी पोस्टेज द्यावं लागतं. लग्नाला ऐन वेळी वेगळा आहेरही तुम्ही नेऊ शकता; पण तो आहेरासाठी ठेवलेल्या टेबलवर ठेवावा लागतो. समारंभाच्या वेळी मुलांच्या हातात आहेर द्यायची पद्धत इथं दिसली नाही.

आहेरासंबंधी हल्ली आपल्याकडे "आपले आशीर्वाद हाच आहेर' किंवा "कृपया आहेर आणू नये' असं पत्रिकेतच लिहिलं जातं व सर्वांकडून पाळलंही जातं. त्यामुळे आहेर आणण्याच्या "अवघड' कामातून निमंत्रितांना चांगलं मुक्त केलं आहे.

इथली लग्नाची वेबसाइट वेळोवेळी अपडेट केली जाते. लग्नाला बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांच्या एक-दोन रात्रीच्या मुक्कामासाठी लग्नाच्या हॉलजवळची हॉटेल्स कोणती, तेथील खोल्यांचे दर, त्यांचे नकाशे वेबसाइटवर दिले जातात.

अमेरिकेत लग्नाला येणाऱ्या अशा पाहुण्यांना लग्नघरी उतरण्याची सोय अभावानेच आढळते. अगदी सख्ख्यातले आप्तेष्टही हॉटेलवर उतरलेले बहुतेक ठिकाणी आढळले. यातल्या अनेक यजमानांची घरं खरं म्हणजे बऱ्यापैकी मोठी असतात; पण इथं कदाचित नोकरचाकर कामाला नसल्याने तशी पद्धत पडली असावी किंवा काही ठिकाणी सर्वांनाच प्रायव्हसी अतिशय प्रिय असावी. पण लग्नकार्यांमध्ये लग्नघरी एकत्र राहण्यात केवढी मजा असते, ते भारतातल्या लग्नात कळतं. थोडी गैरसोय झाली तरी लग्नघरातल्या गप्पा, कामं करणं, हसणं, पत्ते खेळणं भारतातल्या लग्नांमधूनच अनुभवावं आणि कायमचं स्मृतीत ठेवावं.

अमेरिकेतल्या लग्नाच्या पाहुण्यांनी उतरायची हॉटेल्स लग्नसमारंभाच्या हॉलच्या जवळपासच असतात. ज्यांना लांबच्या हॉटेलात उतरायचं असेल, ते एखादी गाडी भाड्याने घेऊ शकतात. कारण अमेरिकेत पब्लिक ट्रान्स्पोर्ट अगदी शहरातच चांगला आहे. टॅक्‍सीची सोय असते, पण ती फारच महाग पडते. आणि इथं कुठल्याही नवख्या गावात ड्रायव्हिंग करणं व पत्ते शोधून काढणं यासारखं क्‍लिष्ट काम अमेरिकेने सर्वसामान्यांसाठी अतिशय सोईचं बनवलेलं आहे. सर्व देशभरातल्या रस्त्यांच्या सुविधा आश्‍चर्यकारकपणे उत्तम आहेत.

इथली मुलं लग्नाच्या वेबसाइटची कामं स्वतःच्या नोकऱ्या सांभाळून करत असतात. एकीकडे पालकांच्या खरेदीसाठी भारत, सिंगापूर अशा वाऱ्या सुरू होतात. इथं रिसेप्शनच्या वेळी प्रत्येक व्यक्तीला एक छोटी, छानशी वस्तू "पार्टी फेव्हर' दिली जाते. परगावाहून लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी फराळाच्या पिशव्या म्हणजे "गुडी बॅग' तयार करण्याची योजना केली जाते. आणि इतर अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं. उदाहरणार्थ आता इथंही मेंदीचा कार्यक्रम होतो, त्या वेळी काही ठिकाणी संगीत, जेवण असंही असतं. कुणाकुणाकडे केळवणं ऊर्फ "ब्राइडल शॉवर्स' होणार असतात. त्यांच्या तारखा ठरवल्या जातात.

इथल्या ब्राइड्‌समेडसाठी पोशाख काही ठिकाणी मुलीकडून केला जातो. एकापेक्षा जास्त ब्राइड्‌समेड असतील तर सर्वांचे पोशाख सारखे असतात व ते कसे असावेत, ते नवरीमुलगी ठरवते. नवऱ्यामुलाचा अगदी जवळचा मित्र, कदाचित त्याचा भाऊही, "बेस्टमॅन' म्हणून लग्नात मिरवणार असतो. ही सर्व मंडळी वधूवरांना त्यांच्या तयारीच्या कामात खूप मदत करत असतात. काही ठिकाणी ही मित्रमंडळी वधू-वरांसाठी लग्नाआधी एखादी "बॅचलरेट पार्टी' करतात, ज्याचे "हॅंग आऊट' रात्री उशिरापर्यंत चालू असते.

