Chota Kavi

माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन.....

मी एक नशीबवान माणुस आहे. आयुष्यानी मला सगळं सगळं दिलं. प्रेम करणारी बायको... ऐकुन घेणारी मुलगी.... समजुन घेणारा बॉस..... कौतुक करणारे मित्र... सांभाळुन घेणारे सहकारी..... आदर देणारे शेजारी आणि.....

....आणि अजुन काय हवं आयुष्यात? मी तर ढगातुनच चालायचो. जमिनीवर तरंगायचो.... पण मी हे विसरलो होतो की आपल्याला ढगात अढळपद मिळायला आपण काय ध्रुवबाळ नाही. अर्थात तो ध्रुवबाळ जरी पुण्यात खरेदीला आला असता तरी.... असो.

मला फक्त एक लुंगी घ्यायची होती हो... माझ्या विशेष अपेक्षा, आवड-निवड, निकष असलं काहिही नव्हतं... किती वेळ लागायला हवाय एक लुंगी घ्यायला? १० मिनिटं? मलाही असंच वाटलं होतं. एका दुकानात जायचं, लुंगी मागायची आणि पैसे देऊन यायचे.... १० मिनिटं !

....पण सुमारे १० तास लागले आणि दुकानं.... डझनभर !

...... आणि ह्या भयावह अनुभवानंतर काय घालणार मी ती लुंगी ? ती बघीतली तरी किंचाळत डोंगराकडे पळत जातो मी. मला तर लुंगी-फोबीयाच झालाय.... जर मी तिकडं दक्षिणेत रहायला असतो तर एव्हाना आत्महत्याच केली असती.     

मी लुंगी खरेदी करायची म्हणुन आप्त-इष्टांना सोबत येणार का म्हणुन विचारलं तर.... प्रेम करणारी बायको तटस्थ झाली, ऐकुन घेणारी मुलगी बहिरी झाली, समजुन घेणा-या बॉसनी अजुन समजुन घेतलं आणि एक दिवसाची पगारी रजा दिली, कौतुक करणारे मित्र गायब झाले आणि शेजारी अजुन आदरानी पाहायला लागले. मग मी मंगल पांडेसारखा त्या शेकडो दुकानदारांसमोर एकटाच उभा राहिलो...

(मला खात्री आहे की तुम्ही मंगल पांडे हा पिक्चर पुर्ण पाहिला नाहीये. कारण हे वाचायला तुम्ही उरलाच नसता. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतरची भारतातली सगळ्यात मोठी दुर्घटना होती ती ज्यात लोक बेशुद्ध पडले आणि परत शुद्धीवर आलेच नाहीत !) ...........असो. उगाच विषयांतर नको. ह्याविषयी पुन्हा कधीतरी लिहिन.

.....तर मी खरेदीसाठी एकटाच रस्त्यावर आलो.


दुकान नंबर १
ह्या दुकानात मालक एकटेच कान कोरत बसले होते. मी काहि बोलायला लागणार इतक्यात त्यांचा चेहरा इतका वाकडा व्हायचा की माझं धाडसंच व्हायचं नाही. एकशेतीस ग्रॅम मळ बाहेर काढल्यानंतर त्यांनी हात झटकला आणि पुन्हा खोदकाम चालु केले.
त्यांच्या मागेच खुप सुंदर सुंदर लुंग्या रचुन ठेवल्या होत्या. त्या पैठणीच्या मोहासाठी जसं वहिन्या आदेश  बांदेकर भाऊजींचे अनाकलनीय अबोध असे विनोदाचे बाण सहन करायला तयार व्हायच्या, तसं मी सुद्धा त्या लुंग्यांसाठी कानातली घाण सहन करत तिथंच उभं राहिलो.

