Chota Kavi



"आता विश्वात्मके देवे"

"पसाय" म्हणजे प्रसाद हे पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे विश्वात्मक देवाजवळ. प्रसाद हा शब्द सुद्धा चांगला आहे. "प्रसादे सर्वदु:खानाम हानिरस्योप जायते !!" अंतःकरणाची प्रसादता, अंतःकरणाची प्रसन्नता, अंतःकरणाचा प्रल्हाद हा त्या प्रसाद शब्दाचा अर्थ. पण ज्ञानेश्वरांनी त्याचा वापरलेला जो मराठी पर्याय आहे तो अधिक आस्वाद्य आहे.
"पसाय" हा प्रसाद ज्ञानेश्वरांनी कोणाजवळ मागावा...? हा प्रसाद सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभंग ज्यांना अनुवादन करून ज्ञानेश्वरांनी केला ओम नमोजी आज्ञा....., त्या विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेला आहे.

इतके दिवस हा ९००० ओव्यांचा हा वाग्यज्ञ केला, याने प्रसन्न व्हावे या विश्वात्मक देवाने आणि तोषोनि मज द्यावे पसायदान हे. माझ्या झोळीमध्ये या प्रसादाची भिक्षा टाकावी, कोणता प्रसाद मागतायत ज्ञानेश्वर...???

काय गम्मत आहे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला भक्तीचा वळण लावलं. संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तीच पोषण केलं आणि देवाच्या नादी लावलेत लोकांना, अशी जी सज्जन माणस त्यांची आठवण पसायदान मागताना ज्ञानेश्वरांना झाली नाही. झाली ती ज्या प्रवृत्तीने ज्ञानेश्वरांचा छळ केला त्या दृष्ट लोकांची आठवण पहिल्यांदा झाली, त्या खल पुरुषांची आठवण पहिल्यांदा झाली, हा सज्जन सत्पुरुषांवर अन्याय नाही का? ज्ञानेश्वरांनी शेवटचं "पसायदान" विश्वात्मक देवाजवळ मागताना झुकतं माप पहिल्यांदा त्या खल-पुरुषांना द्यावं? हा अन्याय नाही, हाहाहा हा अन्याय नाही मित्रांनो कारण ज्ञानेश्वरांना आपण माउली म्हणतो , त्याच हे प्रत्युत्तर आहे ,त्याच हे प्रत्युत्तर आहे , याच कारण "माउली" आपल्या चांगल्या पत्यावर प्रेम करतेच पण वाईट अपत्याबद्दल अधिक कळवळा बाळगते. कारण तिला हि खात्री असते कि आपला जो चांगला मुलगा आहे त्याचा चांगल्यापणामुळे जग त्याला जवळ केल्याशिवाय राहणार नाही पण हा जो पांगला आहे त्याला जग दूर लोटेल त्याला प्रेमाने जवळ घेणारं एकच स्थळ आहे ते म्हणजे "मातृदृदय".

ज्ञानेश्वरांना आपण माउली म्हणतो, या मताने पहिला कळवळा हा खल-पुरुषांचा आहे. "जे खळांची व्यंकटी सांडो" त्यांची पहिली प्रार्थना अशी आहे. कि खळांची व्यंकटी म्हणजे मनाचा वाकडेपणा, मनाचा दुष्टपणा सांडो म्हणजे तो नष्ट होवो. ज्ञानेश्वरांनी खल नष्ट होवो अस म्हटलेलं नाही, खळांची व्यंकटी नष्ट होवो एवढंच म्हटल आहे. खल राहिले तरी चालतील , त्याचं खलत्व गळून खाली पडल कि त्यानंतर उरलेला जो मनुष्य आहे तो ज्ञानेश्वरांना स्वीकार्य आहे. याच कारण नंतर त्या माणसाची देवत्वाकडे होणारी वाटचाल आपल्याला सुकर करता येते. ज्ञानेश्वरांचा माणसाच्या मुलभूत माणूसपणावर अत्यंत प्रगाढ आशा रीतीचा विश्वास आहे, म्हणून ते म्हणतात कि "खळांची व्यंकटी सांडो" खुद्ध गीता ज्याने सांगितली आहे तो गीतेचा प्रवक्ता भगवान श्री कृष्ण आपल्या अवताराचं प्रयोजन सांगताना अस म्हणतो "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत, अभि-उत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् । परित्राणाय साधूनां विनाशाय च दुस्-कृताम्, धर्म-संस्थापन-अर्थाय सम्भवामि युगे ..."

ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी होते तेव्हा धर्माचा अभि-उत्थानम् घडवून आणण्याकरता मी जन्म घेईन आणि काय करीन? "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुस्-कृताम्" साधूंचा मी परित्रण करीन आणि दुष्टांचा विनाश घडवून आणीन. प्रत्यक्ष श्री कृष्ण दृष्टांच्या विनाशाची भाषा बोलतो. आणि त्याचा भक्त ज्ञानेश्वर फक्त दुष्टपणा नष्ट होण्याची भाषा करतात. कारण ज्ञानेश्वरांना माहित आहे कि दुष्टांना नष्ट करून जगातून दुष्ट प्रवृत्ती कधीही नष्ट झालेली नाही. (लादेनचे उदाहरण) त्यामुळे दुष्टप्रवृत्ती नष्ट होण्याची प्रार्थना ज्ञानेश्वर करताहेत. दुष्ट राहिला तरी चालेल. "जे खळांची व्यंकटी सांडो" कशी सांडेल? त्याचीही रीत ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या ओळीत दिली आहे.

त्यांना चांगल्या गोष्टीमध्ये , चांगल्या कर्मांमध्ये रती म्हणजे आवड वाढो. ज्ञानेश्वरांनी रती रुजो असं म्हटलं नाही, रती वाढो म्हटलं आहे, याचा अर्थ कितीही दुष्ट असला तरीही त्याला सत्कार्मामध्ये रती असतेच ते या महात्म्याने गृहीत धरलेले आहे. फक्त असलेली रती वाढो. चांगल्या गोष्टी बद्दल ची आवड वाढली कि वाईट गोष्टीकडचा कल ओढा आपोआप कमी होईल. असं त्याचा सिद्धांत आहे. आणि मग

भूता म्हणजे भूतलावरील प्राणीमात्र.एकदा का दुष्टपणा नाहीसा झाला आणि दुष्टांना सुद्धा चांगल्या कामामध्ये रममाण करून सोडलं कि मग आपोआप जगातले सर्व जीव परस्परांवर प्रेम करायला लागतील. जगातल्या जीवमात्रांच परस्परामधलं सख्य वाढावं ते स्वप्न ज्ञानेश्वर पाहतायत. केवळ मनुष्यमात्रांच नाही, ज्या कळत कळत ज्ञानेश्वरांचा हा पसायदानाचा हा उद्गार आपण उच्चारतोत त्या काळात सुद्धा माणसाचाच माणसावर विश्वास उरलेला नाही. माणसाला माणसाबद्दल संशय आहे. माणसाला माणसाबद्दल अविश्वास आहे. माणसाला माणसाबद्दल दुरावा आहे. माणसाला माणसाबद्दल अकारण शत्रुत्व आहे. अशा काळात ज्ञानेश्वर संपूर्ण जीवमात्रामधलं मैत्र्या वाढीला लावण्याचे भव्य स्वप्न आपल्याजवळ बाळगतात.

दुरित म्हणजे पाप याचा अंधार नाहीसा होवो. पापाला त्यांनी अंधार म्हटल आहे.याचा अर्थ पुण्ण्याला उजेड म्हणायला पाहिजे . अंधार नाहीसा कसा होईल? सूर्योदय झाल्याबरोबर अंधार आपोआप नाहीसा होतो. अंधार नाहीसा करण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया नाहीत. अंधार नाहीसा करण्याचा वेगळा कार्यक्रम नाही. सूर्य प्रगत झाला कि अंधार आपोआप नाहीसा होतो. "दुरितांचे तिमिर जावो" जगताल पाप नाहीसा होवो. जगातलं दुराचरण नाहीसं व्हाव, त्यासाठी काय करायला पाहिजे? विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. कोणता सूर्योदय ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे? स्वधर्माचा (मित्रांनो इथे हिंदू, मुस्लीम, असं धर्म नाही आहे, याठिकाणी धर्म याचा अर्थ वेगळा आहे :) ) सूर्योदय प्रत्येकाला आपापल्या धर्माचं भान आलं कि तो स्वतःच कर्तव्य बजावत राहील, आपोआप पापचरणाकडचा त्याचा कल कमी होत जाईल. पापकर्म हे माणसाच स्वाभाविक कर्म नाही आहे. हे नियतकर्म नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय "विश्वस्वधर्म सूर्ये पाहो " स्वधर्माचं ज्ञान आणि स्वधर्माच आचरण हाच सूर्योदय , या सुर्योदयामुळे आपोआप पापाचा अंधार नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. आपला धर्म ओळखण आणि धर्माचं पालन करन हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे.आपला जो धर्म नाही त्याचं पालन करण्याचा मोह होणं हा परधर्म आहे, आणि गीतेने म्हटल होतं, ।। स्वधर्मे निधनं श्रेयः पर धर्मो भयावहः।। धर्म कसा ओळखायचा ? प्रत्येकाचा धर्म त्याच्या जन्मापासूनच त्याची सोबत करत असतो, बाई हि बाईचं असते परंतु जेव्हा ती आई होते त्यावेळी तीच्यामधला मातृधर्म जागृत होतो. त्याचं आचरण हे तिच्याकडून अभिप्रेत असतं, ते सोडून इतर कुठलाही मोह तिला झाला तर त्याला पापाचरण म्हणता येईल. आम्हाला जगातील दुरितांचा अंधार नाहीसं करायचा आहे. आणि स्वधर्माकडची प्रवृत्ती आपल्याला वाढवायची आहे