भारतीय पद्धतीने लग्न लावण्यासाठी गुरुजींचा शोध घेतला जातो. हे गुरुजी म्हणजे बहुतेक ठिकाणी पालकांच्या मित्रांपैकीच कोणीतरी "हौशी कलाकार' असतात. कोणी डॉक्‍टर, कोणी इंजिनिअर किंवा इतर कोणी ज्यांना पूजापाठाची आवड किंवा थोडंसं ट्रेनिंग आहे, अशा व्यक्ती दिलेल्या वेळात छान लग्न लावतात. माझ्या एका भाचीच्या लग्नात न्यूयॉर्कमधील एका न्यूरोसर्जनने उपस्थितांशी संवाद साधत उत्तम प्रकारे लग्न लावलं. त्यांचा पुणेरी पगडीसकटचा पोशाख छान दिसत होता. लग्नाला अमेरिकन लोक उपस्थित असल्यास त्यांना लग्नविधींची माहिती देणाऱ्या पुस्तिका छापून घेण्याचं नियोजन केलं जातं.

अमेरिकेत एक बरं असतं, की लग्न, रिसेप्शन सर्वांचे "मुहूर्त' वीकएंडचेच असतात. त्यामुळे सुटीचा फारसा प्रश्‍न येत नाही. इथल्या महाराष्ट्र मंडळातही आपले सणवार वीकएन्डलाच साजरे करण्याची प्रथा दिसली.

नवरा मुलगा भारतीय अमेरिकनांकडचा असेल तर बरेच ठिकाणी व्याहीभोजन केलं जातं. बहुतेक ठिकाणी ते रेस्टॉरंटमध्येच होतं. घरच्या केळवणाचे बेत ठरवले जातात. काही उत्साही मंडळी केळवणासाठी घरी स्वयंपाक करतात. अमेरिकेत बाहेरून जेवण ऑर्डर देऊन मागवता येतं, पण ते बहुतेक गुजराती, उत्तर हिंदुस्थानी किंवा दाक्षिणात्य प्रकारचं असतं. खास मराठी स्वयंपाक हवा असेल तर घरी करावा लागतो. पण इथं आचारी किंवा हाताखाली माणसं कामाला मिळणं कठीण. मात्र, इथल्या गृहिणींनी या अडचणींवर चांगलीच मात केली आहे. नोकरांच्या मदतीशिवाय सर्व जणी मिळून पंचपक्वान्नाचं जेवणही फार छान बनवतात. इथल्या स्वयंपाकघरापासून सर्वच बाबतींत सोई खूप असल्या, तरी बऱ्याच जणींची भरपूर काम करायची तयारी असते.

लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी "रिहर्सल'ची पद्धत अनेक ठिकाणी पाहिली. या लग्नाच्या रिहर्सलसाठी मोजके लोकच असतात. दोन्हीकडचे कुटुंब, गुरुजी आणि अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी... यांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशीच्या सर्व लग्नविधींची "रंगीत तालीम' होते. त्यानंतर ते सर्व जण बाहेर जेवायला जातात.

लग्नाच्या वेळी लागणाऱ्या अक्षता, फुलं व इतर तयारीची योजना केली जाते. इथं ताज्या फुलांचे हार फारच महाग म्हणजे एक हार पंचाहत्तर डॉलरला असल्याचं ऐकलं. अशा वेळी आपल्या तुळशीबागेतल्या खऱ्यासारख्या वाटणाऱ्या हारांचा काही जण आधार घेतात.
इथं भारतीय अमेरिकन मुलं, मुली लग्नविधींच्या वेळी पूर्ण भारतीय पोशाखात आढळले. रिसेप्शनच्या व ख्रिश्‍चन लग्नाच्या वेळी मात्र त्या सर्वांचा पोशाख पाश्‍चिमात्य पद्धतीचा केलेला आढळला.

रिसेप्शनच्या वेळी डान्स करण्याची इथं पद्धत पाहिली. हा डान्स करणं तरुण मुलांना सहजी जमतं. पण काही भारतीय अमेरिकन पालकांना त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणून मग "डान्स लेसन्स'च्या तारखा ठरवण्याचंही नियोजन करावं लागतं. ब्यूटिशियनच्या अपॉइंटमेंट नक्की केल्या जातात. आपल्याकडेही अशा अनेक कामांचं नियोजन करावं लागतंच. फक्त इथं काही कामांचं स्वरूप वेगळं असतं.

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti, 

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,