हाताला रग लागल्यानंतर जसं त्यांनी हात बदलायला घेतला तसं मी पण पवित्रा बदलला आणि दुकानात झेप घेतली.
मी : मालक, लुंगी हवीये.
दुकानदार : दुकानात माणुस नाहीये.
(मग तुम्ही काय बैल आहत काय ?, हा प्रश्न मी गिळला....) 
मी : अहो.... हे काय इथेच तर आहेत, तुमच्या मागे... दाखवा ना !
दुकानदार : दाखवायला माणुस नाहीये.
मी : तुम्ही नुसतं समोर ठेवा. मी माझं बघतो.
दुकानदार : काढायला माणुस नाहीये.
मी :  मग मी काढु का ?

मी असं म्हंटल्याबरोबर..... त्यांच्या कानातल्या मळापेक्षा घाण, नापसंतीदर्शक, तुच्छ कटाक्ष त्यांनी माझ्याकडे टाकला. ह्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या.
०१. दुकानात माणुस नाही.
०२. गि-हाईक माणुस नाही.

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.


दुकान नंबर २
पुढच्या दुकानात सगळी माणसं हजर होती. पण जरा विचित्र उभी होती. दोघं जण गालाला गाल लाऊन आणि तिसरा त्यांच्या डोक्याला गाल लाऊन असे बसले-उभे होते. बहुतेक मालक आले नसतील, त्यामुळे सगळे जण कोंडाळं करुन क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत बसले होते. आणि गालांच्या मध्ये ट्रांझीस्टर होता.

सकाळ-सकाळी कुणी ते क्रिकेट ऐकत, बघत, बोलत असले ना की डोकंच भडकतं माझं ! इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल्याचा मला जेवढा राग नाही तेवढा त्यांनी इथे क्रिकेट आणल्याचा आहे. हा एक रिकामटेकड्या नतद्रष्ट लोकांचा दळभद्री खेळ आहे, असं माझं ठाम मत आहे... आधिच माझी क्रिकेटविषयी इतकी तळमळ आणि त्यात कामाच्या वेळेला हि भंकसगिरी.... तरिही मी आत शिरलो.

मी : मला लुंगी हवीय.
दुकानदार : दुकानात मालक नाहीयेत.
मी : मला मालकांची नाही, नविन लुंगी हवीये..... दादा, या इकडे आणि लुंगी दाखवा.
दादा : ---       
मी : दादा, लुंगी !
दादा : ---   
मी : ओ दादा, जरा लुंगी दाखवा ना !
दादा : दोनच ओवर थांबा. लंच टाईमला देतो.
मी : ओवर म्हणजे काय ? आणि सकाळी १० वाजता लंचटाईम ? लंचटाईमला तुम्ही जेवायला गेल्यावर कशी देणार लुंगी ?
दादा : आमचा नाय हो.... मॅचमधला.
(असं म्हणुन तो, "कशाला येतात मॅचच्यादिवशी येड्यावानी " असं काहीतरी पुटपुटत पुन्हा निघुन गेला.)

माझ्या जीवाचा संताप संताप झाला. मी म्हंटलं की मालकांचा फोन नंबर द्या तर त्या निर्लज्ज माणसानी तो दिला. मी रागारागात फोन फिरवला तर तिथच एकाच्या खिशात वाजला. तो माणुस वेड्यासारखा हसत काय होता... नाचत काय होता.... कपड्यांचा ढिग उडवत काय होता.... (कुणीतरी कुणाला तरी सिक्स मारली तर ह्यांना काय होतं देवालाच ठाऊक...)
मी : उगाच आगाऊपणा करु नका. ह्यांचा नाही मालकांचा नंबर हवाय.
दादा : ह्येच तर आहेत मालक....     

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.


दुकान नंबर ०३
सदरच्या दुकानात मी सुमारे २० मिनिटे उभा राहिलो पण माझ्याकडे कुणी ढुंकुनही बघितलं नाही. ह्यावेळात एक भिकारी आला तर दुकानाचे मालक "ए हाड...." असं जोरात ओरडले....

तो भिकारी आणि मी..... गुपचुप दुकानाबाहेर पडलो.


दुकान नंबर ०४
थोडा वेळ बाजारात फेरफटका मारल्यानंतर एका दुकानात मालकच्या जागेवर मालक आणि सेवक असे दोन्ही वर्ग होते. पण गि-हाईकं नव्हती. मी आनंदाने आत शिरलो.
 