केवढी भव्य अपेक्षा आहे! केवढी भव्य आकांक्षा आहे! ज्याला ज्याला जे जे हवं असेल ते ते मिळेल . ज्ञानेश्वर असं आश्वासन आपल्याला देत आहेत, जी कोणती तुमची इच्छा असेल आणि अभिलाषा असेल ते पूर्ण होण्याचं आश्वासन हे महापुरुष आपल्याला कशाच्या बळावर देत आहेत....

भूतांना परस्परांबद्दल मैत्र्य उत्पन्न झाले तरच ज्याला जे वाटेल, ते मिळाल्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या अगोदर परस्परामधलं मैत्र्य वाढायला पाहिजे, त्यामुळे आपोआप तुमचीही वृत्ती विशाल होते आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात त्या इतरांना मिळाल्या तरी आपल्यालाच मिळाव्या इतका आनंद तुम्हाला होतो. हि वृत्ती विशाल करणं ....

ज्ञानेश्वरांनी त्यानंतर असं दिव्य दृश्य आपल्यासमोर उभा केलेलं आहे. "वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी" संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे, असे ईश्वर निष्ठ लोक दाटी वाटीने उत्पन्न होऊन एकटा दुकटा नाही ईश्वर निष्ठांची गर्दी झाली पाहिजे, सगळ्यांवर! काहींवर नाही!. सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करणारे आपल्या वाणीने आपल्या दृष्टीक्षेपाने , आपल्या कृतीने मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वर निष्ठ लोक , जगामध्ये दाटी वाटीने फिरोत.

