* लग्न व्हायलाच हवे का? *
कुठलीही किंमत देऊन लग्न झालेच पाहिजे का? लग्नातच संपूर्ण आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? लग्न झाले नाही, तर आपण आयुष्यात अयशस्वी ठरतो का? लग्नाला आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे? आणि हे महत्त्व मुलगा आणि मुलगी यानुसार वेगवेगळे असते?
आपल्या समाजात विशेषतः मुलींना एका ठराविक वयानंतर लग्न व्हायलाच हवे, याचे सामाजिक भावनिक प्रचंड दडपण येते. लग्न झाले नाही तर लोक काय म्हणतील, अशी भीती वाटू लागते. आजूबाजूचे चार लोकही "अजून नाही का जमलं?' अशी आडून वा अगदी सरळ सरळ देखील चौकशी करू लागतात. फारच स्थळे पाहिली गेली व तरी जमत नसेल तर "हिच्यातच काहीतरी खोट असणार,' असेही म्हटले जाते!
मुलगी शिक्षित हवी, कमवती हवी, पण मर्यादेतच. अतिउच्चशिक्षित आणि चांगला पगार वा स्वतःचा व्यवसाय असलेल्या मुलीला चांगला नवरा मिळत नाही म्हणून आज कितीतरी भरारी मारू इच्छिणाऱ्या मुलींचे पंख त्यांचे स्वतःचे पालकच कापतात. अगदी हुशारात हुशार, कर्तबगार मुलीच्याही मागे एका ठराविक वयानंतर "लग्न' हे एकमेव उद्दिष्ट ठेवले जाते. त्या वेळेस तिने मिळवलेली अनेक प्रमाणपत्रे, शिष्यवृत्त्या, पदके, बक्षिसे हे सारे सारे काही गौण ठरते आणि ती गौरवर्ण आहे, की गहुवर्णीय, सुंदर आहे की स्मार्ट आणि नाकीडोळी नीटस, गृहकृत्यदक्ष आहे की शिकवले तर शिकायची तयारी असलेली, मनमिळाऊ स्वभावाची आहे की स्वतंत्र संसार थाटायची इच्छा असलेली, एवढेच तिचे मूल्यमापन उरते आणि सुरू होते "सारे काही लग्नासाठी'ची प्राणांतिक धडपड, अपेक्षांना मुरड घातली जाते.
आपलीच स्वप्ने आपल्याच हाताने पुसून टाकली जातात, स्थळे पाहताना वाटणारे अपमान, येणारी चीड ओठ दाबून हसतमुखाने गिळली जाते आणि लग्नासाठी म्हणेल त्या स्थळाला होकार देण्याची मानसिक तयारी केली जाते. मग पुढे आयुष्याचे काही का होईना! देवावर आणि दैवावर भरवसा टाकून फक्त मुलीच नव्हे, तर मुलींचे आई-वडीलही कित्येकदा फारशा पसंत नसलेल्या स्थळाला, पुढे अडचणी येतील हे माहीत असूनदेखील नाईलाजाने होकार देतात आणि एकदाचे लग्न झाल्याचा शिक्का कपाळी मारून घेतात.
लग्नाचा हा अट्टहास कशासाठी? का? आजही एकविसाव्या शतकातील सुशिक्षित मुलीला स्वतःची ओळख लग्न झाल्याशिवाय पटत नाही का? की अपुरी वाटते? आपल्या मनासारखा (अपेक्षांचा दुराग्रह न धरता) सुयोग्य पती मिळेस्तोवर, एकमेकांच्या अपेक्षा जुळेस्तोवर थांबणं, उशिराने लग्न झाले तर सामाजिक, भावनिक असुरक्षितता आजच्या 21 व्या शतकातील मुलींना भेडसावत असेल तर आपल्या समाजाचे पुरोगामित्व कशात शोधायचे? आजची तरुण पिढी शिक्षणाचा, कर्तृत्वाचा आणि कर्तबगारीचा अभिमान बाळगण्याऐवजी केवळ गळ्यात वरमाला पडणे हे जीवनातील सर्वोच्च यश/ध्येय मानू लागली तर ते आपल्या समाजाला भूषणावह ठरेल काय?
आपल्यासाठी लग्न, विवाह हा संस्कार आहे की लग्नासाठी आपण आणि आपले आयुष्य आहोत? लग्न केल्याने एक विशिष्ट आयुष्यपद्धती आपण स्वीकारतो, काही जबाबदाऱ्या स्वीकारतो, सुख-दुःख वाटण्यासाठी जोडीदार निवडतो; पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य, स्वतःचे अस्तित्व विसरणे योग्य ठरणार नाही हे कोणीही मान्य करील. याचा अर्थ लग्न करू नये, असा नाही. पण पुढील आयुष्यात लग्नामुळे आणखीनच समस्या निर्माण व्हायचा संभव आहे, याची जाणीव असूनदेखील नाईलाजाने केवळ लग्न झालेच पाहिजे, या अट्टहासाने कोणालाही होकार द्यायची वेळ कोणत्याच व्यक्तीवर केवळ सामाजिक दबावामुळे येऊ नये, हेही तितकेच खरे. अशा परिस्थितीत लग्न होत नाही म्हणून वाटणारी भावनिक असुरक्षितता, सामाजिक नाचक्की हे सर्व अयोग्यच म्हणायला हवे.
लग्न हा संपूर्ण आयुष्याचा एक भाग आहे. संपूर्ण आयुष्य नव्हे. या व्यतिरिक्त असलेले मुलीचे अनेक गुण, त्यांचे शिक्षण, त्यांचे कर्तृत्व, त्यातून झळाळून उठणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यातून घडणारे त्याचे आयुष्य या साऱ्यांना तितकेच महत्त्व नाही का? मग त्यांची परिपूर्ती करण्यात, त्यासाठी ताठ मानेने, अभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्यात आपल्याला सामाजिक असुरक्षितता, भावनिक असुरक्षितता का जाणवावी? पण जाणवते हे सत्य आहे. आज 21 व्या शतकातील महिलेसाठी ही जितकी लांच्छनास्पद बाब आहे, तितकीच आपल्या भारतीय समाजासाठीही! ही मानसिकता आपल्याला ठरवून, जाणवून उमजून, बदलायला हवी. सर्वसामान्य मुलीला लग्न केव्हा, कुणाशी आणि कधी करायचे की करायचेच नाही, हा निर्णय स्वबळावर घेता यायला हवा. काही कारणामुळे लग्न न झाल्यास जर मुलीचा आत्मविश्वासच हरवत असेल, आपले आयुष्य विफल वाटत असेल, समाज आपल्याला काय म्हणेल अशी भीती वाटत असेल, तर माझ्या मते हे समाज म्हणून आपलेच अपयश मानायला हवे. अयशस्वी विवाहापेक्षा आत्मविश्वासपूर्ण, सन्मानपूर्वक आणि कर्तृत्ववान जीवन जगणे निश्चितच चांगले, असा आधार आपण आपल्या मुलींना द्यायलाच हवा, असे नाही का तुम्हालाही वाटत?
याविषयी लिहिण्यासारखे अजून बरेच आहे; पण जाता जाता एवढे निश्चित नमूद करावेसे वाटते, की ही समस्या फक्त उपवर मुलींची नाही, तर समाज या नात्याने आपलीही आहे आणि त्याचा विचार आपण सर्वांनी मिळून करायला हवा. अशीच समस्या मुलांनाही जाणवते आहे; पण थोड्या वेगळ्या स्वरूपात!