मी : मालक, मला लुंगी हवीये.
मालक : (माझ्यातुन आरपार बघत त्यांच्या माणसांना) .....ह्यांना लुंगी दाखवा. 

मला बघुन एकजण कपड्यांच्या ढिगाखाली घुसला... दुसरा माळ्यावर चढला... तिसरा न आलेला फोन उचलुन बाहेर गेला. पण एकजण गुटखा खाण्यात मग्न असल्याने बरोब्बर जाळ्यात 'घावला'.

मी : नमस्कार. मला लुंगी हवीये.
तो : सॉएब.... टोमाला पोण ऑट्टाच्चाच टॉयम घावोला कारॉव यॉयला... बॉल्लाआट्ता....
मी : तुम्ही जरा तो गुटखा थुंकुन येता का ? मी तुम्हाला नविन घेउन देईन.... (ते त्याचे माझ्या हाता-तोंडाशी आलेले 'तुषारंचे वैभव'  पुसत मी म्हणालो.)
तो तिथच पलिकडे 'थुकुन' आणि तिथल्याच एका कापडाला तोंड पुसुन म्हणाला,
तो : बोला साहेब...
मी : मला लुंगी हवीये. एकदम ट्रॅडीशनल हवीये. पांढरी...किंवा लाईट रंगाची. चेक्स किंवा लाईनींग असलेली...
तो : अशी कुणी वापरत नाही साहेब आता.... नविन फॅशनची घ्या...
मी : मला तशीच हवीये... नाहीये का ?
तो : होती... पण मी आत्ताच त्याला तोंड पुसलं राव.... कुणी घेत नाही अशी, खुप दिवस पडली होती म्हणुन....
मी : ठिक आहे. दाखवा आहेत त्या....
सेल्समन : ही बघा... एकदम लेटस्ट डिझाईन.... अजुन बाजारात असा प्रकार यायचाय... (असं म्हणुन त्यानी मला प्लेन हिरवी लुंगी दाखवली.)
मी : कुठाय डिझाईन ?
सेल्समन : डिझाईन सोडा... रंग बघा साहेब... मोराकडे पण असा हिरवा रंग मिळायचा नाही. एकदम फ़्रेश... बाहेर पडलात तर वळुन वळुन पाहाणार लोकं....
(एक तर मी मोराशी कसलिही स्पर्धा करणार नव्हतो आणि लोकांनी वळुन वळुन बघायला मी काय ऑफिसला घालुन जाणार होतो काय.....?)

मी : पण हा हिरवा रंग जरा अंगावर येतोय हो....
सेल्समन : रंगाचं सोडा. कापड बघा साहेब.... एकदम हलकं... लुंगी घातलीये का नाही ते पण कळणार नाही... 
मी : ------ !!!! ?
सेल्समन : हात तर लाऊन बघा साहेब.... एकदम ढाक्क्याची मलमल....
मी : हं, मऊ आहे पण किती ट्रान्सफरंट आहे. चुकुन बाहेर गेलो तर लोक वळुन वळुन बघतील. जरा दुसरा प्रकार दाखवा ना...
सेल्समन : ह्याच प्रकारात हिरव्याच्या ऐवजी गुलाबी रंग दाखवु.... ?
मी : गुलाबी ?? छे...  काहितरी दुसरं दाखवा ना....
सेल्समन : ............ हे बघा साहेब... एकदम कडक प्रकार.... मार्केटमध्ये कुठही दाखवा असा आयटम आणि फुकट घेउन जा हा..... एकदम लेटस्ट डिझाईन....

ह्यावरही काही डिझाईन नव्हतं त्यामुळे मी डिझाईनचं सोडुन रंग पाहायला लागलो.... छान होता रंग... हलकासा निळा त्यावर पांढ-या रेषा... पण एकदम कडक प्रकार होता... म्हणजे ते मणिपुरी का कुठल्या नृत्य प्रकारात ते चटया घालुन नाचतात ना तसं वाटायला लागलं....