अनवरत म्हणजे अखंड , ओघ लागून राहिला पाहिजे , त्यांचा संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे हे ईश्वरनिष्ठ लोक गर्दीने या भूमंडळावर अखंड उत्पन्न व्हावेत , अखंड जगाला अशा लोकांचा लाभ होत जावा, या लोकांचाच रुपकालीन अतिशय भव्य असं वर्णन , ज्ञानेश्वर पुढे करतात. अशा ईश्वरनिष्ठ लोकांचे मेळावे ठिकठिकाणी मनुष्यमात्राला भेटावेत अशी ज्ञानेश्वर आकांक्षा का उत्पन करतात? करन ईश्वरनिष्ठ लोक आपल्यामध्ये नाहीयेत आज ते मेळावे ओसरलेत अशी अपेक्षा ज्ञानेश्वरांनी का व्यक्त करावी? याच दुसरं कारण असं आहे कि खरोखर ईश्वरनिष्ठ लोक या जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत. जे आहेत ते ईश्वरनिष्ठ नाहीत ते नश्वरनिष्ठ आहेत. माहित आहे कि जे जे नश्वर होणार आहे , क्षणभंगुर आहे, नाहीसे होणारे आहे त्याही आपण लालसा बाळगतो आणि त्याच्यासाठी जीव टाकतो. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, शस्त्र यासाठी आपण आयुष्यभर धपादत राहतो. माहित आहे यापैकी काहीही टिकणारे नाही आहे. सत्ता अतिशय बेभरोवश्याची आज आहे उद्या नसेल , संपत्ती तर चंचल पणाकरता प्रसिद्ध आहे. आणि शस्त्र हे सर्वात बेभरोवश्याच, आपल्याला असं वाटत कि सत्ता, संपत्ती, शस्त्र म्हणजेच तख्त, तलवार और तिजोरी यापैकी एखादं जरी साधन आपल्याला प्राप्त झाल तरी आपण जगावर स्वामित्व गाजवू शकतो. पण हे अत्यंत बेभरोवश्याच शस्त्र तर इतक बेभरोवश्याच कि शस्त्राला स्वतःच सामर्थ्य नसत. , शस्त्राला बुद्धी नसते, स्वतःचे डोळे नसतात , जर असते तर शस्त्राला हेच स्फुरलं असतं कि आपल्याला विकत घ्यायला आलेलं जो गिर्हाईक आहे तो मुळात दुष्ट आहे , त्याच्याच अंगावरती उडाल असतं! जो विकत घेतो आणि त्याला सांभाळतो त्याच्या संरक्षणाची हमी ते शस्त्र देईलच असे नाही. प्रसंगी शत्रूच्या हातात पडल्यावर तेच शस्त्र विकत घेणार्यावर सुद्धा चालल्याशिवाय राहणार नाही. शस्त्रामध्ये सामर्थ्य असताच कुठे , ते असतं ते शस्त्र धारण करणाऱ्या बलदंड रीतीच्या मनगटामध्ये , लुळ्या पांगळ्या हातामध्ये शस्त्र गळून पडेल., मनगटामध्येहि स्वतःच सामर्थ्य असतं कुठे. मनगटाच्या मागे जेव्हा बलिष्ठ मन उभं असत तेव्हा त्या मनगटामध्ये सामर्थ्य येईल. तुमारामांचा एक अभंग आहे.त्या अभंगामध्ये एक रडक राउताचे चित्र त्यांनी रेखाटले आहे . ज्याला जबरदस्तीने घोड्यावर बसवलं , एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल ढाल दिली. आणि त्याला लढायला रणांगणावर पाठवलं . तिथे गेल्यावर तो रडकुंडीला आला आणि कुरकुर करू लागला कि एक हाथ तलवारीमध्ये गुंतलेला आहे, आणि एक हात ढालीमध्ये गुंतलाय, आता मी लढू तरी कोणत्या हाताने , मनगटामध्येहि सामर्थ्य नसत , सत्ता, संपत्ती , शस्त्र या पाहता पाहता नाहीशा होणाऱ्या बेभरोवशाच्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपण जीव टाकीत असतो, या सगळ्या नष्ट होणाऱ्या आहेत, आपण नश्वरनिष्ठ आहोत. जे कधीही नष्ट होत नाहीत, नाहीस करण्याचा प्रयत्न केला तरी नष्ट होत नाहीत, जाळण्याचा प्रयत्न केला तरी जळत नाहीत. कापण्याचा प्रयत्न केला तरी तुटत नाहीत. असं जे तत्व आहे तिकडे आपले लक्ष नाही,आणि कोणत्या बळावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणवून घ्यायचं.

कबीराचा एक दोहा आहे दोहामधली एक स्त्री अत्यंत देखणी असते, तिच्या नवऱ्याने तिच्या सुंदर नाकाकरिता अत्यंत प्रेमाने एक अत्यंत मोलाची नथ विकत घेतली , ज्याला त्याला सांगत सुटली, कि माझ्या नवऱ्याचा माझ्यावर किती प्रेम आहे. बघा एवढी महाग नथ त्यांनी माझ्याकरता घेतली. कबीर तिची कीव करीत तिला म्हणायला लागले, कि बाई "जिस नाथने नथनी दि हो....." म्हणजेच ज्या तुझ्या नाथाने तुला नथनी दिली, त्याच एवढ कौतुक जगामध्ये करतेस पण त्या नथीच सुद्धा सौंदर्य वाढव इतक सुंदर नाक ज्या जगन्नाथांनी दिलं त्याची तुला आठवण देखील नाही. कोणत्या बळावर आपण स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणवून घेतो. आपण सगळे नश्वरनिष्ठ आहोत. या नश्वरनिष्ठांच ईश्वर्निष्ठांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्ञानेश्वरांचा हा सगळा प्रयास. आता याचं वर्णन त्यांनी, केलंय. कसे आहे हे लोक....???

असे हे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे जणू कल्पवृक्षांचे चालणारे बगीचेच, अरण्यामध्ये एखाद कल्पवृक्ष असतं, ओळखू येत नाही, धुंडाव लागत , शोधाव लागतं. पण या बगिच्यामध्ये सगळेच कल्पवृक्ष , त्यांच्या पर्यंत जाण्याची तुम्हाला गरज नाही.तेच तुमच्यापर्यंत चालत येतील, ईश्वरनिष्ठ लोक त्या कल्पवृक्षांसारखे आहेत.

चिंतामणी नावाचं रत्न असतं , जस कल्पवृक्ष मनात आलेल्या सर्व कल्पना मनासारखच पूर्ण करतो. तसं चिंतामणी नावाचं रत्न मनातल्या सर्व चिंता न सांगता दूर करतो, हे ईश्वरनिष्ठ लोक चिंतामणी नावाच्या रत्नाच्या सजीव अशा चिंतामणीच्या वसाहतीत आहेत. जो माणूस म्हणावा तो चिंतामणी सारखा तुमच्या काळज्या हरण करणारा......

