mukesh ahire

छत्रपती शिवाजी महाराज :
          बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.

प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.

शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.


=========================================================================
History of shivaji maharaj , chhatrapati shivaji maharaj , shivaji maharaj information in marathi ,
shivaji maharaj information in marathi wikipedia ,  complete history of shivaji maharaj,
mahiti shivaji maharaj in marathi

simran254

 Inspiration  ,आमचे प्रेरणास्थान,