ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट ? गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका.
आचार्य चाणक्य सांगतात की जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही, परंतु वर्तमानावर मात्र वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे.
झालेल्या गोष्टींबद्दल चिंता करून दु:खी होऊ नये, तसेच आगामी काळातील म्हणजेच भविष्यातील गोष्टींविषयीही चिंता करीत बसू नये. आगामी काळात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेणे ही साधी गोष्ट नाही आणि आपल्या हातातलीही नाही. भविष्यासंबंधीची भाकितेही संभावितच असतात. त्यामुळे भविष्याची चिंता करण्यात शहणपण नाहीच.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार माणसाने केवळ वर्तमानात जगले पाहिजे. आज आम्ही काय करू शकतो, आपले संपूर्ण लक्ष यावरच केंद्रित असले पाहिजे. आजच्या वेळेचा योग्य वापर करून आपण जे काही चांगले करू शकू ते केले पाहिजे. असे केल्याने आपल्याला भविष्यात दु:ख आणि चिंता सतावणार नाही. आपण वर्तमानाचा चांगला उपयोग केला पाहिजे.