आणि हे अमृताचे बोलते समूह यांच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे मधुर, संजीवक आणि त्याचे समूह ज्यांचा थांग लागत नाही. हे अमृत कधी संपण्याची भीती नाही. "वार्षिये विन सागरू, जाले जैसा निरुपचारु" ज्याप्रमाणे कितीही दुष्काळ पडला पाण्याचा तरी समुद्र आटण्याची भती नसते. हे तर अमृताचे समुद्र आहेत., कोणत्याही परिस्थितीत हे अमृत कमी होण्याची शक्यता नाही.

हे चंद्रासारखे आहेत. पण चंद्रावर लांच्छन असते. त्यांच्यावर एकही लांच्छन नाही, हे पूर्णपणे निष्कलंक चंद्रासारखे, यांची प्रभा सर्वांना सु:खद अशा रीतीचा आल्हाद दिल्याशिवाय राहणार नाही.

प्रखर अशा रीतीचा प्रकाश आहे यांचा मार्तंडासारखा , पण मध्यान्वीचा सूर्याचा ताप असतो , यांचा तसा नाही. तेजपुंज आहे पण ताप नाही,. त्रास नाही, दुसऱ्या कुणाला.

कसे आहेत ? ईश्वरनिष्ठ लोक सदा सर्वांना सज्जन आणि सोयरे होणारे आहेत, ज्ञानेश्वरांनी शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलेले आहेत. ते कधी काही काहींना सज्जन सोयरे होतु. असे म्हटलेले नाही, तर सगळ्यांना नेहमीच सज्जन सोयार्यांसारखे होतील, अप्तांसारखे होतील. ज्ञानेश्वरांनी शब्द सुद्धा कसा वापरलाय ? सज्जन सोयरे, तुमचा माझा अनुभव असा असतो कि जो सज्जन असतो तो सोयरा बनण्याची आशा नसते. जे सोयरे असतात ते क्वचितच सज्जन असतात. पण ज्ञानेश्वरांनी असे आप्त आपल्याला मिळवून दिलेले आहेत. जे अखंड सज्जन असतात. आणि सगळ्यांनाच आपल्या सौजन्याचा सदैव लाभ देतात....

सर्व प्रकारच्या सुखाचा लाभ होऊन तिन्ही लोकांमध्ये परिपूर्णतेचा अनुभव घेत, जो आदि पुरुषाची अखंड उपासना करतो. अशांचं चित्र ज्ञानेश्वरांनी आपल्यासमोर उभं केल आहे. एक आदर्श समाजव्यवस्था ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने आपल्यासमोर शब्दांनी साकार केलेली आहे. ज्याला कोणाला जेव्हा केव्हा आदर्श समाजरचना निर्माण करायची असेल, त्यासाठी पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी एक निलचीत्र उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला करता येईल, ज्ञानेश्वरांनी हे भव्य स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पाहिलं, आणि ७०० वर्षापूर्वी रेखाटून ठेवलं. आणि ते ठेवताना प्रश्न असा विचारला.

हा दान प्रसाद खरच होईल....? इतका चांगला समाज खरच अस्तित्वात येईल. नितृत्तीनाथांनी विश्वेश्वराच्या वतीन उत्तर दिलं, होईल. आणि ते उत्तर ऐकून ज्ञानेश्वर "सुखिया झाला" संतुष्ट झाले.

जगाने ज्ञानेश्वरांना हातामध्ये विषाचा भरलेला प्याला दिला या महापुरुषाने अजिबात काकू न करता तो ओठाशी लावला. एवढीशी तक्रार न करता तो प्राशन केला. आपल्या पोटामध्ये जिरवला. आणि मुरवला आणि त्यानंतर जी चूळ बाहेर पडली. त्यामध्ये विषाचा एक थेंबही नव्हता. होतं ते सगळ अमृत. जगाने यांना विष दिल त्याचं यांनी अमृतामध्ये रुपांतर केल. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी हि अमृतामध्ये चिंब भिजलेली ओवी असल्याचा अनुभव तो येतो तो या कारणाने......

||संत ज्ञानेश्वर महाराज प्रकट दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेछा ||मराठमोळी परंपरा अपुली मराठमोळी शान ,,,,,,,,,,,,!

simran254

Re: ||संत ज्ञानेश्वर महाराज ||
« Reply #1 on: June 22, 2022, 04:49:47 PM »
 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,