मी : अजुन काय असेल तर दाखवा ना... नाही आवडलं हे पण....
(खरं तर त्यानी मला दोनच प्रकार दाखवले होते पण त्याचा चेहरा मी 'त्याचा मानसिक छळ करुन अदखलपात्र गुन्हा करतोय' असा झाला.)

सेल्समन : हे घ्या... हे सोडुन काहिच नाही आपल्याकडे... एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग.... (असं म्हणुन त्यानी एक लुंगी टेबलावर आपटली.) खरंच एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग... मी तरी कुठे पाहिला नव्हता.... काय वर्णन करु त्या लुंगीचं...
' आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर जर एखादं आजारी मांजर ओकलं ' तर कसं दिसेल, अशा डिझाईन आणि रंगाची ती लुंगी होती.       

मी ती पहिली हिरवी लुंगी घेउन त्याला अस्तर लावुन घ्यावं असा विचार करायला लागलो. त्याला किंमत विचारली तर २७० रुपये म्हणाला. ती उभी चटई १९५ रुपायाची होती. माझा चेहरा पाहुन त्याला काय कळायचं ते कळालं....
सेल्समन : " घ्यायची नाही तर बघायची कशाला... परवडत नाही तर............
 
मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.


दुकान नंबर ५
आता बराच वेळ झाला होता आणि माझी लुंगी खरेदी अजुन तशीच राहिली होती. एका दुकानात शिरलो तर तिथला माणुस म्हणाला की १ वाजलाय.
मी : मग ?
तो : काय नविन आहात काय पुण्यात ?
मी : काय संबंध ?
तो : हे विचारताय म्हणजे नविन आहात. १ वाजता आमचं दुकान बंद होतं. ४ ला परत उघडतं.
मी : का ?
तो : आम्ही माणसं आहोत. आम्हाला जेवायला लागतं.
मी : तीन तास ?
तो : वामकुक्षी.......
मी : दुपारच्या वेळेला ?
-------(एक हिडीस हास्य) ---------
मी : म्हणजे कामाच्या वेळेला ?
तो : कुणाचं काम ?
मी : कुणाचं म्हणजे ? आमचं !
तो : मग तुम्ही नका झोपु... आम्ही झोपणार...
मी : पण आमचं काम तुमच्याकडे आहे. ते तुमचं पण कामच आहे ना....
तो : असं कोण म्हणतं.... ?
मी : मी...! तुमचं गि-हाईक....
तो : हे कुणी ठरवलं ? समजा तुम्हाला चक्का हवाय तर तुम्ही माझं गि-हाईक कसं...
मी : एक मिनिट.. चक्क घ्यायला मी तुमच्याकडे का येईन ? इथे येउन मी चक्का का मागेन ?
तो : मागितलात तरी मिळणार नाही.
मी : अरेच्चा... कापडाच्या दुकानात येउन चक्का मागायला मी काय वेडा आहे का ?
तो : ते मी कसं सांगु शकेन ?
मी : विषय बदलु नकात. माझा मुद्दा असा आहे की आमचं काम तुमच्याकडे आहे आणि ते तुमचं पण कामच आहेच.
तो :  तर मग आमचा मुद्दा असा आहे की आमची कामं आम्ही आम्हाला हवं त्या वेळात करतो. १ ते ४ नाही म्हणजे नाही.   

त्याच्याशी बोलणं अशक्य आहे असं वाटत असतानाच माझं घड्याळात लक्ष गेलं तर १२.५५ झाले होते.
मी : पण घड्याळात बघा... एकला अजुन ५ मिनिटं बाकी आहेत.
तो : तुमचं घड्याळ ५ मिनिटं मागे असेल.
मी : पण तुमच्याही भिंतीवरच्या घड्याळात १२.५५ झालेत.

त्या नालायक माणसानी, काच नसलेल्या त्या घड्याळात बोट घालुन काटे फिरवले आणि १२.५५ चा ०१.०० केला आणि म्हणाला ०१.०० वाजला, तुमच्या घड्याळातल्या ३.५५ ला या....

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

simran254

 मराठी लेखक , कवी,marathi kavi,marathi writer,