ढोल वाजू लागले
अन शंखनाद हे जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
तेज थोडे मुखावरती
उसनवारी घेतले
वाढती काया (माया) लपवण्या
वस्त्र त्यानी बदलले
ते एकवचनी एकनिष्ट
आज पुन्हा जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
जुने सारे विषय त्यानी
मग नव्याने मांडले
काम केले तीळ-
मात्र श्रेय घेण्या भांडले
ऐकुनी ती जुगलबंदी
कान पुन्हा फाटले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
भाबडे भुलती कशाला
नीट त्यानी ताडले
धर्म,भाषा,प्रांत,जाती
भेद किती पाडले
पेटता ही रणधुमाळी
धर्मराजे जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
जाण तु आता जरा हे
काय भोवती चालले
कोण ढोंगी, कोण उपरे
कोण आहे आपले
कौल दे ऐसा कि आता
होवू दे सारे भले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
कवी - द्वैत