* नवीन विचारांचे स्वागत*
मध्यंतरी एका जवळच्या नातेवाइकाच्या लग्नाला जाण्याचा योग आला. खरंच खूप आनंद झाला, कारण चार-सहा महिन्यांपूर्वीच नवरदेवाच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले होते. आम्हा सर्वांनाच तो मोठा धक्का होता. त्या प्रसंगातून सावरून एका आनंदाच्या क्षणाला हे घर सामोरे जात आहे, हे बघून खूप बरे वाटले. लग्नाचा डामडौल नव्हता. वहिनींनी एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची खपू तयारी केली होती. लग्न ठरले त्यावेळीच त्यांचे आमच्याकडे येणे जाणे जास्त होते. कारण मुलगी ही माझ्या माहितीतील होती. मुलाचे आई-वडील मुलीवर जाम खूश होते. सोयरीक चांगली झाली, म्हणून एकंदरीत आनंदाचेच वातावरण होते. मानपानाच्या अटी काही नव्हत्या. फक्त तिथी ठरत नव्हती. अशात अचानक दैवाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.... लग्नात वहिनी एका बाजूला बसून होत्या. सर्व महत्त्वाचे विधी दिराने-जावेने केले.
सर्व मान-सन्मान त्या दोघांना मिळाला. मनात खूप वाईट वाटले. नवरा गेल्याने बाईचे सर्व अधिकार एका क्षणात कसे काय नाहिसे होतात? मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात, देवकार्यात त्यांना न कळत, का बहिष्कृत केलं जातं? का नाही आईने सुनेची ओटी भरायची? का नाही दागिने घालून कुंकवाचा टिळा लावायचा? कुणी सुरू केल्या प्रथा? कुणी निर्माण केले हक्क? आपणच ना? मग आपण आता काळाप्रमाणे बदलायला नको का? अचानक नवऱ्याचे निधन झाले, तर कन्यादानासारखा पवित्र हक्क एका मातेपासून का हिरावून घ्यावा? इतकी स्वप्नं आपल्या अपत्याबाबत बघितली असताना त्यांच्या महत्त्वपूर्ण विधींना मात्र अशा मातांना मान मिळायला नको का?
माझ्या एका मैत्रिणीला तिच्या पतीचे निधन झाल्यावर बिनधास्त मंगळसूत्र घालायला व कुंकू लावायला प्रोत्साहन दिले. अर्थात निर्णय तिचा तिनेच घेतल्यामुळे ती खंबीर होती. फक्त कुणीतरी हो म्हणायचाच अवकाश होता. एवढेच नव्हे तर आम्ही बाकी मैत्रिणी तिला संक्रात-चैत्रागौरीला हळदी-कुंकूलासुद्धा बोलावतो. तिच्या मिस्टरांचे निधन झाल्याने "ही' अपवित्र कशी? हिची काय चूक? बरे! लौकिरार्थाने निधन जरी झाले असले तरी तिच्या मनात त्यांच्या आठवणी जिवंत असतील. तिच्या आधारावर जर तिची मार्गक्रमणा चालू असले, तर तिला आपण कर्मकांडाच्या नावाखाली परत-परत वैधव्याची आठवण का करून देतो? मंगळसूत्राने जर तिचे समाजातील वाईट नजरांपासून संरक्षण होत असेल तर का नको?
मध्यंतरी एका ठिकाणी आईने निवृत्ती घेतली, म्हणून तिच्या हातून सत्यनारायणाची पूजा घालायचा विचार मुलांनी बोलून दाखवला, परंतु वडील नसल्याने आईने पूजा करू नये, असे गुरुजींनी सांगितले. परंतु पूजा आईच करणार, आईच्याच हस्ते आम्हाला ती करायची आहे, असे मुलगा-सून व मुलीने व जावयाने ठणकावून सांगितल्याने गुरुजी निघून गेले. परंतु सर्वांसमक्ष त्या गुणी मुलांनी आपल्या आईला योग्य सन्मान देऊन तिच्या हातूनच पूजा करविली. अशा जागरूक मुलांचे खरेच कौतुक वाटले.
रथसप्तमी-प्रवासी दिन. यादिवशी एस. टी. स्टॅंडवर मला ग्राहक पंचायतीतर्फे आमंत्रित केले गेले होते. ज्येष्ठ नागरिकांकडून एका एस. टी. ची पूजा करायची असते. तिथे उपस्थित असलेल्या एका वारकरी आजींना मी पुढे बोलावले व म्हटले करा आजी पूजा! तर दोन्ही गालावर हात मारत, कपाळाकडे बोट दाखवत ती नाही म्हणाली. तेवढ्यात कंडक्टर ओरडला, त्या म्हातारीने नाही करायची पूजा. अहो! नवरा कुठं आहे तिला? मी म्हटले काय बिघडले? एस. टी. ची पूजा एका प्रवाशाने किंवा ग्राहकाने करायची असते. त्यात वैधव्य कुठं आड आलं? करू द्या त्यांना पूजा. तर सर्व जणांनी मलाच विरोध केला. नंतर एका वृद्ध गृहस्थाने पूजा केली, पण त्याला कुणी बायको आहे का? याची विचारणा केली नाही.
"कुंकू लावणे' याचा खरा अर्थ "ज्ञानचक्षूची जाणीव होत राहावी' असा होतो. या मागची कथा अशी असावी- सर्व मानवाला तृतीय नेत्र असते. सामान्यांसाठी तो मनःचक्षू असतो आणि ज्ञानवंतासाठी तो ज्ञानचक्षू असतो. त्याची जागा भृकुटी-मध्यावर असते, म्हणूनच बायका हळद-कुंकू, पुरुष गंध, बुक्का, अंगारा किंवा बाळांना तिट्टी तेथेच लावतात. त्या ज्ञानचक्षूची जाणीव व्हावी, या हेतूनेच ही त्याच्या पूजेची व त्या निमित्ताने तेथे स्पर्श केला जाऊन ते स्थान जागृत व्हावे, यासाठीचही कुंकू लावायची पद्धत रूढ झाली असावी.
खरंतर आपण कुंकू हे लहानपणापासूनच लावतो आणि त्यावर आपला स्वतःचा पूर्ण अधिकार आहे. आज बहुतेक स्त्रिया या पती निधनानंतर मंगळसूत्र व कुंकू ठेवतात. त्यांना आपण विरोध न करता प्रोत्साहन द्यावे. तिचे कोणतेही अधिकार डावलू नयेत. ज्याप्रमाणे जीवनाच्या सर्व स्तरात आज बदल घडून येत आहेत, त्याप्रमाणे हा बदलाचे स्वागत केले पाहिजे.