झेंडूची रसिका, फुले जमवुनी देतो तुझ्या ही करी (विडंबन)
मनि तुलाच सखया वरले रे
मनि तुलाच सखया वरले रे
थांब जरासा
डोक्यावर टक्कल पडले रे
तोंडात दात नच उरले रे
तुज बघून तरि मी भुलले रे
थांब जरासा
तव बॅंक असे भरलेली
घर, कार असे सजलेली
ही "माया' मज रुचलेली रे
े थांब जरासा
नुसतेच नको हे फिरणे
हे पुरे हॉटेली चरणे
मी किती प्रतीक्षा करणे रे ?
सांग जरासा
..............................................
मैफलीत कोणी नडले रे
मैफलीत कोणी नडले रे
हास जरासा
बघताच रसिकजन चिडलेले
ऐकून काव्य तव पिडलेले
रागात कुणी बडबडले रे
हास जरासा
ती झाली गडबड थोडी
रसिकांची पाहुन गोडी
चुटक्यांची सोडी होडी रे
हास जरासा
नुसतेच उसासे भरणे
नुसतेच घसा खाकरणे
नुसतेच उगा गुरगुरणे रे
हास जरासा
..............................................
बघ घरात उंदिर घुसला रे
बघ घरात उंदिर घुसला रे
मार तयाला
तो कपाटात तडमडला रे
बूट किती कुरतडला रे
मग घरात जो तो चिडला रे
मार तयाला
ही जमीन खाली ओली
तेथेच बिळाची खोली
वाहु मी किती लाखोली रे
मार तयाला
नुसतेच फळ्यांवर फिरणे
अन् डब्यात उघड्या शिरणे
ऐकवे न ते चिरचिरणे रे
मार तयाला
..............................................
तुजसाठि राग हा गाते रे
तुजसाठि राग हा गाते रे
ऐक जरासा
मालकंस की यमन आळवू ?
उदासीनतेलाही पळवू
ये, हृदयाच्या तारा जुळवू
ऐक जरासा
लक्ष तुझे हे घरात नसते
मनी तुझ्या शेजारिण वसते
मला मनोमन भिती वाटते
ऐक जरासा
मम गानाचा असा फायदा
"घरात बसतो' करशि वायदा
तुजसाठी हा बरा कायदा
ऐक जरासा
..............................................
धन खलास सारे झाले रे
धन खलास सारे झाले रे
काय करू मी ?
ते बेत मनातिल फसले रे
धनधान्य कसे ते गेले रे
अडचणीत घर हे आले रे
काय करू मी ?
ही गुरे भुकेली गोठ्याला
धंदाही आला तोट्याला
कपाळ बडवू धोंड्याला रे
काय करू मी ?
कामाविण नुसते झुरणे
नुसतेच रिकामे बसणे
हा घोर जिवाला पडणे रे
काय करू मी ?
..............................................
जग तमात अमुचे बुडले गे
जग तमात अमुचे बुडले गे
थांब जराशी
तिमिरात डास गुणगुणले गे
मेणात दिवे मिणमिणले गे
बघ जाल तमाने विणले गे
थांब जराशी
तुजशिवाय यंत्रे रडती ही
कामे पण सारी अडती ही
माणसे किती धडपडती ही
थांब जराशी
नुसतेच दिवस हे सरणे
अम्ही केवळ आशा करणे
अन् सर्व निकामी ठरणे गे
थांब जराशी
..............................................
धन घरात ठासुन भरले रे
धन घरात ठासुन भरले रे
वाट जरासे
धन बिछान्यातुनी लपले रे
गृहिणींना व्यापुन उरले रे
धनजाल तुला ना सुटले रे
वाट जरासे
ही काळी माया सगळी
सोडून जायचे भाळी
काळाशी करशिल बोली रे
वाट जरासे
नुसतेच आपुले भरणे
ना विचार दुसरा करणे
तव हाती जनहित करणे रे
वाट जरासे